ते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे.
पण.. बोलणं कधी झालं नाही.
कधी कधी ते एकाच तलावात पोहायला जायचे.
पण.. त्यावेळी इतकी गर्दी असायची की त्यांना काही बोलता यायचं नाही.
कधी ते फिरायला गेले तर लांबूनच चालाचये.
त्यामुळे.. बोलणं नाही तर फक्त बघणं व्हायचं.
गेलं वर्षभर तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहात होता.
आज तो हात ताणून आरामात निवांत पडला होता इतक्यात त्याच्या बाजूला ती येऊन बसली.
वाऱ्यावर हात हलवत तो म्हणाला,“व्वा! खूप दिवसांनी भेट झाली.”
ती इतकी भिजली होती की तिला पटकन काही बोलताच आलं नाही.
त्याचवेळी बाजूला लोंबकळणारा रुमाल म्हणाला,“फारच आवडली वाटतं ही साडी तुला? ही तुझ्यासारखी प्युअर कॉटन नाही बरं…”
बॉर्डर झटकत साडी म्हणाली,“मी प्युअर सिल्क आहे! झुळझुळीत अन् सुळसुळीत..”
इतक्यात मागच्या तारेवरचा टी शर्ट म्हणाला,“झुळझुळीत आणि सुळसुळीत पण वापरुन-वापरुन झाली आहे मुळमुळीत आणि पुळपुळीत!! हॅऽऽहा!”
टी शर्टचं बोलणं ऐकून साडी काळवंडली.
तिच्या काठावरचं डिझाइन दु:खाने वाकडंतिकडं झालं.
संतापून हात उगारत शर्ट म्हणाला,“एऽऽ एक बटण्या”, जरा कॉलर सांभाळून बोल. काही लहान मोठं आहे की नाही? अरे एका साडीच्या वजनात तुझ्यासारखे छप्पन मिळतात!”
हे ऐकताच टी शर्ट धुसफूसू लागला.
तेव्हा पाय उडवत पँट म्हणाली,“एऽऽ पुन्हा असं कुणाला बोललास तर तुझा गळाच फाडून टाकीन.
या घरातले आपल्याला एकत्रच धुतात, एकत्रच पिळतात आणि सरळ रांगेत वाळत घालतात. आपण सारे सारखे.
नो झगडा. ओके?”
एक बटण्याने कॉलर हलवली तेव्हा साडीची बॉर्डर खुलली.
साडी लाजत म्हणाली,” मिस्टर शर्ट, तुम्ही मला दहा वर्षापूर्वी पाहायला हवं होतं. आता त्या मशीनमधे गरगर फिरुन थोडा रंग उतरलाय माझा. पूर्वी फक्त सणासुदीलाच मी बाहेर पडायचे..”
“परवा मी तुम्हाला नाटकाला पाहिलं. अगदी व्यवस्थित चापूनचोपून बसला होतात तुम्ही.” मिस्टर शर्टनी असं म्हणताच..
साडी फणकारली,“नाव काढू नका त्या नाटकाचं.”
“काय झालं काय एव्हढं चिडायला?” लेडीज रुमालाने विचारलं.
पदर हलवत साडी बोलू लागली,“त्या दिवशी खूप दिवसांनी मी मिस्टर शर्टना पाहिलं. खरं सांगते, पाहता क्षणीच ते मला आवडले. चकचकीत बटणं, स्टाइलीश कॉलर आणि बेस्ट मटेरियल.
मी ब्लाउजला म्हणालेच “याचं नाव मिस्टर रुबाबदार” असणार.
नाटकाच्या इंटरव्हलला यांची व्यवस्थित ओळख करुन घेऊ असं मी ठरवलं होतं.”
साडीला थांबवत रुमाल म्हणाला, “अगं तुझं बोलणं म्हणजे, फॉल वितभर आणि साडी हातभर.” काय झालं ते पटकन सांग. नाहीतर तुझं बोलणं संपेपर्यंत मी सुकून जायचो.”
पदरामागून मिस्टर शर्टांकडे पाहात साडी म्हणाली,“त्या दिवशी इंटरव्हलला मी भाजून निघाले..”
“बापरे! काय केलं काय या शर्टाने तुला?” असं लेडीज रुमालाने विचारताच शर्टाची बटणं चमकली!
“इंटरव्हल झाल्यावर ती कागदाच्या ग्लासात कॉफी घेऊन आली. आणि मिस्टरांच्या बाजूला बसून पिऊ लागली.
इतक्यात नाटक सुरू झालं.
त्यावेळी नाटकात काय झालं कुणास ठाऊक?
पण.. ती घाबरुन असं काही ओरडली की तिच्या हातातली सगळी गरमागरम कॉफी माझ्या अंगावर सांडली…ठ साडीला थांबवत टी शर्ट म्हणाला,“बरं झालं गरम कॉफी सांडली..”
हे ऐकताच पॅण्टीने पाय उगारला आणि शर्टाचे हात शिवशिवू लागले.
“बरं झालं कारण, त्यामुळे तर हिला लगेच आपल्या सोबत धुतलं आणि मिस्टरंाच्या बाजूला सुकत टाकलं” असं टी शर्टने म्हणताच शर्टाची कॉलर लाजली आणि तिचा रंग बदलला.
पॅण्ट म्हणाली,“ही झाली अर्धीच स्टोरी.
पण.. खरी लव्ह स्टोरी तर पुढेच आहे आणि ती फक्त मलाच माहित आहे.
ती सांगू की नको.. .. याचा मी विचार करते आहे.”
काकूळतीला येऊन रुमाल म्हणाला,“लवकर सांग. मी सुकत आलोय. एकदा का आपल्याला तारेवरुन खेचलं की पुन्हा बाजूबाजूला कधी येऊ कुणास ठाउक?
“कपड्यांचे योगायोग काही शिवता येत नाहीत ते त्यांच्या धाग्यातच असावे लागतात” असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही. चल सांग..”
पॅण्ट सांगू लागली, “कॉफी सांडली त्यावेळी माझं लक्ष नव्हतं.
पण.. इतक्यात मिस्टर शर्टांची चुळबूळ वाढली.
माझ्यात खोचलेला शर्ट उसळी मारुन बाहेर येऊ लागला.
शर्टाचा हात जोरात हलला आणि साडीवर मिस्टरांच्या हातातलं कोल्ड ड्रिंक सांडलं.
मी चाटच पडले!
इतक्यात.. मिस्टर शर्ट मला हळूच म्हणाले, “अगं मिसेसच्या अंगावर गरम कॉफी सांडली.. भाजलं असेल साडी ला. म्हणून मग केली चुळबूळ. पण आता थंडगार शिडकावा झाल्यावर बरं वाटेल तिला!” आता मला सांगा आहे की नाही ही खरी लव्ह स्टोरी?”
खरी लव्ह स्टोरी पुढेच आहे” रुमाल सांगू लागला,“या सांडासांडी नंतर त्यांनी मला बाहेर काढलं. आणि पाहतो तर काय..
हाडामांसाचे मिस्टर आणि मिसेस एकमेकांशी भांडताहेत.
तर.. आपले मिस्टर कॉटन आणि मिसेस सिल्क एकमेकांकडे लाजून बघताहेत!!
सांगा बरं आता ही खरी लव्ह स्टोरी कुणाची?”
हे ऐकताच सगळे सुके कपडे आनंदाने जोरजोरात फडफडले.
– राजीव तांबे.
Leave a Reply