नवीन लेखन...

माघी गणेश जयंती

गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव उद्या पासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते, तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.

पूजा कशी कराल?
मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. नंतर, १६ उपचारांनी (षोडशोपचार) पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. अथर्वशीर्षाचे पठण करावे. अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशीर्षाचे पठण फलदायी ठरते. या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी ४ पर्यंत केव्हाही पूजा करावी. त्यातही माध्यान्हावेळी अर्थात दुपारी १२ वाजताची वेळ उत्तम. माघी गणेश जयंतीचा उत्सव हा एक दिवस की, त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वत:चा स्वत: घ्यावा. स्वत:च्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते. माघी गणपतीला २१ दूर्वा का वाहतात, कारण मातृदेवता २१ आहेत, असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे. त्यामुळे त्याला २१ दूर्वा वाहतात, असे म्हटले जाते. गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते. या उत्सवादरम्यान गणेशमूर्तीची पूजा करावी, याचा उल्लेख शास्त्रात नाही. प्रत्येकाने स्वत:ला शक्य असेल तसे ठरवावे. पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये. काही चुकेल, याची भीती बाळगू नये. श्रद्घेने, आनंदाने व समाधानाने पूजा करावी. श्रद्घा, पूर्ण विश्वास, मनाची एकाग्रता साधून काम होते आणि मूर्तिपूजा त्याला मदत ठरू शकते.

श्री.दा.कृ.सोमण
संकलन. – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..