नवीन लेखन...

लोचनाबाय

रामुश्याच्या लोचनाबायला मी गेल्या दहा बारा वर्षांपासनं ओळखत होतो. त्या अगोदर मला तितकसं कळत नव्हतं. ती गेल्या सहा-सात वर्षापासनं भोसल्यांच्या पडक्या माळवादात तीन दगडाची चूल मांडून ऱहात होती. मोजकीच चार जरमनची भांडी तिच्याजवळ होती. भोसल्यांच्या माळवादात ऱहायला आल्यापास्नं लोचनाबायला मी जास्तच जवळून बघत आलो होतो. नडी अडीला माझ्याकडं  ती यायची. मला म्हणायची,

‘अंकुश्या, दहा वीस रुपय दी रं बाबा तुझ्याकडं आसलं तर…? पुन्यांदा दिती तुला माघारी. कायच न्हाय बघ रं घरात आता..?’

मी लगीच खिशातलं वीस रुपये काढून द्यायचो. खुल्या चेहऱयानं ती निघून जायची. जाता जाता आशीर्वाद द्यायची. वीस रुपयाच्या वर लोचनाबायनं मला कधीच जादा पैसं मागितलं न्हायतं. नेहमी तिचा वीस रुपयावर ठाका असायचा. का कुणास ठाऊक..?

लोचनाबाय स्वभावानं भोळी भाबडी. साधा व्यवहार तिला जमत नव्हता. दहा वीस रुपयाची मोड तिला मोजता येत नव्हती. इतकी साधी भोळी ती. सेम इसरभोळ्या गोकुळासारखी. लोचनाबाय भोळी होती पण मनानं उदार होती. ती अनेकांच्या कामाला आलेली मी बघितलं होतं. तिला अंगावर ल्यायला कधीच नवीन पाताळ मिळालं न्हाय. तिच्या अंगावरचं पाताळ गावातल्या मोठ्या घरच्या बायकांनी टाकून दिलेलं. लोचनाबायनं ते मागून आणलेलं. तीच ती नेसायची. दोन परास जादा पातळं तीन कधी मागून आणली न्हायती घरात कधी साठवून ठेवली न्हायती. अंगातला झंपरही मागूनच आणलेला. दुसऱया बायांनी घालून घालून टाकून दिलेला तो. तीच लोचनाबाय आनंदानं घालायची. तो झंपरही सैलझ्यार सुरकतलेला गोळा झालेला. बोचक्यातल्या कापडागत असायचा. त्यातच ती समाधान मानायची. आलेल्या दिसला पाठ देत ऱहायची. लोचनाबाय पन्नास पंचावन्न वयाची. डोक्यावर कुरळी केसं. तीही खुरटी झालेली. नीट बुचडाही बांधता येत नव्हता. तशीच कशीबशी लाल मळकी रिबीन बांधलेली. कपाळाला पौर्णिमेच्या चंद्रासारखं मोठं कुंकू. लालभडक. कानात मोठ्या ठिपक्याची मोठी फुलं. भिकारणीजवळून खोटी घेतलेली. चार पाच रुपयाची. तीही काळी पडत हिरवी होत चाललेली. गळ्यातबी खोटंच चार मणी. तीही भिकारणीजवळचंच. पायात तुटकी चप्पल. एक एका बापाची तर दुसरी तिसऱयाच बापाची. आंगाची बोंदरी होत चाललेली. फाटलेल्या गोणपाटागत…

लोचनाबायचं तसं चांगलं होतं. सुखासमाधानानं सारं चाललं होतं. नशिबाला नवरा पांडूभाव चांगला होता. कष्टाळू होता. व्यसन नव्हतं. लागलं तिथं काम करून चार पैसं घरात आणत होता. पोटाला दोन लेकरं. थोरली निली, धाकटा संज्या. संज्या शाळा शिकत होता. निली न्हातीधुती झाली होती. न्हातीधुती हून तिला पाचसा वरीस हून गेल्ती. कसंबसं लोचनाबायनं पांडुभावानं हाडाची काडं  करून निलीच लगीन उजवून दिल. निलीच्या लग्नान सारं घर धूवून न्हेलं. निलीच्या लग्नानंतर पाच सहा महिन्यातच संज्यानं कॉलेजमधल्या पोरीशी लग्न केलं. लग्न केलं तसा संज्या वायलं निघला. कुटूंबाला घरघर लागली. लोचनाबाय पांडूभाव एकाकी पडला. घरात हाय न्हाय झालं. वरीस खांड आसचं गेलं. पांडूभावच्या मनात काय आलं कोण जाणं? पांडूभावनं एका रात्री घर सोडलं. ते कायमचं. आज चार वर्ष हून गेली. पांडूभावनं घरचा रस्ता धरला नाही. तो कुठं आहे? काय करतो? आहे की नाही? कुठलाच थांगपत्ता नाही. अचानक आक्काबायचा फेरा घरावरनं फिरला. वर्षात होत्याचं नव्हतं झालं.

लोचनाबायनं कशीबशी कंबर खोचली. तीही नाईलाजानं. सारं विसरून एक एक दिवस पाठीशी टाकत ऱहायली. संज्या बायकूला घिवून गायरानात ऱहायला गेला. ती पुन्हा त्यानं आय कडं  ढुंकूनबी बघितलं न्हाय. काय खाती, का उपाशी ऱहाती ? याचीबी त्यानं साधी चौकशी केली न्हाय. बायकूत गुंतला ती गुंतलाच. बायकोच्या कमरेचा रुमालच होवून बसला. पाहिजे तसा ती त्याचा वापर करायला लागली.

लोचनाबायला काम करून खाण्याशिवाय पर्याय नव्हता. ती रोज उठायची. कुणाच्यातरी बांधाला जावून कामाला गाठ घालायची. मधल्या काळात दुकळात तेरावा महिना वाढला. निली नवऱयाला घिवून लोचनाबायकडं ऱहायला आली. तीबी कायमचीच. निलीच्या नवऱयाचं नाव नागा. सारं गाव त्याला नागा पाव्हणं म्हणायचं. नागा पाव्हण्याला दारूचं व्यसन. कामाचा पैसा दारूवर जायचा. घरात हाय न्हाय व्हायचं निलीला एका पाठोपाठ पाच पोरी झाल्या. दिवटा झालाच नाही. नागा पाव्हण्याला जास्तच दारूचं व्यसन लागलं. पण लोचनाबायनं त्यांना आधार दिला. निलीच्या तीन पोरी स्वतकडं  घेतल्या. त्यांचं हाय नाय बघितलं. पोरींना शाळंत घातलं. मास्तरच्या पाय पडून मास्तारकडूनच वह्या पुस्तकं घेतली. चार घरं फिरून पोरींना जुनी कापडं गोळा केली. नटून नटून तिच  ल्यायला दिली. पोरीही चांगल्या शाळा शिकायला लागल्या. लोचनाबाय म्हणायची,

‘आपण शाळा न्हाय शिकलू… म्हणून तर आडाणी ऱहायलू. निदान लेकरांना तरी शिकवा. त्यांच्या तर वाट्याला चांगलं दिवस येत्याल. शिक्षणाशिवाय जीवनात राम न्हाय. राम न्हाय तर मग जीवनात कायच न्हाय.’

लोचनाबाय आडाणी होती. पण शिक्षणाचं महत्त्व तिला समजलं होतं. तीही व्यवहारी जीवनातनं. लोचनाबाय पडेलं ती लोकांची कामं करून हातापाया पडून नातींना शिकवत होती. नातींना तरी दिवा लावावा म्हणून.

असाच एकदा मी लोचनाबायच्या दारावरनं चाललो होतो. सहज लोचनाबायच्या दाराकडं नजर गेली, तर लोचनाबाय डोळ्यातनं टिपं गाळत बसली होती. डोक्याची केसं इद्रुप झाली होती. त्वांड पांढऱया भिताडागत झालं होतं. सपाकझ्यार. तिला रडल्याली बघून मी म्हणलं,

‘काय झालं लोचनाकाकू रडायला..?’

लोचनाबाय सुरकतलेल्या पदरानं डोळं पुसत म्हणाली,

‘काय न्हाय बाबा…’

‘काय न्हाय म्हंजी… मग का रडती?’

‘आर बाबा , त्या इस्न्यानं  त्याच्या रानात खुरपायला बोलवलं व्हतं. म्या तीन दिवस त्याच्या उसाचं खुरपान केलं. आज पगार आणाया त्याच्या घरी गेली तर मला म्हणतुय…तू कामालाच आली न्हवती. अन् तुला कुठलं पैसं दिव..? भाड्यानं मला फसवलं. तीन दिवसाच्या कामाचं पैसं बुडवलं. भाड्याचं कधी चांगलं व्हायचं न्हाय. अंकुश्या, काय खावरं म्या.. पोटाला आता. पॉट उपाशी ऱहातं  कां .. अन् आता ह्या नातींना काय घालू. बिबं कडवून घालू का…? नशीबाला ताटीवाला जावय बी चांगला मिळाला न्हाय. सारखा मूत ढोसायला पायजी. पुरीची कसली दिकून काळजी करत न्हाय. काळजी आम्ही करावी. उपसल्या ह्यनं..। अन् तरास आम्हाला. सरळ लाज नसल्यावानी म्हणतूया.. पुरी मोठ्या झाल्यावर निघून का जायणात्या…  सांग बाबा तूच आता?’ रडू याचं न्हाय तर काय व्हायचं? जीव नकू नकू झालाय. इट आलाय बाबा या जीवनाचा.

मी काय बोलणार? गप्प झालो. जाता जाता तिला म्हणलं, ‘काकू रडू नकू. ही घी वीस रुपय. याचं  कायतर आण, पुरींना घाल. तू खा. त्या इस्न्याला गाठून बोलतू . का रं बाबा गरिबाला लुबाडतूय म्हणतू.’

लोचनाबाय उठून पैसं घेत म्हणली,

‘बोल बाबा बोल त्या भाड्याला. तुझं चांगलं हुईल… तुला माझा आशीर्वाद लागलं…’

दुसऱया दिवशी सकाळी दहा आकराच्या सुमारास मी रानात चाललो होतो. वाटेनी जाताना इस्नूचंही रान आडवं लागत होतं. चालत चालत इस्नूच्या रानाकडं नजर टाकली. इस्नू दिसला तर बोलावं म्हणून. आणखी पुढं गेलो… तर समोर इस्नूच्या रानात बायकांबरोबर लोचनाबायही खुरपत होती. मी डोक्यालाच हात लावला. काय बोलणार इस्नूला आता मी…?

लोचनाबाय लयच साधी. मनात कुणाविषयी काहीच ठेवत नव्हती. घडलं ते विसरून जात होती. दिवस उजाडला की नव्या दिवसाला सुरुवात करत होती. रोजचा दिवस तिच्यासाठी नवा होता. गावातील लोकं लोचनाबायला लुबाडता येईल तेवढं लुबाडत होती. मी तर काय बोलणार त्यांना?

नंतर नंतर वयाच्या मानानं लोचनाबायला काम होईना म्हणून लोकही तिला कामाला लावंना झाली. संज्या लोचनाबाईला ढुंकूनबी बघंना. शेवटी गावातनं मागून खाण्याशिवाय लोचनाबायसमोर पर्यायच उरला नाय.

टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोचनाबायनं लोकाच्यातली दिसलं ती कामं करायला सुरुवात केली. तीही न सांगता. गावात कुणाची पोरगी बाळंतीण झाली की लोचनाबाय हमखास त्यांच्या दारात टपकायची. काकुलतीला येऊन म्हणायची,

‘द्या वैणी पुरीची कापडं. मी आणती वढ्यावरनं धुणं.’ गावातल्या बायाही तिला बाळंतिणीची कापडं धुयाला द्यायच्या. बिचारी लोचनाबाय उठत बसत ओढ्यावर जाऊन ती कापडं धुण आणायची. त्यांच्या घरी पोच करायची. त्यांनी तिला दिल ती शिळंपाकं घ्याची. दिलंच तर पाच दहा रुपय घ्याची. तोंडानं एवढचं द्या म्हणून कधीच मागत नव्हती. नाही दिलं तरी समाधान मानत होती. ही तिचं नित्याचं काम झालं होतं.’

कधी गावातलं कोण मयत झालं तर लोचनाबाय तिथंही टच असायची. इकडं रडण्याचा गोंधळ असायचा अन् तिकडं लोचनाबाय गुरांना वैरण टाकायची. श्याण उचलायची. पाणी पाजायची. मुक्या जितराबांचा दुवा घ्यायची. दिसलं ती काम करायची. मयताला अग्नी दिवून घरी आल्यावर मयताच्या नातेवाईकांना चूळ भरायला पाणी द्यायची. कपात चहा ओतून द्यायची. कोण नाही पिणा तर बळजबरीनं प्यायला लावायची. म्हणायची,

‘आता मेल्यालं माणूस येत नसतंया. आपणबी जायलाच आलूया. उद्या आपलाबी  नंबर त्याच वाटंला येणाराय. गेलं त्याचं सोनं झालं. आपण ऱहायला न्हाय जायलाच आलूया. उठा, चूळ भरा…घोट घोट घ्या च्या. तेवढंच बरं वाटतं. पुन्हा तुमचं कुठं बघत बसायचं एक करता दुसरं काय झालं तर..?’

माणसंही तिच्या शब्दाला जागायची. त्वांड धुवून चहा झाल्यावर पुन्हा तासाभरानं लोचनाबाय शेजापाजाऱयानं आणलेली कोर कोर भाकर वाढायची. बळजबरीनं घास पोटात घालायची. आत्म्याचा दुवा घ्यायची चार घास घातल्याशिवाय लोचनाबाय जवळनं  उठायची न्हाय. स्वतच्या आत्म्याचा मात्र तिनं कधीच विचार केला नाही.

लोचनाबायनं तिच्या स्वभावानं, कामानं गावातली बरीच माणसं  मिळवली होती. तिला आता कोणी काही द्यायला नाहीच म्हणत नव्हतं. गावाला तिचं  एकटीचं पॉट जड नव्हतं. लोचनाबाय कुणाच्याही दारात जाऊन उभी ऱहायली तर हातातलं काम सोडून सुना बाळा अर्धी-कोर भाकर वाढत होत्या.

गावात कुणाच्या लग्न समारंभातही लोचनाबाय हमखास ठरलेली असायची. लग्नातलं  पडलं ती काम ती करायची. माणसांची मनं जिंकायची. दिला तुकडा खायची. तिथंच मुरगाळुन पडायची. हातरून पांगरून म्हणायची नाही. स्वार्थाविना तिची सेवा चालू होती. उचलून लग्न असलं तर दिवसभर लग्न मालकाच्या घराला राखण थांबायची. गुरा ढोरांना वैरण पाणी बघायची. गावातली मानसंही भरल्यालं घर तिच्यावर सोपवून जायची. पण लोचनाबाय कधी कुठल्या एखाद्या वस्तूलाही हात लावत नव्हती. तिच्या या कामानं, निस्वार्थी स्वभावानं गावातल्या साऱया माणसांची तिनं मनं जिंकली होती. गावाच्या दुःखात आनंदात ती सहभागी व्हायची. तिचं हे समीकरण गावाला पाठ झालेलं होतं. गावातलं कोण मयत झालंय अन् तिथं लोचनाबाय न्हाय… असं कधीच झालं न्हाय.

गावनं शिळं पाकं  दिलं त्यावरती लोचनाबाय आता दिवस ढकलत होती. कधी जीवनाविषयी कुरकुर करत नव्हती. नशिबाला दोष देत नव्हती. आल्या दिसाला पाठ देणं हेच तिच कामं चालू.

मी दहावीनंतर शिक्षणासाठी बाहेर पडलो. चांगला पाच सहा वर्ष. अधी मधी कधी गावी आलो तर लोचनाबाय मला गाठ पडायची. चार गोष्टी बोलायची. हृदयात साठवून ठेल्यालं सारं माझ्याजवळ ओकायची. कुणी फसवलं…कुणी पोटाला घातलं…सारं मला सांगायची. मीही तिला चार चांगलं सांगतू म्हणायची. माझ्या पोटाला तूच जन्माला याला पायजी होतं म्हणायची. कधी कधी संज्याला, त्याच्या बायकोला चार शिव्या द्यायची म्हणायची.

‘काल औदसा आली आण माझ्या लेकराला घिवून गेली. ताटातूट केली मायलेकरांची बायनं…’ हाताची बोटं मोडायची. बोटं मोडत मोडत पुन्हा म्हणायची, ‘लोकाच्या लेकराला बोलून काय उपेग? आपलं श्याण न्हाय. त्याला कळत न्हाय व्हय..? चांगली पंधरावी शाळा शिकलाय की?’

लोचनाबायचं हे गाऱहाण मला पाठ झालेलं होतं. मला जमल तेवढं मी तिला दहा वीस रुपये द्यायचो. लोचनाबाय मला भरभरून आशीर्वाद द्यायची. गावी आल्यावर तिची भेट घेतल्याशिवाय मी कधी जात नव्हतो. जर मी नाहीच तिच्या घरी गेलो तर ती मला भेटायला यायची. चार शब्द चांगलं सांगायची. दोन गोष्टी ऐकून घ्याची.

मागच्या वेळेस मी सहा सात महिन्यातनं गावी आलो होतो. दोन दिवस कामातनं लोचनाबायला भेटायला जमल न्हाय. तीही मला भेटायला आली नाही. याच्या अगोदर आसं कधी घडलं न्हाय. मी नाही गेलो तर ती मला भेटायला यायची. ती नाही आली तर मी तिला भेटायला जायचो. शेवटी मीच चार दिवसानं लोचनाबायच्या घराचा रस्ता धरला. चार गोष्टी बोलाव्यात, ख्याली खुशाली विचारावी, दहा वीस रुपये द्यावेत म्हणून चालत तिच्या घराजवळ गेलो. बाहेरनंच हाक मारली, आवाज आला न्हाय. पुन्हा थोडं पुढं झालो. दरवाजकडं बघितलं…तर दरवाजाला कुलूप. तिनं तिच्या घराला कधीच कुलूप लावलं नव्हतं. काय नव्हतंच तिच्या घरात. फुटकी जरमनची चार भांडी, एखादी गोधडी. खूप दिवसातनं तिच्या घराला कुलूप बघितलं. शेजारी एका म्हातारीजवळ लोचनाबायविषयी चौकशी केली तिनं सांगितलं,

‘आरं बाबा, लोचनाबाय वारीला म्हणून पंढरपूरला गेली.. नि पुन्हा माघारी आली नाही. कुठं गेली कोण जाणं? पांडुरंगालाच म्हायत बाबा आता..? पुन्हा ती कुठं कुणाला दिसली बी न्हाय.’

लोचनाबायच्या घराला कायमचंच कुलूप लागलं. आज सहा सात वर्षे होवून गेली. लोचनाबाय पांडुरंगाच्या वारीला म्हणून गेली ती पुन्हा माघारीच आली न्हाय. कुणाला कुठं दिसलीबी न्हाय. मला तर कल्पनाच करवत न्हाय…मी शांतच.

आज गावात कोण मयत झालं तर, दारातली जनावरं उपाशी मरतात. हाल हाल होतं दोन दिवस जनावराचं. गावातलं कुणाचं उचलून लग्न आसलं तर पाचशे रूपये देवून घर राखायला बाई ठेवावी लागते. गावात कुणाची लेक बाळांतीण झाली तर तिच्याच आईला तिच्या लेकीचं धुणं धुयाला लागतं. तीही त्वांड वाकडं करत…

लोचनाबाय अजूनही माघारी येईल म्हणून सारा गाव तिची वाट बघतोय… कोण तिला फुकट काम करून घेण्यासाठी..कोण तिच्या पोटाला चार घास घालण्यासाठी…तर कोण चार शब्द चांगलं ऐकून घेण्यासाठी…मीही तिची एक भाबड्या आशेनं वाट बघतोय…ख्याली खुशाली विचारावी…चार गोष्टी सांगाव्यात…अन् तिला दहा-वीस रूपय द्यावेत म्हणून!!

— अंकुश गाजरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..