लॉक ग्रीफिन.. नावातच वेगळेपण आणि पुस्तकातही. ही एक अतिशय महत्वाकांक्षी कादंबरी आहे. उत्कंठावर्धक आणि चित्तथरारक गोष्टी आवडणाऱ्या पुस्तकप्रेमींसाठी लॉक ग्रीफिन म्हणजे पर्वणीच. लेखक: वसंत वसंत लिमये
कादंबरीतली कथा आणि वास्तव हे नेहमी वेगळं असतं पण ही कादंबरी वाचताना ते सर्व समोर घडतंय असं वाटतं. ही कथा आहे एका मराठी कुटुंबाची, मुंबईत राहणाऱ्या कानिटकर कुटुंबाची. त्यांच्या तीन पिढ्यांची. आणि ह्याला पार्श्वभूमी आहे गेल्या बासष्ठ वर्षांतील इतिहासाची, संस्कारांची आणि घटनांची. ह्या काळात अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरे येऊन गेली. त्यात अनेक गोष्टी घडून गेल्या.
एका साधारण मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. रत्नागिरीजवळच्या छोट्या गावात जन्माला आलेले विश्वनाथ मोरेश्वर कानिटकर हे पहिल्या पिढीतले, त्यांची दोन मुलं, मोठा रघुनाथ बँकेत नोकरीला, जानकी ही रघुनाथची पत्नी. तर धाकटा धनंजय सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि एनक्रिप्शन क्षेत्रातील तज्ज्ञ. धनंजय आणि त्याची पत्नी नेहा, अमेरिकेत स्थायिक. रघुनाथचा एकुलता एक मुलगा सौभद्र हा तिसऱ्या पिढीचा.
गोष्ट सुरू होते सौभद्र पासून. दिल्लीत कामानिमित्त राहणाऱ्या सौभद्रच्या स्वप्नापासून. स्वप्नातून दचकून जागा झाल्यानंतर त्याला नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आठवत राहतात. नऊ वर्षांपूर्वी सौभद्र आयआयटी पवई मध्ये शिकत असताना झालेला बाबांचा म्हणजेच रघुनाथ कानिटकरांचा खून आणि त्यांचे अंत्यसंस्कार होतात न होतात लगेच दुसऱ्या दिवशी येणारी त्याच्या काका काकी म्हणजेच धनंजय आणि नेहा यांच्या अपघाती मृत्यूची बातमी. या गोष्टींचा विचार नऊ वर्षे झाली तरी सौभद्रची पाठ सोडत नाही. आणि मग तिथूनच सुरवात होते एका रहस्यभेदाला. या दोन्ही घटना एकमेकांत गुंतलेल्या असाव्यात असं सौभद्रला वाटणं आणि मग नऊ वर्षानंतर त्याने सुरू केलेला तपास, त्यात त्याला मिळालेली ज्युलियाची साथ, हे सगळं अनुभवायचं असेल तर लॉक ग्रीफिन वाचायलाच हवी.
लेखक वसंत वसंत लिमये यांची ही अप्रतिम कलाकृती. एका रहस्याचा उलगडा करण्यासाठी, ४६२ पाने वाचकाला एका जागी खिळवून ठेवण्यात ते कमालीचे यशस्वी झालेत. कादंबरीतल्या घटना वेगवेळ्या शहरात, वेगवेगळ्या देशात घडत असताना, तिथल्या एकूण एक परिस्थितीचं, तिथल्या ठिकाणांचं, तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाची नीतीहीन बाजू उघडी करणारं अभ्यासपूर्ण वर्णन वाचताना आपण तिथेच आजूबाजूला आहोत असं वाटतं. कादंबरी वाचून संपल्यावरही मी अजून त्याच वलयात आहे असं वाटणं यातच लेखकाचं प्रचंड यश आहे असं मला वाटतं.
सामान्य माणसांच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं असं म्हणतात. हे नाट्य उलगडून दाखवणारी गोष्ट म्हणजेच लॉक ग्रीफिन. मला अत्यंत आवडलेली, उत्कंठा वाढवत नेणारी, एक सनसनाटी आणि प्रचंड साहसकहाणी म्हणजे लॉक ग्रीफिन. आता लॉक ग्रीफिन या शब्दांचा संदर्भ आणि गर्भित अर्थ या कादंबरीच्या प्रवासातच गवसेल.
– मधुरा प्रमोद
४ ऑक्टोबर, २०२३
Leave a Reply