प्रसिद्ध पियानो वादक, जाझ संगीत वादक व भारतीय जॅझ संगीताचे पितामह लुईस बँक्स यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला.
लुईस बँक्स म्हणजे भारतीय जॅझ संगीताचे पितामह. ते मुळचे नेपाळचे. पाश्चिमात्य संगीतावर विलक्षण प्रभुत्व असलेल्या लुईस यांनी आपल्या संगीताने त्यांनी रसिकांना व स्वत:ला चिरतरुण ठेवले. अशा या जाझ संगीत वादक लुईस बँक्स लुईस बँक्स हे स्वतंत्रपणे पाश्चात्य संगीतकार आहेत.
`मिले सूर मेरा तुम्हारा…’ या साडेतीन मिनिटांच्या जिंगलचे सूर निनादू लागले दूरदर्शनवरुन १९८८ साली. सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला या गाण्याने. मिले सूर मेरा तुम्हाराचे मुळ कडवे हिंदीतून लिहिले होते प्रसून पांडे यांनी. तेच कडवे आणखी १२ भाषांत अनुवादित करण्यात आले. विविध भाषांमध्ये नामवंत गायकांनी आळवलेल्या `मिले सूर मेरा तुम्हारा’ या जिंगलची मुळ भैरवीतील चाल बांधली होती प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांनी. ही जिंगल जेव्हा सुरू होते तो प्रारंभीचा वाद्यमेळ, प्रत्येक भाषेतील कडव्यामध्ये येणारा तसेच हे गाणे जेव्हा अंतिम चरणापर्यंत येते तेव्हा कानावर पडणारा वाद्यसाज ही म्युझिक ॲरेंजमेंटची सगळी किमया होती लुईस बँक्स यांची. त्यांचे संगीतातील कर्तृत्व विविधांगी आहे. लुईस बँक्स म्हणजे जिंगल्सचा जादूगार.
लुईस बँक्स यांनी पंधरा हजार हून अधिक जाहिरातींच्या जिंगल्स तयार केल्या आहेत. लुईस बँक्स हे मुंबईत येण्यापूर्वी कोलकातात हॉटेलमध्ये जॅझ बँडमध्ये वाजवत असत. लुईस बँक्स हे आर. डी. बर्मन यांचे ॲरेंजर मनोहरी सिंग यांचे नातेवाईक होत. मनोहरी सिंग यांनीच लुईसना मुंबईत आणले. तेव्हा आर. डी. बर्मन यांचा जमाना होता. आर. डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्यांमधे वाद्यवादन करण्याचे काम लुईस करु लागले. लुईस बँक्स यांचे वैशिष्ट्य असे की ते पाश्चिमात्य संगीतात माहिर आहेत. संगीतात जे जे नवीन तंत्रज्ञान यायचे ते बँक्स लगेच आत्मसात करायचे. पाश्चिमात्य वाद्य कसे वाजवायचे हे शिकण्यासाठी लोक लुईस यांच्याकडे आवर्जून यायचे. बँक्स सिंथेसायझरची कॉड कसे देतात हे पाहाणेही खूप काही शिकवून जायचे. लुईस बँक्स व केरसी लॉर्ड हे आर.डी.कडे सिंथेसायझर वाजवायचे. लुईस बँक्स यांना संगीतातल्या नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. आपल्याला पाश्चिमात्य संगीत उत्तम येते या गोष्टीवरच ते समाधानी राहिलेत असे कधी झालेले नाही. त्यांना आपल्याकडील संगीताचे ज्ञान दुसऱ्यांना देण्यात आनंद वाटतो.
लुईस बँक्स यांना पाश्चिमात्य संगीताबद्दल लेक्चर देण्यासाठी अमेरिका, इंग्लंड अशा अनेक देशांत बोलाविले जाते.
भारतीयांसाठी ही बाब निश्चितच अभिमानाची आहे. लुईस बँक्स हे कुणाशीही स्पर्धा करत नाही.
भारतीय जॅझ संगीतातील गॉडफादर असा ज्यांचा गौरव होतो त्या लुईस बँक्स यांनी संगीतकार म्हणून या क्षेत्रातील प्रत्येक बाजू आत्मसात केली आहे. चित्रपटांच्या गाण्यांची रचना ते ध्वनिमुद्रण यांपासून सर्वच अंगांमध्ये ते वाकबगार आहेत. पण त्यांची संगीत जगातला ओळख आहे ती ‘की-बोर्ड किंग’ म्हणून. इंडीपॉप, प्रागतिक आणि समकालीन जॅझ तसेच इंडो जॅझ फ्युजनमध्ये त्यांनी लीलया काम केले आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन झालेला लुईस बँक्स यांनी ज्या जाहिरात जिंगल्स बनविल्या त्यातील गोल्ड स्पॉट- द झिंग थिंग, कॅडबरी– क्या स्वाद है, हमारा बजाज यांसारख्या जाहिरातींच्या जिंगल खूपच लोकप्रिय झाल्या होत्या.
बँक्स यांनी हम, हुकुमत, बरसात, डुप्लिकेट, औजार, दिव्यशक्ती आणि सुर्यवंशी आदी चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत तयार केले आहे. चित्रपट, टीव्ही मालिका आणि टीव्ही टॉक शो, जाहिराती, नाटके, राष्ट्रीय एकात्मता चित्रपट, लघुपट आणि फॅशन शो यांसारख्या वैविध्यपूर्ण माध्यमांमध्ये काम करणारे ते एकमेव संगीतकार आहेत.
ही कलात्मक कामगिरी पाहून `हमारा लुईस बँक्स…’असेच प्रत्येक रसिकाला त्यांच्याबद्दल वाटत असेल हे नक्की.
लुईस बँक्स यांचा मुलगा जिनो बँक्स हा प्रख्यात ड्रमर आहे.
लुईस बँक्स यांची स्वतःची वेबसाईट आहे, तेथे त्यांच्याबद्दल, त्यांच्या एकूण संगीत प्रवासाबद्दल बरीच माहिती आहे, ती येथे जरूर पहा.
https://www.youtube.com/watch?v=TNiT3wWx0KI
— समीर परांजपे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply