गुप्तकाळात मातृदेवतांचा उठाव झाल्यानंतर त्यांनाही नाण्यांवर स्थान मिळू लागले. जसे सिंहासनाधिष्ठीत लक्ष्मी किंवा उमा, पार्वती. पुढे मुस्लिम राज्यकर्ते आल्यावर मानवी आकृत्याच गायब झाल्या. एका राजाने खलिफाचे चित्र असलेली नाणी काढली म्हणून असंतोष निर्माण झाला व नाणे मागे घ्यावे लागले. अशा काळात स्त्रियांना कोण स्थान देणार. तरीही एका मुस्लिम राजाने आपल्या रूपवती राणीची जन्मपत्रिकाच नाण्यावर छापली होती.
नाण्यांच्या पद्धतशीर अभ्यासाला ‘नाणकशास्त्र’ (Numismatics) असे म्हणतात. दुर्मिळ नाणी व नोटा जमवणे हा एक चांगला छंद मानला जातो. चलनावरील चित्रे, चिन्हे व लेखन यातून त्या देशाची संस्कृती व प्रकृती यावर प्रकाश पडतो.
नाण्यांचा उदय
इ. स. पूर्व सहाव्या शतकात इराणने भारतावर आक्रमण केले होते. त्यांच्या प्रभावातून भारतात चलन हा प्रकार रुजला. त्याआधी वैदिक संस्कृतीत कृष्णाल, शतमान, निष्क अशा प्रकारचे धातूचे तुकडे वापरले जात. नाण्यांच्या उदयातून व्यापार व दळणवळण यांना चालना मिळाली. अर्थातच ही नाणी धातूची होती व धातूच्या दुर्मिळतेनुसार त्यांचे बाजारातील मूल्य निर्धारित होई. त्यामुळे मग सोने, चांदी, तांबे लोखंड यांना उतरत्या क्रमाने महत्व मिळाले. हे धातू टिकाऊ, हलके (निदान गाई-म्हशींपेक्षा), तुकडे पाडायला सोपे असे होते.
खरी चलन पद्धत
या नाण्यांचे वैशिष्ट्य असे होते की त्याचे अंतर्गत व बाहय मूल्य समान असे. म्हणजेच त्या चलनाचे बांगडीत रूपांतर केले तरी त्या बांगडीची किंमत तीच राहील जी चलनाची किंमत होती. या प्रकाराला खरी चलन पद्धत (real currency system) असे म्हणतात. यात एक फायदा असतो की शासनाच्या हमीची गरज या चलनाला लागत नाही. धातूच्या किंमतीची हमी कार्यरत असते. त्यामुळे कोणत्याही राज्यातील नाणी कोठेही चालतात. या पद्धतीचे तोटे असे होते की कोणीही नाणी पाडू शकतं. त्यामुळे खरे व खोटे चलन यात फरक करणे जड जाई. यावर उपाय म्हणून राजघराणी आपला शिक्का नाण्यांवर पाडू लागले.
खऱ्या चलनातील दोष
धातूच्या किमंतीवर आधारित खरी चलने कोणीही काढू शकत त्यामुळे अर्थव्यवस्थेत पुरवठा वाढून गोंधळ व्हायची शक्यता असे. खऱ्या चलनांसारखी नाणी पाडणारे कुशल कारागीरही काही कमी नव्हते. उदा. रोमन नाण्यांना भारतात खूप मागणी असे, तेव्हा सातवाहन काळात डिट्टो रोमन नाण्यांसारखी दिसणारी नाणी कारागीर बनवून खपवत. त्याशिवाय धातूंचा पुरवठा मर्यादीत असणे ही एक समस्या होती. विशेषतः भारतात सोने व चांदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. धातूंच्या आयातीवर अवलंबून राहावे लागल्याने बऱ्याचवेळा चलनाचा तुटवडा असे. सुदैवाने प्राचीन भारतात निर्यात जास्त व आयात कमी असल्याने धातूंची आयात शक्य असे. पण अर्थव्यवस्था मोठी असली व धातू कमी पडले की वस्तुविनिमयाचा आधार घ्यावा लागे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती व क्षमता अवरुद्ध होई.
नाण्यांचे वैविध्य
नाणी वेगवेगळ्या आकाराची असत. कधी ती चौकोनी, आयताकृती, पेल्याच्या आकाराची, तर कधी अष्टकोनी असत. चिनी लोकांनी पहिल्यांदा गोल नाणी काढली असे मानले जाते. गोल नाणी हाताळायला सोपी पडत. सामान्य माणूस व्यवहारात तांब्याची नाणी जास्त वापरे, तर व्यापार प्रामुख्याने चांदीच्या नाण्यात होई. सोन्याची नाणी राखीव पैसा म्हणून साठवली जात. नाणे पाडण्यासाठी टांकसाळी असत. नाण्यातून त्या काळची तांत्रिक कुशलता, समृद्धी, राज्याचे क्षेत्र, परकीय व्यापार यावर प्रकाश पडतो.
वसा व वारसा
मौर्य काळात नाण्यांचा वापर शिखरावर पोहोचला होता. ‘पण’ हे वेगवेगळ्या धातूत पाडले जाणारे नाणे प्रमुख असे. आजही आपण म्हणतो की, माझे सर्वस्व मी ’पणाला’ लावले आहे. पुढे जेव्हा वेतनाच्या जागी जमीन दयायची पद्धत रूढ झाली तेव्हा प्राचीन युगाच्या शेवटी नाण्यांचा वापर कमी होत गेला.
राजे व नाणी
समुद्रगुप्त हा गुप्त राजा वीणा वादन करताना दाखवला आहे. त्याच्या नाण्यावर त्याचे नाव उभे लिहिले आहे. त्यातून चिनी लिपीचा प्रभाव गुप्त नाण्यांवर दिसतो. विशिष्ट प्रसंगी नाणी पाडत, जसे समुद्रगुप्त याने अश्वमेध यज्ञ केल्यावर ‘अश्वमेध पराक्रम’ लिहिलेली नाणी काढली.
इतिहासाचे साधन
भारतातील अनेक प्राचीन राजांचे अस्तित्व केवळ त्यांच्या नाण्यांमुळे सिद्ध झाले आहे. इंडो-ग्रीक, शक, कुशाण, क्षत्रप, सातवाहन इ. राजवंशांतील कित्येक राजे केवळ त्यांच्या नाण्यांमुळे आपल्याला माहीत झाले यांशिवाय संघ, निगम, जनपद, गण इत्यादींचे अस्तित्वही त्यांच्या नाण्यांमुळे सिद्ध झाले. मालव, शिबी, यौधेय इ. गणराज्यांचे प्रदेश आपल्याला नाण्यांच्या पुराव्यामुळे जवळजवळ निश्चत करता आले.
सार्वभौमता
नाणी पाडणे हे सार्वभौमत्वाचे प्रतिक मानले जाई. तुर्क तैमूर याने 1399 रोजी दिल्लीवर स्वारी केली. या आक्रमणात त्याने लुटारूची भूमिकेत लूट व हत्याकांड केले. आपल्या तात्पुरत्या वास्तव्यात देखील त्याने आपल्या नावाची नाणी पाडली. तैमूरच्या या कृतीमुळे त्याचा वारस बाबर याला भारतावर स्वारी करण्यासाठी आयतेच कारण मिळाले.
नाण्यांची काही वैशिष्ट्ये
जीवदामन शक क्षत्रप राजाच्या कारकीर्दीपासून (इ. स. 178) दर्शनी बाजूवर कालदर्शक आकडा देण्यास सुरुवात झाली. मुसलमान राजे बव्हंशी मूर्तिभंजक असल्याने नाण्यांवरील मानवी आकृत्या नाहीशा झाल्या. जहांगीराने पाडलेल्या बारा राशीची चिन्हे असलेल्या मोहरा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
सबसे बडा रुपय्या
हुमायूननंतर सत्तेवर आलेला दिल्लीचा अफगाण बादशाह शेरशहा सुरीने नाण्यांमध्ये फार मोठे बदल केले. त्याने चांदीच्या आणि तांब्याच्या नाण्यांची वजने वाढवली. तांब्याच्या नाण्याचे 1/2, 1/4, 1/8, 1/16 असे भाग केले. तांब्याच्या नाण्याला दाम म्हणत, तर चांदीच्या नाण्याला ‘रुपया’ हे नाव दिले गेले. चांदीला संस्कृतमध्ये ‘रूप’ म्हणतात. म्हणून हा चांदीचा रुपया. या शब्दानेच आपले आजचे चलन ओळखले जाते. थोडाफार फरक करून हे नाणे मुघल, ब्रिटिश व आज आपण कायम राखले आहे. भारतीय उपखंडातील इतर देशांच्या नाण्याचे नावही रुपया आहे यातून रुपयाचे एकेकाळी असलेले महत्व दिसते. दाम ही गाजले ’दाम करी काम’ ही म्हण प्रसिद्ध आहे.
शिवकाळ
शिवकाळात सोन्याचा होन, चांदीची ‘लारी’ व तांब्याची शिवराई ही प्रमुख नाणी आढळतात.शिवाजी महाराजांच्या नाण्यांवर एका बाजूला नागरी लिपीत ‘छत्रपती’ व दुसऱ्या बाजूला ‘श्री राजा शिव’ असे शब्द आहेत. होन म्हणून ओळखली जाणारी ही नाणी दुर्मिळ आहेत.
टांकसाळी खासगी आणि शासकीय अशा दोन प्रकारच्या असत. नाणे पाडण्याचे वतन देत असत. अशा वतनदारास ‘पोतदार’ म्हणत. टांकसाळीसाठी कच्चा माल सरकार देत असे. ज्या नाण्यांवरील मजकूर स्पष्टपणे दिसत नाही असे झिजलेले रुपये आटवून त्याची चांदी बनवली जायची. त्या काळीसुद्धा खोटी नाणी पाडणारे होते. खोट्या रुपयास ‘करडा रुपया’ म्हणत.
ब्रिटिश काळ
1835 सालच्या चलनविषयक सुधारणेप्रमाणे ठराविक वजनाचा, आकाराचा व शुद्धतेचा रुपया हे ब्रिटिश सत्तेखालील सबंध भारताचे एकमेव चलन झाले. एकूण 180 ग्रेनपैकी 165 गेन शुद्ध चांदी असणारा असा हा कंपनीचा रुपया होता.
पैसा, ढबू पैसा आणि पै ही तांब्याची नाणी या नाण्यांबरोबर सुरू करण्यात आली. तांब्याच्या नाण्यांच्या एका बाजूवर तारखेबरोबर कंपनीची मुद्रा आणि तारिख असे.
इंग्रजी अमदानीतली रानी व्हिक्टोरियपासून सहाव्या जॉर्जपर्यंतची नाणी 1947 पर्यंत पाडली गेली आणि भारत स्वतंत्र झाल्यावर ती पाडण्याचे थांबवण्यात आले.
बदलती नावे
1862 सालापासून ईस्ट इंडिया कंपनीचे नाव नाण्यांवरून काढून टाकण्यात आले. 1862 ते 1876 च्या दरम्यान पाडलेल्या नाण्यांवर राणीचा उल्लेख Victoria Queen, तर 1877 ते 1901 या नाण्यांवर Victoria Empress असा आहे.
व्हिक्टोरिया राणीनंतर 1901 ते 1910 दरम्यान सातव्या एडवर्डच्या नावाने नाणी पाडली गेली. या नाण्यांवरील एडवर्ड मुकुटविरहित होता. भारतीयांनी ‘बोडक्या राजाचा रुपया’ अशी या नाण्यांची संभावना केली. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात 600 च्या वर संस्थाने होती. त्यातील 125 जणांची स्वत:ची नाणी होती.
एक नवा पैसा
भारत स्वतंत्र झाल्यावर ऑगस्ट 1947 ते मार्च 1950 यादरम्यान भारतातील टांकसाळीतून 1947 या गोठवलेल्या सालाची (Frozen Dates) नाणी पाडण्यात आली. 1950 साली भारतीय प्रजासत्ताकाची रुपया- आणा- पैसा ही नाणी चलनात आली. तोपर्यंत सहाव्या जॉर्जची नाणी प्रचलित होती. त्यावेळी 4 पैशांचा 1 आणा व 16 आण्यांचा (64 पैशांचा) 1 रुपया असे विनिमय होते. 1957 साली भारताने दशमान पद्धत स्वीकारली व 100 नव्या पैशांचा 1 रुपया झाला, तर 1964 साली नाण्यांवरील ‘नवे पैसे’ या शब्दप्रयोगातील ‘नवे’ हा शब्द काढून टाकला व फक्त ‘पैसे’ असा उल्लेख नाण्यांवर करण्यात येऊ लागला.
नाणी व महिला
पुरुषप्रधान संस्कृतीत नाण्यांवर महिलांना नाण्यांवर स्थान मिळणे दुर्मिळ होते. प्राचीन काळातील काही नाण्यांवर यज्ञ करणारा राजा व त्याच्यामागे उभी असलेली त्याची राणी जिला एकेकाळी यज्ञात आहूती द्यायचा समान हक्क होता (सहधर्मचारिणी) ती दिसते. गुप्त सम्राट चंद्रगुप्त पहिला याच्या नाण्यावर तो व त्याची राणी कुमारदेवी दिसतात. यामागे राजकीय कारण असावे. गुप्त वैश्य होते तर कुमारदेवी ही लिच्छवी राजकुमारी क्षत्रिय कुळातील होती. असे असावे की या प्रतिलोम विवाहामुळे (वरच्या वर्गातील स्त्री व खालच्या वर्गातील पुरुष, उलट प्रकारच्या विवाहाला अनुलोम असे म्हणत) गुप्तांचे राजकीय स्थान उंचावले असावे.
मातृदेवता ते व्हिक्टोरिया
गुप्तकाळात मातृदेवतांचा उठाव झाल्यानंतर त्यांनाही नाण्यांवर स्थान मिळू लागले. जसे सिंहासनाधिष्ठीत लक्ष्मी किंवा उमा, पार्वती. पुढे मुस्लिम राज्यकर्ते आल्यावर मानवी आकृत्याच गायब झाल्या. एका राजाने खलिफाचे चित्र असलेली नाणी काढली म्हणून असंतोष निर्माण झाला व नाणे मागे घ्यावे लागले. अशा काळात स्त्रियांना कोण स्थान देणार. तरीही एका मुस्लिम राजाने आपल्या रूपवती राणीची जन्मपत्रिकाच नाण्यावर छापली होती. सुलतान काळात रझिया, मुघल काळात नूरजहाँ यांच्या नावाने नाणी काढली गेली.
नाण्यांच्या मर्यादा
शतकानुशतके नाण्यांनी मानवी विकासात महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे महत्व आजही आहे. नाणी आहेतच व त्यांचे छोट्या व्यवहारातील महत्व (जे आपल्याकडे भरपूर होतात) कमी झालेले नाही. एखादी व्यक्ती ‘नाणावलेली’ असते तर एखाद्याचे काम हे ‘खणखणीत नाणे’ असते. हे सर्व असले तरी नाण्यांच्या मर्यादाही स्पष्ट होत गेल्या. धातूंची कमतरता, प्रमाणित नाण्यांचा अभाव, धातूंच्या शुद्धतेबद्दल असलेला अविश्वास, जास्त वजन व त्यामुळे प्रवासातील अडचण, छोट्या मूल्यांची नाणी उपलब्ध नसणे इत्यादी. हजार प्रकारची चलने असल्यामुळे त्यांचे एकमेकांशी असलेले मूल्य ठरवणे कठीण जाई. त्याहून महत्वाचा मुद्दा पुढे निर्माण झाला की अर्थव्यवस्था विस्तारायला लागल्या. अशावेळी व्यवहार वाढले पण त्याप्रमाणात नाण्यांचा पुरवठा काही वाढेना. मग निव्वळ चलन नाही म्हणून अर्थव्यवस्था संकुचित राहू द्यायची का हा मूलभूत प्रश्न उभा राहिला. या उत्तरांचा शोध माणसाला कागदी चलनाकडे घेऊन गेला.
(राज्य प्रशासकीय प्रशिक्षण सस्थांचे मार्गर्शक आणि अभ्यासक)
प्रा. भूषण देशमुख
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply