नवीन लेखन...

एम. एस. सुब्बुलक्ष्मी

प्रसिद्ध राजकीय इतिहासकार प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या आजवरच्या जडणघडणीवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि विचारांचे भव्य दालन खुले करून देते. त्यातील विसाव्या शतकात समाज आणि संस्कृतीच्या अंगाने होत गेलेल्या वैचारिक स्थित्यंतराचा वेध घेणाऱ्या ‘ओपनिंग रोझबड्स’ या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यावरील लेखावर आधारित हे टिपण…

संस्कृती ही एकरेषीय संकल्पना नाही. ती कप्प्या-कप्प्यातही मांडता येत नाही. कारण ती व्यामिश्र, गुंतागुंतीची, खूपशी व्यापक-पसरट अशी असते. ज्या देशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम व जैन धर्म एकाच वेळी नांदले, त्या देशाची सांस्कृतिक व्याख्या संकुचित धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. प्रसिद्ध विचारवंत प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या सांस्कृतिक विश्वाच्या खोल गुहेत अलगद घेऊन जाताना याच वास्तवाची खोलवर जाणीव करून देते.

गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवाजींपर्यंत व पुढे विल्यम जोन्सपासून धीरुभाई अंबानी यांच्यापर्यंत ५० लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांचा वैचारिक वेध घेत हे पुस्तक आपल्याला भारताच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या बौद्धिक संपृक्ततेचा अनुभव देते. हा वेध केवळ व्यक्तिमत्त्वांची ओळख व त्यांच्या कार्यापुरती मर्यादित नाही तर तो आपला आपल्याशी संवाद आहे. कधी हा संवाद वादविवादाचा, तर कधी आपल्या वैश्विक जाणिवा अधिक समृद्ध, विस्तारित करणारा आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या ‘भारतरत्न’ एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे काळाच्या एका टप्प्यावर प्रभाव टाकणारे रोमहर्षक जीवन या पुस्तकात समाविष्ट करून लेखकाने एक मोठे सांस्कृतिक- सामाजिक संचित नव्याने उलगडून दाखवले आहे.

भारत ब्रिटिशांची वसाहत होण्याअगोदर राजेरजवाड्यांकडून देवदासी प्रथा चालवली जात असे. परंतु ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर संस्थानिक, राजेरजवाड्यांची संस्थात्मक रचना मोडकळीस येऊन देवदासी पद्धतीचे स्वरूपही बदलू लागले. विल्यम जोन्स व अन्य ओरियँटिलिस्ट इतिहास संशोधकांनी भारतीय प्राचीन इतिहास तसेच संस्कृत भाषेच्या गौरवशाली इतिहासाची पाश्चात्त्य नजरेतून मांडणी केल्यामुळे, त्याचबरोबर अॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफी सोसायटीच्या प्रभावी चळवळीमुळे भारतीय कलांच्या सादरीकरणाला नवा आयाम मिळाला. नव्या ब्रिटिश कायद्यांमुळे या प्रथेवर बंधने आली, पण त्यात भारतीय संगीत गुदमरले नाही. अशा वातावरणात मदुराईमधल्या एका सायकल दुकानासमोर वयाच्या दहाव्या वर्षी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनास प्रारंभ झाला.

‘एम. एस.’ या आद्याक्षरांनी ओळखल्या गेलेल्या सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म मदुराईचा (१९१६). एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला. एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. याच काळात ग्रामोफोनचा शोध लागला. सामाजिक-सांस्कृतिक बंधने गळून पडत संगीताशी नाते अधिक घट्ट होत गेले.

१९३६ मध्ये सुब्बुलक्ष्मी यांची एका प्रसिद्ध मासिकात मुलाखत प्रसिद्ध झाली. या मासिकाचे संस्थापक-संपादक होते, सदाशिवम. हा काळ स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा होता. सदाशिवम हे जन्माने ब्राह्मण होते, कॉम्रेड चिदंबरम पिल्लई यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. सदाशिवम यांची सुब्बुलक्ष्मी यांच्याशी भेट झाली, तेव्हा सदाशिवम ३३ वर्षांचे होते, तर सुब्बुलक्ष्मी केवळ १९ वर्षांच्या. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मींशी लग्न करायचे होते, पण या लग्नाला सुब्बुलक्ष्मीच्या आईचा कडवा विरोध होता. आपल्या मुलीला मिळणाऱ्या पैशासाठी सदाशिवम लग्न करत असल्याचा आरोप त्या सातत्याने करत. याच काळात खुद्द सुब्बुलक्ष्मी या प्रसिद्ध कर्नाटक संगीताचे गायक व अभिनेते जी. एन. बालसुब्रह्मण्यम यांच्या प्रेमात होत्या.

सुब्बुलक्ष्मी यांनी या काळात काही प्रेमपत्रे बालसुब्रह्मण्यम यांना लिहिली होती. या पत्रात दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केलेला दिसत होता. या पत्रात तृप्ती, समाधान, स्थिरचित्त, अात्यंतिक आनंदी अशा शब्दांचा वारंवार उल्लेख केल्याचे दिसत होते. पण त्याचबरोबर सुब्बुलक्ष्मी यांना आपली आई व सदाशिवम यांच्यापासूनही दूर राहायचे होते, असेही स्पष्ट जाणवत होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. १९४०च्या आसपास सदाशिवम यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले, त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्याशी गुप्तपणे विवाह केला. सुब्बुलक्ष्मींचे संगीतावरील प्रेम व तादात्म्य वृत्तीमुळे सदाशिवम यांनी या विवाहाचा आदर राखत, त्यांच्या गायनाला अधिक अवकाश देण्याचे ठरवले. या काळात देवदासी प्रथा मोडकळीस आल्याने या प्रथेतील भरतनाट्यम हे नृत्य व कर्नाटक संगीताला उच्चवर्णीयांनी आश्रय दिल्याने त्याला अभिजनाचा दर्जा मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याचा फायदा घेत सदाशिवम यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाचे देशभर कार्यक्रम ठेवण्यास सुरुवात केली. सुब्बुलक्ष्मी यांच्या स्वर्गीय सुरात रसिक न्हाऊन जात होतेच, पण त्यांच्या अत्यंत साध्या निगर्वी व्यक्तिमत्त्वामुळे सुब्बुलक्ष्मी यांची लोकप्रियता जनमानसात उत्तरोत्तर वाढत होती.

त्या वेळच्या तामीळ चित्रपटात संगीताला विशेष स्थान मिळाले होते. त्याला अधिक उंची सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाने मिळाली होती. सुब्बुलक्ष्मी यांचा स्वर्गीय स्वर व भारतीय स्वातंत्र्यलढा तसा समांतर होता. पण त्यांच्या स्वराने या लढ्याला राष्ट्रीय अभिमानाचे रूप दिले. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मीचे जीवन पडद्यावर आणायचे होते, पण ते मांडण्यासाठी त्यांनी भक्ती संगीत परंपरेतील मीराबाई हिच्या जीवनप्रवासाचा आधार घेतला. १९४५मध्ये ‘मीरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तामीळ भाषेबरोबर हिंदीतही डब करण्यात आला. हा चित्रपट पाहून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, “संत मीरा यांचा जीवनप्रवास हा भारतातील श्रद्धास्थानांचा, भक्तीमार्गाचा व अलौकिक स्वर्गप्राप्ती देणाऱ्या परंपरांचा आहेच, पण सुब्बुलक्ष्मी यांची या चित्रपटातील अदाकारी पाहता त्यांनी साकारलेली मीरेची व्यक्तिरेखा मीरेची नाही, तर खुद्द त्यांचीच भासते आहे.” सदाशिवम यांना जे अपेक्षित होते, ते त्यांना मि‌ळाले.

सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय पातळीवर नेण्याची पराकाष्ठा सदाशिवम करत होते, त्यात त्यांना यश मिळत गेले. त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय नेत्यांमध्ये पोहोचवले. म. गांधी, नेहरू यांच्यापुरते ते मर्यादित न राहता परदेशात, युनोमध्ये त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. पं. नेहरूंनी त्यांना ‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले. रुग्णालये, शाळा, अनाथाश्रम, क्षयरोग केंद्रे ते हिंदू देवळे अशा सार्वजनिक ठिकाणी सुब्बुलक्ष्मी यांनी हजारो कार्यक्रम केले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला. सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने विनम्रता, एकनिष्ठा, ईर्षा, महत्त्वाकांक्षा, निराशा, अलिप्तता आदी भाव-भावनांचे दर्शन होत गेले.

१९९७ मध्ये त्यांना केंद्र सरकारने सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. असा पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्याच गायिका ठरल्या. हा पुरस्कार सोहळा पाहण्यास सदाशिवम जिवंत नव्हते, ते एक वर्षाआधी गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर सार्वजनिक जीवनातून सुब्बुलक्ष्मी यांनी निवृत्ती घेतली होती. २००४मध्ये त्यांचे निधन झाले. संस्कृती-परंपरा-समाज राजकारण यातील परस्परप्रभावाचे, समाजाच्या वैचारिक बदल आणि उत्क्रांतीचे प्रतीक सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने सर्वार्थाने इतिहासाच्या पटलावर कोरले गेले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला…

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सुजय शास्त्री

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..