मराठी रंगभूमीची मुळे लोककलांच्या बहुरंगी प्रवाहात रुजलेली आहेत. सकाळी दारावर येणाऱ्या ‘वासुदेवा’पासून ते रात्री फडावर सवाल जबाब रंगवणाऱ्या ‘शाहिरी’पर्यंत आणि लग्नानंतर घातल्या जाणाऱ्या देवीच्या ‘गोंधळा’पासून ते ग्रामदैवताच्या जत्रेत सादर होणाऱ्या ‘दशावतारी’ नाटकापर्यंत महाराष्ट्रातील लोकरंगभूमी विस्तारलेली आहे.खान्देश-विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्र-कोकणापर्यंत अवघ्या महाराष्ट्रातील विविध लोककलांचा अभ्यास करून, त्याबाबत सखोल संशोधन करून या लोकरंगभूमीला नागर मंचावर आणण्यासाठी सदैव झटणारे ठाणेकर म्हणजे डॉ. प्रकाश खांडगे.
भारूड, बोहोडा, गोंधळ, जागरण, भवाडा, ललित, भराड, सुंबरान, दशावतार, तमाशा इ. महाराष्ट्राच्या जनजीवनातून निर्माण झालेल्या परंपरेनं जोपासलेल्या लोककलांचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून, या कला सादर करणाऱ्या लोक कलाकारांना प्रकाशात आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी डॉ. प्रकाश खांडगे यांनी बजावली आहे.
आय.एन.टी. संस्थेतर्फे 1979 ‘खंडोबाचं लगीन’ हा अनोखा आविष्कार रंगमंचावर सादर झाला होता. त्यावेळी ‘जागरण’ या विधिनाट्यावर मूलगामी संशोधन करून या नाटकाला आकार देण्यात डॉ. खांडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे डॉ. खांडगे गेली बारा वर्षे शिकवत आहेत. पीएच.डी.चे मार्गदर्शन असलेल्या डॉ. खांडगेंच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी संशोधन करत आहेत.‘खंडोबाचं जागरण’ या पुस्तकासाठी त्यांना 2010चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथांचा वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. या खेरीज शासनाचा सांस्कृतिक विभागाचा कलादान पुरस्कार मिळवलेल्या डॉ. खांडगेंनी भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या महापरिषदेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 2010मध्ये त्यांनी चीनमधील बीजिंग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोकसंगीतावर निबंध सादर केला तर याचवर्षी अमेरिकेतील नॅशव्हिला येथे आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य लोकसंस्कृती परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोककलांवर निबंध सादर केला. पत्रकारितेमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. खांडगे यांनी शिवनेर, नवशक्ती, लोकसत्ता, लोकमत, पुण्यनगरी या वर्तमानपत्रांमधून नाटÎसमीक्षण केले आहे.
1978पासून डॉ. खांडगे आय.एन.टी.च्या प्रयोज्य कला विभागात कार्यरत आहेत. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या महापरिषदेवर सदस्य म्हणून पाच वर्षे कार्यरत असताना महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गुणवंत कलाकारांचा सन्मान व्हावा म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. ठाण्यातील ‘लोककला सांस्कृतिक मंच’ या संस्थेचे चे मार्गदर्शक आहेत.
Leave a Reply