भारतीय रेल्वेच्या १४५ वर्षांच्या इतिहासात इ.स. २००० नंतर आलेली अभूतपूर्व क्रांती म्हणजे लोकल गाड्या व इंजिनं चालविण्यासाठी महिला ड्रायव्हर्सची झालेली नेमणूक! महिलांजवळ त्यासाठी लागणारी क्षमता, कुशलता, कर्तबगारी पूर्वीही होती, परंतु हा धाडसी निर्णय घेण्यास रेल्वेबोर्डानं बराच विलंब लावला. त्या महिला आहेत म्हणून कामात कोणतीही सूट दिली जाणार नव्हती. त्यांची कामाची मेहनत व जबाबदारी एखाद्या पुरुष ड्रायव्हर इतकीच होती; शिवाय स्त्री म्हणून काही ठिकाणी छेड काढणं, मानसिक त्रास देणं, ह्या सारख्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागत होत्या त्या वेगळ्याच. ही पदं, हे अधिकार त्यांना सहजासहजी मिळालेले नाहीत. या पदांवर त्या स्त्रिया लढा देत आरूढ झाल्या आहेत. सुरुवातीला मालगाडीचं इंजिन, त्यानंतर यार्डात शंटिंग करण्यापासून मेल, एक्सप्रेस गाड्यांवरच्या चालक व मोटरमन अशा चढत्या क्रमाने या स्त्रिया वरच्या हुद्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
बिहारमधून आलेल्या प्रीतीकुमार या ३४ वर्षीय महिलेनं पहिली लोकल गाडी चालविली. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली या पट्ट्यावर त्या गाडी चालवू लागल्या. मध्य प्रदेशातून आलेल्या फाकरा या ३१ वर्षीय महिलेनं मुंबई-बडोदा एक्सप्रेस गाडीच्या मुख्य इंजिनड्रायव्हर या पदावर काम सुरू केलं. सुरेखा यादव यांना संपूर्ण आशिया खंडातील पहिली महिला रेल्वेचालक म्हणवून घेण्याचा मान मिळाला आहे. त्या मध्य रेल्वेवर लोकलगाडी चालवतच होत्या, परंतु २०१२ मध्ये ८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारताच्या ‘डेक्कन क्वीन’ या मानाच्या गाडीच्या त्या प्रमुख ड्रायव्हरही होत्या.
इंजिनं चालवणाऱ्या महिलांचं जीवन अतिशय धकाधकीचं असतं. सुरेखा यादव म्हणतात – “माझ्या दोन लहान मुलांसाठी मला पुरेसा वेळ देता येत नाही याची अनेकदा खंत वाटते, पण माझ्या या कामात मला फार आनंद मिळतो. आज ना उद्या राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेस गाडी चालवण्याची संधी मला नक्की मिळेल अशी खात्री वाटते. ”
डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन व लोकल गाडी चालविणाऱ्या मुमताज काझी या आशिया खंडातील एकमेव महिला आहेत. १९९५ साली ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये त्यांचं नाव झळकलं होतं. त्यावरील मथळा होता, पुरुषप्रधान रेल्वेसंस्कृतीतील पहिली महिला इंजिन ड्रायव्हर.’ २०१४ मध्ये ८ मार्च २०१४ या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी पनवेल ते सी. एस. टी. स्टेशन अशी लोकल गाडी मुमताज यांनी चालवली.
आज एकूण ५० महिला या अशा विविध तऱ्हेच्या गाड्या चालवतात. इंजिनाच्या खिडकीत उभं राहून स्टेशनवर गाडीचालक म्हणून होणारं त्यांचं आगमन निश्चितच कौतुकास्पद आहे.
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply