नवीन लेखन...

Lock Down आणि तो Lock Up

किमान १७ मे २०२० पर्यंत आपली  LOCK DOWN ची मुदत आता वाढलेय. मुळातच कोरोनाच्या या   LOCK DOWN मुळे आपल्या स्वातंत्र्यावर काही निर्बंध आले आहेत. अनेकांना याचा मानसिक त्रास होतोय. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना याचा आर्थिक फटका सुद्धा बसत आहे. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस हे कोरोना योद्धे सुद्धा कोरोनाने बाधित होत आहेत.  LOCK DOWN ही खरंतर COVID 19 या माहित असलेल्या पण अदृश्य असलेल्या शत्रूशी लढण्याची आपली रणनीती आहे. या  LOCK DOWN मुळे खरंतर आपलाच फायदा आहे आणि तरीही आज अनेकांना आपल्या ओळखीच्या घरात, आपल्या जवळच्या माणसात म्हणजे आपल्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कुटुंबात राहण्याची संधी मिळून सुद्धा, आपल्यावर लादलेल्या केवळ संचार स्वातंत्र्यावर आपल्याच सरकारने, आपल्याच स्वास्थ्यासाठी घातलेल्या निर्बंधांचा त्रास होतोय.

सहज मनात विचार आला की आपल्याच राजकीय स्वातंत्र्यासाठी परक्या सरकारने जवळपास सर्वच स्वातंत्र्यांवर बंदी आणून, राजबंदी म्हणून सक्तीने दिलेल्या LOCK UP मध्ये राहणाऱ्या त्या मृत्युंजयाला कसे समजून घ्यावे आपण? अगदी बरोबर, मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलच बोलत आहे.

वयाच्या केवळ २७ व्या वर्षी आपल्याच मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीची वाट चालणाऱ्या या देशभक्ताला लंडन येथे अटक होते आणि त्यानंतर थोडीथोडकी नाही तर ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनाविली जाते आणि ताबडतोब अंदमानला रवानगी होते ती त्या  LOCK UP मध्ये. त्या LOCK UP चं वर्णन स्वतः सावरकरांनी काळकोठडी असं केलंय त्यांच्या आत्मचरित्रात.

सावरकर हे सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे त्यामुळे इतर कैद्यांबरोबर बोलणे तर सोडाच, त्यांच्या दृष्टीच्याही पलीकडे एका अत्यंत छोट्या, हवा उजेडासाठी खूप उंचावर केवळ एक झरोखा वजा खिडकी असणाऱ्या मजल्यावरच्या सर्वात टोकाच्या खोलीत या देशभक्ताला एकाकीवासात ठेवले गेले आणि त्यांची ती खोली जाणीवपूर्वक फाशी देण्याच्या ठिकाणाच्या अगदी समोरची निश्चित केली गेली. आज केवळ संचार स्वातंत्र्यावर काही दिवसांसाठी आणि आपल्याच हितासाठी घातल्या गेलेल्या निर्बंधांचा सुद्धा आपल्याला त्रास होतोय, कंटाळा येतोय, मानसिक स्वास्थ्य, झोप या सर्वांवर नकळतपणे प्रतिकूल परिणाम होतोय. पण इथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की सुरवातीच्या काळात इतर कोणाही कैद्यांशी बोलण्याची परवानगी नाही, कोणीही दृष्टीस पडत नाही, करमणुकीचे कोणतेही साधन नाहीये, लिहिणे वाचणे काहीही शक्य नाही, एकूणच मानसिक खच्चीकरण करणारीच सर्व परिस्थिती आहे. आप्तजन दिसणे, भेटणे तर दूरच (त्यांच्या दोन्हीही भावांशी त्यांची त्या तुरुंगात खूपच उशीरा आणि तीही चुटपुटती भेट झाली होती)  पण त्यांच्याशी आजच्या कोणत्याही माध्यमातून आणि त्या काळच्या पत्रांद्वारे संपर्क सुद्धा शक्य नाहीये. आणि अशा सर्व भयंकर प्रतिकूल परिस्थितीत आपले मनोधैर्य खचू न देता इतर कैद्यांचेही मनोधैर्य वाढवायचे आहे ही असामान्य जबाबदारी सुद्धा आहेच. जिथे नैसर्गिक विधीनाही एका वेळेनंतर मज्जाव आहे, म्हणजे ते नैसर्गिक स्वातंत्र्य सुद्धा नाकारलेले आहे किंवा हिरावून घेतलं गेलंय अशा या आपल्याला विषण्ण करणाऱ्या स्थितीत हा निस्सीम देशभक्त मात्र स्वातंत्र्य देवतेचे महन्मंगल असे स्तोत्र रचतो आणि तेही निसर्गाच्या साक्षीने. लेखन साहित्य नाही, मिळालेल्या एका खिळ्याने LOCK UP च्या भिंतींवर अपार कष्टाने लिहिलेल्या ओळीच्या ओळी सुद्धा तुरुंगातील अमानुष अधिकाऱ्याने रंग फासून नाहीश्या केल्यावर देखील असामान्य बुद्धी व स्मरणशक्तीच्या जोरावर ते पूर्ण काव्यच पाठ करून मनातच कोरून ठेवतोय, खरंच काय म्हणावे या ” न भूतो न भविष्यति” अशा या देशभक्त कवीला?? असा खरंच प्रश्न पडतो. हा माणूस असामान्यच!!

मार्सेलीसच्या बंदरात बोटीच्या संडासाच्या एका छोट्या खिडकीवजा भोकातून उडी मारून पोहत किनाऱ्याकडे आल्यावर जेव्हा त्यांना इंग्रजांनी पुन्हा अटक केली तेव्हा त्या अपयशाने खचून जाणे तर सोडाच, ह्या स्वाभिमानी कवीने काय लिहिले तर ” अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगति असा कवण जन्मला?”  या LOCK UP म्हणजेच बंदिवासात असताना इतर सर्व कैद्यांना आवश्यक ते शिक्षण, वाचनासाठी पुस्तके अशा सोयींची मागणी त्यांनी सतत इंग्रज सरकारकडे केली, त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले आणि देशभक्तीची ज्योत त्यांच्या मनात सतत तेवत ठेवली. अशा प्रकारच्या  LOCK UP मध्ये शारीरिक कष्टही होतेच. म्हणजेच स्वातंत्र्यांचा पूर्णतः संकोच केला गेलाच आणि वर कष्टांचाही बडगा होताच. यात घाण्याला जुंपून  ठराविक प्रमाणात रोज  तेल काढणे, काथ्यापासून दोर वळणे हे सर्व नेमून दिलेले काम आणि त्याची जीवघेणी सक्ती सुद्धा होती. यात नंतर अजून एका जन्मठेपेचीही शिक्षा झाली पण केवळ स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ती रद्द झाली. त्यानंतरही रत्नागिरीत वेगळ्या आरोपांच्या खाली स्थानबद्धता म्हणजे पुन्हा वेगळ्या प्रकारचा LOCK UP  होताच. आणि या सर्व कठोर शिक्षा का? तर मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या वैय्यक्तिक स्वातंत्र्यावर बंधने. आज आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय हितासाठी काही दिवसांसाठी आणि मर्यादित स्वरुपाची LOCK DOWN मधली बंधने नकोशी वाटतायत आणि काही जण ती झुगारुनही देताना आपण बघतोय आणि अशा वेळी सावरकरांचा हा त्याग, त्यांच्या जाज्वल्य राष्ट्र निष्ठा आठवल्या नाहीत तरच नवल.

या LOCK DOWN ने इतर अनेक गोष्टींबरोबरच आपल्याला सावरकरांचे हे राष्ट्र-भानही दयावे आणि येणाऱ्या पुढच्या आणखी आव्हाने असणाऱ्या काळात आपण एक राष्ट्र म्हणून उभे राहावे यासाठी आपण विचार करूया हीच अपेक्षा आहे. सावरकरांना भारतरत्न दयावे की नाही यावर अजूनही वाद-विवाद होत आहेत यावरूनच अजूनही या प्रखर आणि धगधगत्या राष्ट्रपुरुषाची उपेक्षा थांबलेली नाही हे स्पष्टच होते. पण भारताच्या या थोर राष्ट्र भक्ताचे आपणही काही देणे लागतो आणि ते या LOCK DOWN च्या अवघड काळाने आपल्याला जाणवावे हीच माफक अपेक्षा आहे. त्यांच्या त्या LOCK UP मधल्या पर्वताएवढया दुःखांपुढे आपल्या आजच्या LOCK DOWN मधले कष्ट खरोखरच तीळमात्र आहेत ही जाणीव सुद्धा फार सुखदायी आहे.

या देशभक्ताला त्रिवार नमस्कार!!!

— डॉ. मानसी गोरे 

Avatar
About डॉ. मानसी गोरे 4 Articles
पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. 22 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून पर्यावरणीय अर्थशास्त्र हा संशोधनाचा विषय होता. त्यातही कार्बन ट्रेडिंग यावर विशेष भर होता. सकाळ, लोकसत्ता इ. मधेही लेख लिहिते. संगीत, स्त्रीवादी विषय, सामाजिक व वैचारिक लेखन, पुस्तक परीक्षणे यात विशेष रुची आहे. अर्थशास्त्राशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत व ते प्रकाशित झाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..