नवीन लेखन...

माझे स्वच्छंदी जीवन

श्री वसंत देशपांडे यांचा हा लेख कायस्थ विकास 2023 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.


माझ्या आठवणीप्रमाणे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही पेण (कुलाबा-रायगड जिल्हा) येथून नागोठणेस आलो. त्यावेळी माझे वय होते सहा वर्षाचे. मोठ्या कुटुंबातील मी आठवे अपत्य. माझे जीवन आनंदात चालले होते. गोट्या खेळणे, बिट्ट्या खेळणे मला खूप आवडायचे. कामवाल्या बाईची दोन मुले, माझ्याच वयाची होती. त्यांच्याबरोबर गोट्या खेळणे, बिट्ट्या खेळणे हा एक आनंदाचा भाग होता. थोडे मोठे झाल्यावर म्हणजे 8/10 वयाचे झाल्यानंतर त्याच वयाच्या मित्रांबरोबर लगोरी, विटी दांडू, आबा दबी (कापडी चेंडूंनी खेळण्याचा प्रकार,) या खेळांतून शारीरिक व्यायाम भरपूर मिळाला.) हे होत असताना अभ्यास न करीता उनाडक्या करता म्हणून घरोघरी प्रत्येक मुलानं वडिलांचा मार पण खाल्लेला आहे. असे स्वच्छंदी जीवन हल्लीच्या शहरी जीवनपद्धतीतील मुलांना कुठून अनुभवायला मिळणार.

आम्ही मित्रमंडळी वय 12/13 या वयाचे जवळ असलेल्या डोंगरावरील जंगलात भटकून करवंदे, काजूची फळे पिशव्या भरून घरी आणत असू आणि घरातील मंडळींबरोबर ती फळे खाण्यातला आनंद लुटत असू. वालाच्या शेंगा मोठ्या मडक्यात उकडून (त्याला पोपटी करणे म्हणतात) सर्वांनी एकत्र बसून खात असू. हे अनुभव आजच्या मुलांना कुठून अनुभवता येणार.

नागोठण्यास असे पाहिले तर शिक्षणासाठी खास दर्जा वाटणारी शिक्षण व्यवस्था नव्हती. मराठी सातवी पास केली की एकतर नोकरी करून कुटुंब व्यवस्थेत राहा, किंवा विशेषत: स्त्रियांनी सातवी पास केली की घर सांभाळा असे जीवन होते. इंग्रजी शाळा म्हणजे इंग्रजी पहिली हा प्रकार माझे मराठी शिक्षण चालू असताना अस्तित्वात आला. माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांची इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था रोहे या तालुक्याच्या ठिकाणी केली व आम्हा भावंडांची झेप मागास समाजाकडून सुशिक्षित समाजाकडे जाऊ शकली.

नागोठण्याला ब्राह्मणांची घरे, चांद्रसेनीय कायस्थांची घरे, मराठा समाजाची घरे, मुस्लिम समाजाची घरे अशी प्रत्येक समाजाची वस्ती असलेली वेगवेगळे विभाग होते. प्रत्येक समाजाचे उत्सव त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पार पडत असत. निरनिराळ्या देव-देवतांच्या पालख्या मिरवणुकीने गावभर फिरविण्यास बाहेर काढत तेव्हा आमचे आई वडील तो सोहळा बघण्यासाठी आम्हा मुलांना झोपेतून रात्री बारा वाजतासुद्धा उठवत असत.

नागोठण्याला सन 1940 ते 1950 चा काळ एकदम खेडवळ नव्हता पण शहरीसुद्धा नव्हता. प्रत्येक समाजाच्या मोठमोठ्या म्हणजे दोन तीन मजले उंच अशा होळ्या उभारण्याची पद्धत होती. घरोघरी होळ्या छोट्या छोट्या पेटत त्या वेगळ्याच. समाजाच्या मोठ मोठ्या होळ्या नऊ दिवसाच्या असत आणि त्यांचा दिखाऊपणा भव्य असे. दररोज प्रत्येक समाजाची माणसे त्यांच्या त्यांच्या होळ्यांजवळ 12 वाजेपर्यंत जागरण करीत असत. भजी, भेळ वगैरे करून एकत्रपणे खात असत. नवव्या दिवशी बटाटावड्यासारखे स्पेशल पदार्थ बनवत. बोंबा मारल्या नाही तर ती होळी कसली. स्वरचित असलेल्या किंवा पूर्वापार म्हटल्या जाणाऱ्या काव्यांना फाका असे म्हटले जाई. ती काव्ये तरुण, वयस्कर लोकं मोठमोठ्याने गल्लीगल्लीतून फिरून म्हणत असत. त्यांचा त्या काव्यपंक्तींचा आवाज इतका मोठ्ठा असे की अंगावर पांघरूण घेऊन झोपणाऱ्यांच्यासुद्धा कानात ऐकू येत असे. ती मजा आता राहिली नाही.

तोच प्रकार गोकुळ अष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचा असे. हंडी फोडली की हंडीचे तुकडे मिळवून ते घरात जपून ठेवण्यात सर्वांनाच मोठी धन्यता वाटायची. गणपती उत्सवात ज्यांच्या घरी गणपती असत त्यांच्या घरी आरत्या झाल्यानंतर मिळणारा प्रसाद खाण्यात वेगळीच गंमत असे. दिवाळीच्या काळात पहाटे 4 वाजता काकडत्या थंडीत राक्षस म्हणून चिरोटे पायाखाली फोडून आंघोळ करण्याचा अनुभव, हा वेगळाच थरार असे. आजच्या काळात 8 वाजता उठणाऱ्यांना हा अनुभव कुठून येणार? असे स्वच्छंदी जसे जीवन मी अनुभवले तसे माझ्या वयाच्या अनेकांनी नक्कीच अनुभवले असेल. आपल्या सगळ्यांनाच त्या आठवणींवर जगणे एवढेच हातात राहिले. मी त्या आठवणी जागृत करण्यासाठीच हा लेखनप्रपंच केला.

वसंत देशपांडे
99696 22401
vasantdeshpande636@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..