जन्म. १२ डिसेंबर १९४९
गोपीनाथ मुंडे म्हणजे स्वकर्तृत्वानं घडलेला माणूस, राजकारणाचा कुठलाही वारसा नसतांना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्या तील नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी होते. आई आणि वडिलांसोबत मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. त्यामुळे मुंडेंच्या मनावर बालपणापासूनच आध्यात्मिक प्रभाव राहिला. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. 1969 मध्ये त्यांचे पितृछत्र हपरले; पण आई व थोरले बंधू पंडितअण्णा यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे शालेय जीवनात फार हुशार नव्हते.पण शिक्षणाचं महत्व त्यांनी ओळखलं म्हणून, शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई गाठलं. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली ती महाविद्यालयीन जीवनात. महाविद्यालयात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंडे नेहमी किंग मेकर ठरायचे. अंबाजोगाईला त्यांची गाठ पडली ती प्रमोद महाजन यांच्याशी, प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व गुण ओळखले. आणि त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले. मुंडे-महाजन यांचं मैत्रीपर्व महाविद्यालयात सुरू झालं. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ही मैत्री जपली.मुंडे-महाजन जोडीनं महाराष्ट्रात भाजपचे पाय पक्के रोवले. भाजपचा वटवृक्ष केला. महाविद्यालयीन काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचे प्रार्थमिक धडे गिरवले. जनसंघामध्ये असतांना त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची मोट बांधायला सुरुवात केली. जनसंघातून भाजप वेगळा झाला.आणि गोपीनाथ मुंडेंच्या कारकिर्दीनं वेग घ्यायला सुरवात केली.आणिबाणीच्या काळात मुंडेंनी तुरुंगवासही भोगला. आणिबाणीला विरोध करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. आणिबाणीतल्या तुरुंगवासात यशवंत केळकर यांच्यासारख्या कुशल संघटकाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. प्रत्यक्ष राजकारणात भारतीय जनसंघापासून वसंत भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले. आणिबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांच्यामधले नेतृत्व गुण आणखी झळाळले. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता युवा मोर्चामधून राजकारणात प्रवेश केला.
१९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातल्या उजनी गटातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. १९८० मध्ये रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळूण बघितलं नाही. भाजपवर ब्राम्हणांचा पक्ष असा शिक्का बसला होता. पण गोपीनाथ मुंडे यांनी हा शिक्का पुसत, भाजपशी बहुजनांना जोडण्याच काम केलं. स्वत: जातीनं वंजारी असेलल्या गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी समाज भाजपशी जोडला. त्यामुळे भाजपला राज्यात आपलं स्थान आणखी बळकट करता आलं. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यासारख्या राज्यातल्या प्रभावशाली आणि ताकदवान नेत्यावर हल्लाबोल करायला सुरुवात केली. आणि गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. १९९१ ते १९९५ या काळात गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार आणि काँग्रेस सरकाला हैरान करुन सोडलं. पवारांवर चौफेर टीका करत, त्यांनी काँग्रेस सरकारची कोंडी करायला सुरवात केली. आणि राज्यात सत्ता बदलासाठी जमीन तयार केली. त्यांच्या अथक परिश्रमानंतर १९९५ मध्ये भाजप-सेना राज्यात सत्तेत आले. आणि गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री झाले. गोपीनाथ मुंडे हे कुशल प्रशासक होते. केवळ कठोर निर्णय म्हणजे प्रशासन नसते.
परिणामकारक, क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, याला फार महत्त्व असते. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना गुन्हेगारीविरोधात धडक कार्यवाही केली. पोलिसांना अधिकार दिले. ‘एन्काऊंटर’ हा शब्द त्याच काळात रूढ झाला. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या संगनमताच्या काळात एन्काऊंटर हा शब्द रूढ करणे, ही खरी गुणवत्ता होती.पोलीसदलामध्ये सुधारणा, मुंबईतल्या टोळी युद्धाला आळा घालणे, आणि जनसामान्यांनमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर गोपीनथ मुंडे, हे भाजप-सेना युतीमधला दुवा होते. दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. तर निवळण्याचं काम गोपीनाथराव करायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांच्या अत्यंत जवळचे संबंध होते. बाळासाहेबांचा कुठलाही शब्द ते पडू द्यायचे नाही. त्यामुळेच गोपीनाथराव यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीविरुद्ध शिवसेनेनं उमेदवार दिला नाही. एवढच नव्हे तर युतीला महायुतीचं स्वरुप देण्याच कामही त्यांनी केलं. राजू शेट्टी, रामदास आठवले यांना जोडलं. गोपीनाथ मुंडे यांनी युती अभेद्य राखण्यात मोठी भूमिका बजावली. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या दिलदार स्वभावामुळे अनेक मित्र जोडले. विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची असलेली मैत्री राजकारणात चर्चेचा विषय होती. विलासराव काँग्रेसमध्ये आणि गोपीनाथराव भाजपमध्ये तरीही हा पक्षभेद कधी त्यांच्या मैत्रीत आला नाही. छगन भुजबळही त्यांचे खूप जवळचे मित्र होते. पक्षीय चौकटीबाहेर गोपीनाथराव मुंडे यांनी आपली मैत्री जपली. त्यामुळे सत्ता नसली तरी त्यांच्या मतदारसंघातली विकासाची कामं कधी थांबली नाही.
गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणवैशिष्ट्ये अत्यंत वाखाणण्यासारखी होती. सत्तेत असले आणि नसले, तरी भोवती लोकांचा घोळका कायम ठेवण्याची ताकद असणारे गोपीनाथ मुंडे हे एकमेव नेते होते. या लोकसंपर्काच्या बळावरच त्यांनी गेलेली सत्ता पुन:पुन्हा संपादन केली. कितीही सहकारी गद्दार झाले तरी त्यांचे राजकीय बळ कमी झाले नाही. या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांच्या हातात सत्ता नाही म्हणून त्यांची उपेक्षा करण्याची किंवा त्यांची दखल न घेण्याची हिंमत कुणी करू शकले नाही. राजकारणात जनतेच्या समस्यांची जाणीव अचूक असावी लागते. गोपीनाथ मुंडे यांना सामाजिक मानसशास्त्र आणि जनतेच्या प्रश्ना.ची अचूक जाण होती. ‘लोकनेता’ असे विशेषण त्यांना त्यांच्या या असामान्य गुणवत्तेमुळेच लाभले होते. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असो, की सहकारी साखर कारखानदारी असो, गोपीनाथ मुंडे यांचे या विषयातील अचूक निर्णय त्यांना राजकारणात अग्रेसर होण्यासाठी साहाय्यभूत ठरले होते. गोपीनाथ मुंडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे, मराठवाड्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाला वेगळी ओळख दिली. पश्चिाम महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीने शेतकर्यांाच्या जीवनाचे चित्र बदलले आहे, हे लक्षात घेऊन मुंडे यांनी परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू केला. पश्चि्म महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारामुळे सहकाराला खाजगी कुरणाचे रूप दिले आहे. हा दोष वगळून अत्यंत कमी खर्चात साखर कारखाना कसा सुरू करता येतो आणि संचालक मंडळाचा कुठलाही स्वार्थ आडवा येऊ न देता साखर कारखाना कसा चालविता येतो, याचा आदर्शच वैद्यनाथच्या रूपाने त्यांनी घालून दिला. मुंडे यांच्या प्रेरणेने मग मराठवाड्यात सहकारी व मर्यादित सहकारी साखर कारखानदारीची एक मालिकाच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उभी केली. वैद्यनाथपाठोपाठ पन्नगेश्विर, संभाजीराजे साखर उद्योग, भोकरदन येथील साखर कारखाना अशी अनेक नावे घेता येतील. परळी येथे वैद्यनाथ सहकारी नागरी बँक, सहकारी सूतगिरणी अशा सहकारी संस्थांचे जाळे उभे करून महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना त्यांनी विकासाच्या वाटचालीची दिशा दाखवून दिली. महाराष्ट्रात झालेल्या सामाजिक चळवळीच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी घेतलेले निर्णय आणि भूमिका यामुळे मुंडे एका मतदारसंघाचे नव्हे तर राज्याचे नेते झाले.
मराठवाड्यात विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ सुरू झाली आणि या विषयात लॉंग मार्च निघाला. त्या वेळी त्यामध्ये आघाडीवर गोपीनाथ मुंडे होते. मंडल आयोगाचा विषय आला तेव्हा महाराष्ट्रातून या विषयाला पहिला पाठिंबा गोपीनाथ मुंडे यांनी दिला. सामाजिक न्यायाचा मानदंड मानल्या जाणार्यां या दोन आंदोलनांत,मुंडेनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात भाजपला नवी ओळख मिळाली. त्यांच्यावर जातीवादी पक्ष अशी टीकाकरणाऱ्यांची तोंडं बंद झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी राज्य पिंजुन काढलं. केंद्रात भाजपची सत्ता आली पाहिजे या एकाच ध्यासानं त्यांनी दांडगा प्रचार केला. विरोधकांनी त्यांच्या घरामध्ये फूट टाकली होती. सख्खाभाऊ आणि पुतण्या विरोधकांना मिळाला होता. पण या सगळ्यावर मात करत त्यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. राज्यात युतीचे ४२ खासदार निवडून आले. केंद्रात गोपीनाथराव मुंडे यांना ग्रामविकास मंत्रालय असं महत्वाचं खातं मिळालं. इतकी वर्षं संघर्ष केल्यानंतर सत्तेत आलेल्या मुंडेंना, सत्तेची फळं मात्र चाखता आली नाही.
गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply