नवीन लेखन...

लोककलेतून स्वदेशी वारे

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला डॉ. मोनिका ठक्कर यांचा लेख


लोककला आणि स्वदेशी या दोन संज्ञांचा विचार करत असताना एक लक्षात येते की, या दोन संज्ञा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. परस्पर निर्मिती, योग यातून दिसून येतो. ‘स्थानीयता’ या दोन्ही संज्ञाचा मूलाधार आहे.

महात्मा गांधींच्या शब्दात स्वदेशीच्या भावनेचा अर्थ आहे, आमची ती भावना आहे की, जी आम्हाला दूरचे सोडून आपल्या जवळच्या वातावरणाचा, क्षेत्राचा उपयोग आणि सेवा करणं शिकवते. स्वदेशीचा अर्थ भारतातल्या कारखान्यात तयार झालेल्या वस्तू नव्हे तर स्वदेशीचा अर्थ बेरोजगार लोकांकडून निर्मित वस्तू आहे. सुरुवातीला जरी या वस्तूत काही कमतरता असल्या तरीही आम्हाला त्या वस्तूंचा वापर करायला हवा आणि सस्नेह निर्माणकर्त्याकडून त्यात सुधारणा करण्यास सांगायला हवे. असे केल्याने कुठल्याही प्रकारची वेळ आणि श्रम खर्च केल्याशिवाय देश आणि लोकांची खरी सेवा होऊ शकते.

महात्मा गांधींनी आपली झोपडी बनवत असताना ७५ किलोमीटर परिघातील कारागीर आणि वस्तू आणाव्यात आणि तत्कालीन ५००/ – रुपयांपेक्षा जास्त भांडवल लावू नये, असा आग्रह केला तेव्हा अर्थातच त्यांनी लोककला आणि लोककलावंतांचाच विचार केला. आज त्या वास्तू बघताना आपल्याला स्थानीयतेचे दर्शन होते.

जेव्हा इंग्रज आपल्या भारतात आले, तेव्हा आपल्या भारतात तयार होत असलेली मातीची भांडी, गालिचे, वस्त्र, मसाले याचे त्यांना अप्रूप वाटले आणि त्यांच्या आकर्षणापोटी भारतातील वस्तू ते निर्यात करू लागले. युरोपीय देशांना भारतात तयार झालेल्या या वस्तूंचे आकर्षणच इथपर्यंत घेऊन आले. भले त्यांनी आपल्यावर राज्य केलं आपली संस्कृती, आपली भाषा लादली.

भाषा, वेशभूषा, औषधे, शिक्षण, रीती-रिवाज, भौतिक उपयोगाच्या वस्तू, शेती, न्याय व्यवस्था इत्यादी. कुठल्याही देशाला जर आर्थिक सामाजिक, तांत्रिक, सुरक्षा इत्यादी क्षेत्रात समर्थ व महाशक्ती बनायचे असेल तर स्वदेशीचा मंत्र स्वीकारायलाच हवा, या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही. उदा. अमेरिका अनेक वर्ष इंग्रजांची गुलाम होती. २०० वर्षापूर्वी त्यांचे काहीच अस्तित्व नव्हते, परंतु पुढे तिथे स्वदेशीचा मंत्र शिकवणाऱ्या जॉर्ज वॉशिंग्टन यांनी चळवळ निर्माण केली त्यामुळे आज अमेरिका विश्वात महाशक्ती बनला आहे. जगाच्या बाजारपेठेत २५ टक्के वस्तू अमेरिकेच्या विकल्या जातात.

जपान तीन वेळा गुलाम झाला. प्रथम इंग्रज, नंतर डच, पोर्तुगीज, स्पॅनिश मिळून आणि तिसऱ्यांदा अमेरिकेचा गुलाम झाला. त्यांनी १९४५ मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये परमाणू बॉम्ब टाकले होते. १०० वर्षापूर्वीपर्यंत जपानची ओळख या जगाला नव्हती. केवळ स्वदेशी क्रांतीमुळे मागच्या ६० वर्षात जपान परत उभा राहिला.

परकीय कुबड्यांवर कुठलाही देश अधिक काळ टिकू शकत नाही. इंग्रजपूर्व भारत हा प्रत्येक क्षेत्रात विकसित आणि महाशक्ती होता. इंग्रज शासनकाळात टी. बी. मॅकॉलेने भारताची गुरुकुल शिक्षण व्यवस्था पार बदलून टाकली. शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकात, भारताच्या गौरवपूर्ण इतिहासात पूर्ण बदल करून भारताला गरीब देश, गारुड्यांचा देश, लुटारूंचा देश, पूर्णत: नेस्तनाबूत देश दर्शविण्यात आला. इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या सुमारे २०० इतिहासकारांनी आपल्या इतिहासाच्या ग्रंथामध्ये भारताचा जो इतिहास लिहिला आहे तो वेगळीच गाथा दर्शवतो. त्यांच्या मते, भारत देश हा सर्वसंपन्न देश, ऋषींचा देश, हिया-माणकांचा देश होता.

भारताचे वैभव बघूनच इंग्रजांनी याला ‘सोने की चिडिया’ म्हटले आहे. परंतु एक प्रश्न निर्माण होतो की इतक्या शक्तिमान देशाची ही दुर्दशा झाली कशी? संक्षिप्त उत्तर हेच आहे की इंग्रजांनी मुद्दाम त्यांच्या शासन काळात अशी कलमे किंवा कायदे बनवलेत की ज्यामुळे आमची ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली. ते सगळेच कायदे आजही आहेत, त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही.

आपले स्वातंत्र्यवीर त्यांच्याशी लढले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. परंतु प्रश्न इथे असा निर्माण होतो की, भारत देश खरंच स्वतंत्र झाला का? कारण इंग्रज इथून निघून गेले परंतु त्यांची भाषा, त्यांची संस्कृती ते इथेच ठेवून गेले.

भारताने परकीयांची संस्कृती स्वीकारली आणि भारताचे अधःपतन होण्यास सुरुवात झाली. पाश्चात्त्य लोकांनी आजही आपली भाषा, आपली संस्कृती जपून ठेवली आणि ते आज प्रगत देश म्हणून राज्य करत आहेत. कुठलंही झाड त्याची पाळेमुळे सोडून उभं राहू शकत नाही. निसर्गाचा हा साधा नियम लक्षात ठेवला तरी आपल्याला प्रगतीचा मार्ग कळेल. जशी आई आणि बाळाची नाळ एक असते त्याचप्रमाणे स्वदेशी आणि लोककलेची नाळ ही एकच आहे.

स्वदेशी अर्थात आपल्या आजूबाजूच्या परिसरातून जे काही निर्मित होतं किंवा आपल्या देशात जे काही तयार होतं ते म्हणजे स्वदेशी आणि ‘समूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य, संगीतमय आविष्कार म्हणजे लोककला.’ समूह मन जिथे एकत्रित येते, तेथे लोककलेची निर्मिती होत असते. लोककला या परंपरेने चालत आलेल्या असतात. ‘परंपरा’ या शब्दाचा नेमका अर्थ ‘परम’ म्हणजे श्रेष्ठ आणि ‘परा’ म्हणजे अभिव्यक्त होण्यासाठी लागणाऱ्या वाणीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार. अशा या परंपरेची कास लोककलेने धरून ठेवली तशीच ती स्वदेशीनेही धरून ठेवली. ‘लोक’ या शब्दाचा पर्यायी शब्द समूह आहे. स्वदेशीच्या विकासातच लोककलेचा विकास दडलेला आहे. नैतिकता, सामाजिकता, एकता, संस्कृती आणि गरज या आधारावर स्वदेशी आणि लोककला विकसित होत असतात.

लोकसंस्कृतीचे व्यक्त रूप, कृती रूप म्हणजे लोककला. समूहमनाचा गीत-नृत्य-नाट्य व संगीतमय आविष्कार म्हणजे लोककला. कळत-नकळत संपूर्ण भारतातल्या विविधरंगी लोककलांनी आपल्या मनाचा ठाव घेतलेला असतो. या लोककलांचा व लोकसंस्कृतीचा गाभा हा परंपरागत चालत आलेल्या आहे. मानव त्याच्या उत्क्रांतीच्या काळापासून भयापोटी आलेल्या श्रद्धेतून निसर्गाला पूजत आला आहे. त्यातूनच यातुविधी व विधिनाट्यांचा उगम झाला. मानवाच्या समजानुसार समाजगट पडत गेले. आणि त्या वेगवेगळ्या समाजगटाच्या धारणाही भिन्न झाल्या. परिणामस्वरूप उपास्य दैवते व उपासना विधी यांच्यातही वैविध्य आले. कालौघात मानवाच्या गरजा, अभिरुची यांमुळे या यातुविधींचे, विधिनाट्याचे स्वरूप बदलले व ते प्रयोगात्मक झाले. त्यांना रंजनमूल्यही येऊ लागले. लोकरंजनातून लोकप्रबोधन घडवणाऱ्या, मनामनांत घर करून राहणाऱ्या या लोककला या पिढीजात असतात.

लोककलेत ज्या वस्तू वापरल्या जातात म्हणजे कपडे, दागिने, माठ, काठी, वाद्य या आणि अनेक वस्तू स्वदेशीलाच परिभाषित करत असतात. जशी-जशी लोककला लोप पावत चालली आहे, तसे-तसे स्वदेशी किंवा आपण त्याला स्थानीयता ही लोप पावत चालली आहे. स्थनीयता लोप पावत चालल्यामुळे एखादे ठिकाण ओळखणेही कठीण झाले आहे. जर एखाद्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फलक नसेल आणि आपल्याला डोळ्यावर पट्टी बांधून तिथे सोडले तर कदाचित पट्टी उघडल्यावर ते ठिकाण आपण ओळखू शकणार नाही, कारण वास्तू, पेहराव यात जो एकसुरीपणा आला आहे त्यामुळे स्थनीयता आपली ओळख हरवून बसली आहे. राम-कृष्ण जन्मले त्या धरतीवरच स्थनीयता सर्वाधिक लोप पावत चालली आहे, हे इथे नमूद करताना खंत वाटते.

या धकाधकीच्या जीवनात आधुनिक चष्म्याने लोककलेला बघता त्याचे स्वरूप थोडेफार बदललेले दिसते. विशेषतः महाराष्ट्रातील लोककलांचा विचार केला असता लोककला या विधिनाट्य, भक्तिनाट्य, प्रबोधननाट्य, लोकानुरंजन या विभागात विभागली गेली आहे. विधिनाट्यात गोंधळ, जागरण, भक्तिनाट्यात भारुड, दशावतार, प्रबोधननाट्यात पोवाडा आणि लोकानुरंजन मध्ये तमाशा हे कला प्रकार येतात. महाराष्ट्रातील लोककलांनी आपली परंपरा जपलेली दिसते. तमाशा लोककला प्रकारात मागणी तसा पुरवठा या तत्त्वाच्या आधारे बदल झालेले दिसून येतात. प्रबोधननाट्यतील पोवाडा हा ऐतिहासिक काळातील पत्रकारितेचे अत्यंत प्रभावी माध्यम होते.

इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात-‘ज्याला संस्कृतमध्ये चंपूकाव्य म्हणतात या प्रकारात पोवाडा समाविष्ट आहे. एवढेच नव्हे तर पोवाडा गद्य आणि पद्य दोन्ही आहे. तो केवळ गद्य किंवा पद्य नाही’ पोवाडा हा केवळ काव्य नाही तर, दृश्य काव्यही आहे. पोवाडा हे एक प्रकारचे नाटक आहे. प्रमुख शाहीर अथवा गोंधळी आणि त्यांचे साथीदार हे मिळून पोवाड्याची बतावणी करतात. कथेच्या नायकाची भूमिका मुख्य शाहीर करतो. त्याहूनही अत्यंत महत्त्वाचे काम शाहीर करतो आणि ते म्हणजे नाटकातील सूत्रधार ! वीररसप्रधान असा हा कलाप्रकार शाहिराच्या माध्यमातून वीररसाने ओतप्रोत होऊन सादर होत असतो. वीरश्रीचा संचार होऊन वृत्तमय बोल शाहिराच्या मुखातून प्रतिभेच्या स्वरूपात सादर होतो, ज्यातून स्वयम् एक वीररसयुक्त नाटक तयार होते. शब्दांचे सुशोभन, विकारांचे हुंदके जे काव्याचे स्वरूप आहे. पद्याच्या ऊर्मीत भरून ती सर्वशक्ती गद्य रूपात अवतरित होऊन पूर्णत्व प्रदान करते. तेलगू साहित्यानेही पोवाडा हा प्रकार जतन केला आहे.

त्याचप्रमाणे भारुड हेही समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. भारुडाचे दोन प्रकार आहेत. एक भजनी भारुड, ज्यात भजनातून भारुड गायले जाते व गायनातच स्वत:च्या शैलीमुळे त्यात रंग भरला जातो. दुसरा प्रकार म्हणजे सोंगी भारुड ज्यात गायनासोबतच नृत्य-नाट्य असते, जे आध्यात्मिक उद्बोधनासोबतच समाज प्रबोधन करण्यात अधिक प्रभावी ठरले.

लोककला ही मानवनिर्मित आहे. व्यवहारात्मक कला, धर्मनिगडित कला, रंजनात्मक लोककला अशा स्वरूपात ती विकसित झाली आहे. विविध प्रांतात त्या त्या दैवतांनुसार याचे स्वरूप बदलत गेले. भारतात लोकनृत्यांची समृद्ध परंपरा असून प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे लोकनृत्यप्रकार आहेत. त्यांतून त्या त्या प्रादेशिक संस्कृतींची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित होत असतात. राजस्थानातील चक्रीनृत्य, घूमरनृत्य, कलबेलियानृत्य; उत्तर प्रदेशमधील चारकुला नृत्य, मयुरनृत्य, रासलीला; आसाममधील बिहू नृत्य, त्रिपुरातील होजागिरी नृत्य; महाराष्ट्रातील कोळीनृत्य, लावणीनृत्य, धनगरी गजेढोलनृत्य, तारपानृत्य इत्यादी लोकनृत्यप्रकार हे स्थलकालसापेक्ष, रससापेक्ष, संप्रदायसापेक्ष आहेत. कमसाले ही कर्नाटक राज्यातील एक लोकनृत्यशैली. कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात महाडेश्वर या देवतेची पूजा केली जाते. महाडेश्वराच्या महाकाव्याच्या कथागायनासाठी कमसाले हा नृत्यकलाप्रकार सादर केला जातो. उत्तरेपासून दक्षिण केरळ पर्यंत निनावली, मुदीयेततु, पडायनी, परनेहू हे लोककला प्रकार आहेत की जे ‘काली’ च्या संकल्पनेवर केंद्रित झालेले आहेत. कोलकली, पुराकली, कलारीपयत्तु, वेलाकल्ली, थय्यम, थिरायट्ट्म आदी कलाप्रकार इथे प्रसिद्ध आहेत.

भारतीय लोकसाहित्याला प्राचीन व समृद्ध अशी वैविध्यपूर्ण परंपरा आहे. या लोकसाहित्याची मुळे प्राचीन वैदिक वाङ्मयात आढळतात. व्यक्तीच्या जन्मापासून अंत्यविधीपर्यंत जे प्रमुख धर्मविधी व संस्कार आहेत, लोकगीते हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे की त्यात प्रत्येक प्रदेशातल्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसंस्कृतीनुसार वेगळेपणा व वैविध्यासह जोडला गेला आहे. भारताच्या अनेक प्रदेशांत प्रचलित असलेल्या लोकधर्मामध्ये कालीपूजेला विशेष महत्त्व आहे. केरळ, बंगाल आणि आसाम राज्यांत ती विशेषकरून आढळते. बंगाली तुसू गीते, हिंदी फाग (फाल्गुन) गीते, पंजाबी तिजा गीते, तमीळ तिरुविळअपात्तु ही वेगवेगळ्या प्रांतांतील प्रमुख सण-उत्सवपर गीते होत. कृषिगीते भारतातल्या सर्व भाषांत आढळतात. श्रमिक लोक काम करताना श्रम हलके व्हावेत म्हणून गाणी गातात. प्रत्येक प्रदेशात ती वैशिष्ट्यपूर्ण असतात व त्यांत विविधताही मोठ्या प्रमाणात आढळते. बंगालमध्ये मैसाल, तमिळमध्ये तोळिलपाट्टू, सिंधीमध्ये हमरको आणि वलारो यांचे उदाहरणादाखल उल्लेख करता येतील.

भारतातील लोककथांचा वारसाही खूप समृद्ध आहे. भारतीय लोककथांच्या आधारेच गुणाढ्याची बृहत्कथा (बड्डकहा), बौद्ध जातककथा, जैन धम्मकहा, सोमदेवाचा कथासरित्सागर, दंडीचे दशकुमारचरित, विष्णुशर्म्याचे पंचतंत्र व हितोपदेश इ. कथा-संकलने तयार झालीत. शिवाय रामायण, महाभारत, पुराणे यांतही मौखिक परंपरेतून आलेल्या अनेकविध लोककथा अंतर्भूत आहेत. भारतातल्या आदिवासी जमातींतही वैशिष्ट्यपूर्ण लोककथा विपुल प्रमाणात आहेत. लोककथांना सांस्कृतिक महत्त्व असते.

लोकनाट्ये ही विविध ऋतूंतील विधी व उत्सवांतून निर्माण झाली. बंगालमधील ‘कृष्णयात्रा’ ही लोकनाट्ये अद्यापही प्रचलित प्राचीन आहेत. बंगाली जात्रा हे त्यांचे आधुनिक रूप होय. तेरुक्कुटटू, तमिळ कन्नड यक्षगान व वयलाट, आसामी अंकियानाट, आंध्रमधील कुरवंजी, पंजाबमधील रास व नकल, मल्याळममधील काक्कारिशी, गुजरातमधील भवाई, महाराष्ट्रातील तमाशा भारताच्या विविध प्रांतांतील लोकनाट्यांचे प्रमुख प्रकार होत. मध्य प्रदेशातील लोकनाट्य ‘माच’ म्हणून ओळखले जाते.

भारतीय लोककला आणि लोकसाहित्य याची व्याप्ती फार मोठी आहे. भारतीय संस्कृती, आचार, रूढी, दैवतकथा, भाषा यांच्या अभ्यासाचा मोह पाश्चात्त्य अभ्यासकांनाही झाला. परदेशांत होणारे भारत महोत्सव, आपल्याकडे होणारे अपना भारत महोत्सव यातून लोककला जिवंत राहत आहे. हे आपल्या संस्कृतीचे संचित आहे. ते जपणे हेच आपले कर्तव्य आहे.

लोकपरंपरांतून चैतन्य स्वीकाराची प्रक्रिया वारंवार पुनरावृत्त होतानाही दिसून येते. १९७० नंतर एकूणच भारतीय कलाजीवनात आलेली स्थितिशीलता आणि मरगळ झटकून टाकण्यासाठी कलावंत पुन्हा पारंपरिक लोककलांचा नव्याने शोध घेऊ लागले आहेत. विविध प्रकारच्या हस्तकला, संगीतक्षेत्रात अभिजात लोकसंगीताचे प्रयत्न ( उदा. कुमार गंधर्व), चित्रकलेत लोकचित्रकलेचा आविष्कार (उदा. हेब्बर), लोकवैद्यकाचा आयुर्वेदाच्या आधारे शोध घेण्याची प्रवृत्ती, लोकनृत्यांविषयीचे वाढते आकर्षण, नाट्याविष्कारामध्ये विविध लोकशैलींचे उपयोजन ही सर्व चिन्हे लोकसंस्कृतीविषयी नवे भान जागृत झाल्याची निर्देशक आहेत. लोकसाहित्याच्या अभ्यासाकडे आजचा तरुण अधिक करून वळतो आहे.

भारतातील विविध लोकसंस्कृतींकडून संस्कृतीने हे योगदान मागावयाचे, नागर स्वीकारावयाचे आहे. यासाठी लोकसंस्कृतींसमोर नम्रतेची भूमिका स्वीकारावी लागेल. मधील आदिम, चैतन्या समोरच नम्र असे करताना आपण स्वतः मूलात्म होत आहोत, याचे भान यावे लागेल आणि ते सर्वच संस्कृतींना उपकारक असेल.

आधुनिक काळात लोककलेच्या माध्यमातून स्वदेशीचा जागर करणे ही काळाची गरज आहे. समाजात स्वदेशीचे प्रबोधन घडवायचे असेल तर पोवाडा आणि भारुड या माध्यमातून समाज जागृती करण्याचे काम जसे संतांनी केले त्याच प्रमाणे देशप्रेम जागविण्याचे काम देखील लोककला सक्षमपणे करू शकतील असा विश्वास आहे.

(सहाय्यक प्राध्यापिका, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ. विविध भारतीय भाषांमध्ये चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटक यामध्ये अभिनय. गेली दहावर्षे लोककला आणि लोकसाहित्याचा अभ्यास.विदूषक या विषयावर पीएच. डी. ‘फोक थिएटर फॉर्म्स ऑफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. तसेच मराठीतील ‘विदूषक संकल्पना: स्वरूप’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित)

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..