आज नागपंचमीचा सण. श्रावणातील या पहिल्या सणाचं सुनीताला लहाणपणापासूनच मोठं आकर्षण वाटे. तिचं बालपण खेडेगावात गेलं होतं. मोठं चौसोपी घर, पुढे अंगण, अंगणात तुळस. शेजारी गाई, म्हशींचा गोठा. दोन मोठे भाऊ आणि ही धाकटी व आई-वडील असं पाच जणांचं कुटुंब. आईनं तिला घरकामाबरोबर शेतीच्या कामातही हुशार केलं होतं..
सुनीता लहानपणी परकर पोलक्यात सतत आईच्या मागेपुढे असायची. स्वयंपाकात आईला मदत करायची. ती गावातील मंदिरात, शाळेत जाऊ लागल्यावर आईला प्रत्येक कामात तिची उणीव भासायची…
तिला आठवत होतं.. नागपंचमीचा सण होता. सकाळीच तिनं शेणानं, अंगण सारवून काढलं. दरवाजापुढे रांगोळी काढली. आईनं पुरणपोळीचा बेत केला होता. सगळी कामं आवरुन ती चुलीसमोर येऊन बसली व पुरणपोळी करायला आईला मदत करु लागली. शेवटी राहिलेल्या दोन पोळ्या करण्यासाठी आईनं तिच्या जागेवर तिला बसवलं.. आणि सुनीताच्या हातून त्या टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या पाहून, आईचा चेहरा कौतुकानं फुलून गेला.. दुपारी जेवायला बसल्यावर सर्वांकडून झालेल्या कौतुकाने, सुनीता आनंदात न्हाऊन निघाली..
आज त्या गोष्टीला पंचेचाळीस वर्षे लोटली होती. सुनीताचं लग्न लवकरच झालं. सौरभच्या पुढाकाराने तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं व शिक्षिकेची नोकरी केली. दरम्यान ती एका मुलाची आई झाली होती.
भिंतीवरील कॅलेंडरं बदलत, अनेक वर्षे निघून गेली. मुलाचं, संतोषचं शिक्षण पूर्ण झालं, त्याला उत्तम नोकरी लागली. सौरभ नोकरीतून निवृत्त झाले. संतोषनं त्याला आवडलेल्या मुलीबद्दल दोघांना सांगितलं. दोघांनीही ‘ग्रीन’ सिग्नल देऊन त्यांचे थाटामाटात लग्न लावून दिलं..
आज सौरभ कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. संतोष आणि शीतल नोकरीच्या निमित्ताने रात्री उशिरा येणार होते. तरीदेखील तिने आपला पुरणपोळीचा बेत बदलला नाही. दुपारपर्यंत संपूर्ण स्वयंपाक झालेला होता. तिनं जीवतीच्या चित्राला आघाडा दुर्वांची माळ घालून पुजा केली. पाटावर मांडलेल्या नागोबाच्या मूर्तीला लाह्या, फुटाणे वाहताना ती भूतकाळात गेली..
गावात नागपंचमीच्या सणाला तिची आई बाजाराच्या दिवशी नवीन रिबीनी, नेलपाॅलीश, कानातले डूल तिच्यासाठी घेऊन यायची. गावाबाहेर मोठ्या झाडाला झोके लावलेले असायचे. तिचा संपूर्ण दिवस हुंदडण्यात जात असे. रात्री जमिनीवर अंग टाकलं की, तिला गाढ झोप लागत असे..
आज सगळंच हरवलं होतं. गाव सोडून अनेक वर्षे झाली होती. आई वडील वृद्धापकाळाने देवाघरी गेले होते. भाऊ त्यांच्या संसारात मग्न होते. वर्षातून भाऊबीजेला व राखी पौर्णिमेला त्यांच्या भेटीगाठी होत असत..
आज सायंकाळी आम्ही दोघेही घरी जेवणार नाही, बाहेरच जेवून येणार आहोत, असा संतोषचा दुपारीच फोन आला होता. तिला आपण एवढा स्वयंपाक करुन चूक तर केली नाही ना? असं एकदा वाटून गेलं. दिवेलागणीला तिने देवासमोर दिवा लावला..
रात्री नऊ वाजता दारावरची बेल वाजली. तिनं दरवाजा उघडला तर समोर तिच्या माहेरचा, शेजारीच राहणारा महेश होता.. तिनं त्याला आत येऊन बसायला सांगितलं. महेशला ती लहानपणापासून पहात होती. त्याला सारखी भूक लागायची. तेव्हा त्याची आई व आता बायको स्वयंपाक करुन करुन कंटाळून जायची..
महेशने सुनीताला भूक लागल्याचं सांगितलं. तिने पुरणपोळी केल्याचं कळल्यावर महेश खुश झाला. सुनीताने त्याचं जेवणाचा ताट मांडलं, तेवढ्यात सौरभ आले. दोघेही जेवू लागले. सुनीताला आज केलेल्या पुरणपोळीच्या बेताचे सार्थक झाल्यासारखं वाटलं..
दारावरची बेल वाजल्यावर तिनं दरवाजा उघडला तर संतोष आणि शीतल उभे! संतोष दारातून आत येतानाच बोलू लागला, ‘आई, आमचा बाहेरच्या जेवणाचा कार्यक्रम रद्द झालाय, खूप भूक लागली आहे..’ सुनीताला आनंद झाला, स्वयंपाक तयारच होता. तिनं तिघांचीही ताट मांडली. सर्वांनी पोट भरुन जेवल्यानंतर, तोंड भरुन सुनीताचं कौतुक केलं…’पुरणपोळी खावी तर, तुझ्याच हातची!!’
सुनीता सुखावली. आईनं तिला घडवलं होतं, त्यामुळेच आज ती एक यशस्वी शिक्षिका, सुशील पत्नी, सुजाण आई व प्रेमळ सासू होती.. आजच्या पुरणपोळीच्या बेताने तिला भूतकाळातील आनंद, चक्रवाढ व्याजासह वर्तमानकाळात मिळाला होता…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१३-८-२१.
Leave a Reply