सकाळचे सात सव्वा सात वाजले असतील. माझे आरामात बसुन, मोबाईलवरील फेसबुकवर पोस्ट अप्रुव्ह देण्याचे चालु असतांनाच, किचन मधुन हुकुमवजा विनंती ऐकु आली, “हे साठवण खलुन ध्या, लोणी काढायचे आहे.” किचन मधे गेलो, सौ ने साईने भरलेले पातेले समोर ठेवले व रवी हातात देऊन साय रवीने कशी ढवळावी हे दाखवून पुढचे कार्य सुत्र माझ्या हातात देऊन, इतर कामांत रममाण झाली सुध्दा. इतरवेळी कुठेही ढवळाढवळ करू न देणार्या अर्धांगिनी कडे आश्चर्याने बघत साय रवीने ढवळण्याचे सोपविण्यात आलेले कार्य सुरु केले. सुरवातीला रवी व पातेल्यातील साय यांचे काही सख्य जमेना, डोळ्यांत ही विचार सुरु झाले. नक्की काय बरं म्हणावे या क्रियेला. विचाराचे मंथन सुरू होते… अरे खरंच की लोणी काढायच्या या क्रियेला मंथनच म्हणतांत… एका गाण्यात नाही का ‘राधा गवळण करीते मंथन’ नक्कीच… मंथनच. मग सौ. रवीने ढवळण्यास का सांगीतले. रवीने वरण घोटलेही जाते.ताक घुसळले जाते. घुसळुन लोणी वर येते. अरे वा मराठी भाषेत काय छान छान संदर्भ लागतात ना? माझे एकिकडे पातेल्यात घुसळणे, मंथन, ढवळणे, घोटणे, चालु होते.
अन हळूहळू लोणी तयार होत असल्याचे दिसून येत होते. लोण्याच्या खाली ताक ही दिसु लागले. अरे वा लोणी काढता येते की मला. माझ्या कामाला गती येऊ लागली. लोणी ही छानच जमु लागले होते. विचारांचे लोणी ही जमु लागले होते. असेच विचारांचे मंथन करुन छान चांगल्या विचारांचे लोणी काढुन वाटता आले तर….. अरे वा छानच कल्पना आहे ना… असाच समाज ढवळुन चांगले लोक लोण्या सारखे गोळा करता येतील… मस्तच ना. समुद्र मंथनातून च अमृत बाहेर आले होते ना.
“अहो आले लोणी वर बस्स करा ढवळणे “या आकाशवाणी ने मी विचारातून बाहेर आलो लोणाचा छानसा शुभ्र गोळा ताकावर मस्त तरंगत होता.
वा लोणी तयार करता आले तर मला.
त्याहीपेक्षा विचार मंथन किती दिशा दाखवु शकते ना.
भास्कर ©®
Leave a Reply