स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचा जन्म २५ जून १९०० रोजी विंड्सर, इंग्लंड येथे झाला.
१९१६ मध्ये लॉर्ड माउंटबॅटन नौदलात कॅडेट म्हणून दाखल झाले. माउंटबॅटन यांना राजघराण्याशी असलेल्या आपल्या नात्याचा फार अभिमान होता. त्यांचा विवाह वर्ष १९२२ मध्ये एडविना ऍश्लीय ह्या सौंदर्यसंपन्न युवतीबरोबर झाला होता. माउंटबॅटन त्याकाळी त्यांच्या उदार, काहीशा डावीकडे झुकलेल्या विचारांबद्दल प्रसिद्ध होते.
दुसऱ्या महायुद्धातील कामगिरीमुळे त्यांचे नाव कर्तबगार अधिकारी म्हणून पुढे आले. येथून पुढे त्यांच्या उत्कर्षाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ह्यांनी १९४१ मध्ये तिन्ही सेनादलांच्या संयुक्तर हालचालींचे सूत्रधार म्हणून माउंटबॅटन यांची निवड केली.
ह्यावेळी त्यांच्या कर्तृत्वाचा आणि संघटना-कौशल्याची ओळख दोस्त राष्ट्रांत झाली व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन रुझवेल्ट यांनी १९४३ मध्ये दक्षिण-पूर्व (आग्नेय) आशियामधील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचे सुप्रीम कमांडर म्हणून माउंटबॅटन यांची नेमणूक केली. त्यावेळी आग्नेय आशियामध्ये दोस्त राष्ट्रांचे सैन्य पराभूत होत होते.
मात्र, जबाबदारी स्वीकारताच माउंटबॅटननी सैन्यांमध्ये विश्वापस निर्माण करून त्यांचे धैर्य वाढविले. त्यांनी पावसाळ्यात ब्रह्मदेशात जपानच्या सैन्याशी मुकाबला करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविली व जपानी सैन्यास माघार घ्यावी लागली.
दुसऱ्या महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ऍटर्लीच्या मजूर पक्षाच्या शासनाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले. हे मोठे जटील काम होते तसेच मुस्लिमांच्या मागणीप्रमाणे वेगळे राष्ट्रही निर्माण करायचे होते. ही कामगिरी लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर सोपविण्यात आली. मार्च १९४७ मध्ये ते शेवटचे व्हाइसराय म्हणून भारतात आले. त्यांनी ३ जून १९४७ रोजी भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. सगळ्यात अवघड काम सीमारेषा ठरविण्याचे होते. त्यासाठी जून १९४७ मध्ये रॅडक्लीयफ कमिशनची नेमणूक करण्यात आली.या कमिशनने घाई करून भारत व पाकिस्तान मधील बांगलादेशासह ७ हजार ४०० किमीची सीमारेषा फक्त दोन महिन्यांत निश्चिलत केली. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य घोषित करून लगेचच सीमारेषेचीही घोषणा करण्यात आली. त्यावर अपिलाचीही संधी देण्यात आली नाही. या घाईमुळे मोठ्या चुका आपणास भोगाव्या लागत आहेत. त्यांचा जन्मदिवस भारतात साजरा करण्याचे कारण नाही, पण भावी पिढीला काय घडले याची माहिती होणे आवश्यक आहे.
पत्नीच्या मृत्यूनंतर आणि निवृत्तीनंतर एकाकी जीवन कंठणाऱ्या माउंटबॅटन यांचा २७ ऑगस्ट १९७९ रोजी त्यांच्या घराजवळ आयरिश दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटामध्ये मृत्यू झाला.
Leave a Reply