गीतकार व संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म ११ डिसेंबर १९४२ रोजी झाला.
आनंद शंकर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील (सध्याचे उत्तराखंड) अल्मोडा येथे प्रख्यात बंगाली संगीतकार कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रख्यात शास्त्रीय नर्तक उदय शंकर आणि आई अमला शंकर होते. त्यांच्या बहिणीचे नाव ममता शंकर होते. ते प्रसिद्ध सितार वादक पंडित रविशंकर यांचे पुतणे होते. त्यांनी आपल्या काका पंडित रविशंकर यांच्याऐवजी वाराणसीचे डॉक्टर लालमणी मिश्रा यांना संगीत शिक्षणासाठी गुरु म्हणून निवडले होते. नंतर त्याने तनुश्री शंकरशी लग्न केले. त्यांचे शिक्षण ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) मधील सिंधिया स्कूलमध्ये झाले. भारतीय संगीत शैलींमध्ये पाश्चात्य संगीत शैलीचे उत्कृष्ट मिश्रण मिसळून त्यांनी संगीताला एक नवीन रूप दिले.
आनंद शंकर यांनी १९६० च्या दशकात लॉस एंजेलिसचा दौरा केला. येथे त्यांनी रॉक संगीतकार ‘जिमी हेंड्रिक्स’ सारख्या पाश्चात्य संगीत दिग्गजांसोबत काम केले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १९७० साली त्यांचा पहिला संगीत अल्बम प्रसिद्ध झाला. इथेच त्यांनी सतारीवर आधारित ‘रोलिंग स्टोन्स’, ‘जम्पिन जैक फ़्लैश’ व ‘लाइट माय फायर’ यासारख्या वेस्टर्न हीट केल्या की ज्या खूप लोकप्रिय झाल्या. भारतात परतल्यावर, आत्मविश्वासाने भरलेल्या शंकर यांनी संगीतातील प्रयोग सुरूच ठेवला. १९७५ साली आनंद शंकर यांनी किबोर्ड आणि पारंपारिक भारतीय वाद्यांच्या माध्यमातून ‘आनंद शंकर अँड हिज म्युझिक’ अल्बमद्वारे संगीतात विशेष योगदान दिले. १९७८ ते १९८१ पर्यंत त्यांनी इंडियन रिमेम्बर्स एल्विस, ए म्यूजिकल डिस्कवरी ऑफ इंडिया, मिसिंग यू , स्पेस थीम्ड-2001, जंगल सफारी-तिन्गेड सा-रे-गा मचन असे पाच खास अल्बम काढले. १९९०च्या दशकात जेव्हा डीजेची संस्कृती तयार होऊ लागली, तेव्हा आनंद शंकर यांनी डिस्कोला अनुरूप संगीत देण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये ‘ब्लू नोट्स’ अंतर्गत ‘ब्ल्यू ज्यूस व्हॉल्यूम १’ नावाचा त्यांनी नवीन अल्बम केला. नंतर त्यांचे स्ट्रीट्स ऑफ कलकत्ता व डांसिंग ड्रम्स हे दोन अल्बम प्रसिद्ध झाले. त्यांचा सर्वात लोकप्रिय अल्बम होता ‘आनंद शंकर अँड हिज म्युझिक’, ज्यामध्ये एकाच वेळी सितार, गिटार, तबला, मृदंगम, ड्रम आणि मोग सिंथेसाइझर्सचा समावेश होता. हाच अल्बम २००५ साली त्यांच्या मरणोत्तर पुन्हा लाँच केला गेला. ‘दूरदर्शन’ वरील लोकप्रिय मालिका ‘व्योमकेश बक्षी’ला त्यांनी संगीत दिले होते. २०१० आणि २०११ या वर्षात आनंद शंकर यांचे संगीत एनबीसीवर प्रसारित झालेल्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या अनेक भागांमध्ये दाखवले गेले होते.
आनंद शंकर यांचे २६ मार्च १९९९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply