नवीन लेखन...

माकड,माणूस आणि संवेदनशीलता!

नुकतीच एक अस्वस्थ करणारी बातमी मी वाचली. प्रसंग असा घडला. मोठ्या शहरातील एका कचराकुंडीजवळ एक वृद्ध माणूस निपचित पडला होता. काही लोकांनी त्याची विचारपूस करीत त्याला मदतीची तयारी दाखवली.परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाने लोकांच्या दयेस स्पष्ट नकार दिला. त्याचे कारण असे होते की त्याला त्याच्या मुलाने घरातून काढून त्या कचराकुंडीजवळ टाकून दिले होते. आता त्याच्या हताश मनात एकच भावना होती की, जर पोटच्या मुलालाच मी नकोसा असेन तर माझ्या जगण्यालाच काही अर्थ नाही.

आजच्या जमान्यात आधुनिक विचारसरणीच्या अनेकांना आपल्या वृद्ध आई-वडिलांची अडचण वाटते हे आता सर्वसंमत असे उघड गुपित आहे. तरीही त्यांना खरोखरच कस्पट समजून अक्षरश: टाकून देणे हा एक विदारक अनुभव आहे. त्या बापाच्या मनाची काय अवस्था झाली असेल बरे? सामाजिक जीवनातही असेच भीषण चित्र आहे. धर्मस्थळे, शाळा, स्थानके, बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी होणारे दहशतवादी हल्ले, बलात्कार, जाळपोळ, खून, अपहरण, दरोडे इ. अनेक प्रसंग आपल्या गावात, राज्यात, देशात, पूर्ण जगातच दररोज घडत आहेत. रोज अशा प्रकारचे कोणते ना कोणते वृत्त आपणास वाचायला, ऐकायला किंवा बघायला मिळते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर काही काळापूर्वी घडलेला एक प्रसंग आठवतो. कानपूरच्या रेल्वेस्टेशनवर विजेच्या तारेचा झटका बसून एक माकड बेशुद्ध पडले होते. त्याच्याजवळ तीन-चार माकडे होती. त्यापैकी एक जण त्याच्याजवळ गेला. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी चावणे, आपटणे, तेथेच साचलेल्या पाण्यात बुडवणे अशी वेगवेगळी त्याच्या दृष्टीने तर्कसंगत अशी तंत्रे त्याने वापरली व त्याला शुद्धीवर आणले. त्यावेळी स्टेशनवर माणसाची खूप गर्दी होती. बरेचजण त्या प्रसंगाचे चित्रीकरण मोबाईलवर करत होते. काहीजण माकडाला हाकलण्याचा प्रयत्न करत होते. बेशुद्ध माकडाला तसेच टाकून ती सर्व माकडे पळून गेली असते तरी त्यांना कोण दोष देणार होते? पण त्यांनी तसे केले नाही. जीवनदान देणारे ते माकड बेशुद्ध माकडाचे कोण लागत होते? त्यांच्यात रक्ताचे नाते होते का हे माहीत नाही पण आपुलकी व संवेदनशीलतेचे नाते तर नक्कीच होते. कोणत्याही विक्षिप्त वर्तनाला माणूस मर्कटलीला असे म्हणतो, पण त्याप्रसंगी माकडाने दाखवलेली संवेदनशीलता निश्चितच कौतुकास्पद व अंतर्मुख करणारी आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी उदाहरणे मानवी समाजात रोजच घडत आहेत. त्यामुळे पशु आणि मानव यांच्या वर्तनाची तुलना अपरिहार्यपणे मनात येते. माणूस हा माकडाचा वंशज आहे असे उत्क्रांतीवाद सांगतो. उत्क्रांती ही प्रगतीदर्शक असते. निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आदिमानव हा वनचर होता. मनुष्यप्राण्यास विचार व भाषा या दोन बौद्धिक शक्तींची विशेष निसर्गदत्त देणगी मिळाली आहे. त्यांच्या जोरावर माणूस इतर प्राण्यांना मागे टाकत श्रेष्ठ ठरला. अश्मयुग ते विज्ञानयुग एवढे प्रगतिशील परिवर्तन त्याने बुद्धीच्या जोरावर घडवले. गुहेत राहणारा आदिमानव आता अंतराळात परग्रहावर राहण्याची क्षमता धारण करतो आहे. वस्ती, शेती, समूह, समाज, शिक्षण, संस्कृती, धर्म असे विविध टप्पे गाठत तो चांगला संघटित झाला. स्थिर व शांत जीवनासाठी सामाजिक स्थैर्य आवश्यक आहे हे त्याला पटले. त्यासाठी संस्कृती व धर्माच्या माध्यमातून त्याने वर्तनावर अंकुश ठेवणारी नैतिकता निर्माण केली. आज सर्वच क्षेत्रात माणूस एवढी प्रगती करत असताना त्याचे नैतिक अधःपतन मात्र का बरे होत आहे? उत्क्रांती अशी उलट दिशेने कुठे चालली आहे? एवढा द्वेष, एवढे क्रौर्य माणसात आले तरी कुठून? माणसाच्या क्रूर वागण्याला आपण पाशवी म्हणतो, पण पशू तर असे वागत नाहीत. सुरक्षा व भुकेचा प्रश्न निर्माण झाल्याखेरीज व पिसाळल्या खेरीज प्राणी कुणावर हल्ला करत नाही. बलात्कार किंवा अपहरणही करत नाही. पशुत्वाच्याही खालची पातळी आता माणूस गाठतो आहे.

भूक, किळस, जिज्ञासा, भय, राग, मैथुन, वात्सल्य या माणसाच्या सहज प्रवृत्ती आहेत. पण तो केवळ सहजप्रवृत्तीं नुसार वागत नाही. बुद्धी व विचारशक्तीचा उपयोग करून सहज प्रवृत्तींवर नैतिकतेचा अंकुश लावणे आणि त्यांचे उदात्तीकरण करणे हा मनुष्य धर्माचा एक विशेष आहे. म्हणून तो उच्च कोटीतला प्राणी आहे. प्रकृतीला तो संस्कृतीचे आवरण घालतो. सहज प्रवृत्तींचा अविष्कार जेवढा वैध मार्गाने होतो तेवढा माणूस सुसंस्कृत मानला जातो. मात्र माणसाचे असेही एक दुर्दैव आहे की त्याची बुद्धी नेहमीच योग्य मार्गाने चालत नाही. तो एकीकडे विश्व धर्माची भाषा करतो, त्याच वेळी लिंग, जात, धर्म, प्रांत, राज्य, राष्ट्र, भाषा या विविध कप्प्यात व वादांमध्ये विभागला जातो. तो भौतिक प्रगतीच्या धुंदीत इतका मग्न झाला आहे की आत्मिक प्रगतीचे त्याचे भान सुटले आहे. हवे ते मिळालेच पाहिजे. मिळत नसेल तर हिसकाऊन घ्यायला हवे ही वृत्ती प्रबळ होत आहे. चंगळवादाच्या वादळात संवेदनशीलता दूर कुठेतरी भिरकावली गेली आहे.
म्हणून तर माणूस ज्याचा वंशज आहे, ते माकड जेवढी संवेदनशीलता दाखवते तेवढी माणसाला जमत नाही. कवी सौमित्र यांच्या फार उत्कट ओळी आहेत….

‘माझ्या ओंजळीत उरले आता एकच शुभ्र कबूतर,
गिधाडांनी आभाळ आणि गच्च भरून आले वर ‘

परिवर्तनाचे हे उलटे चक्र थांबवता नाही का येणार? संपूर्ण समाज बदलण्याची क्षमता आपल्यासारख्या सामान्य माणसात आहे का? या प्रश्नाला हे उत्तर आहे की समाज जरी मी बदलू शकत नसेल तरी स्वतःला तर निश्चित बदलू शकतो. व्यक्तिव्यक्तिने समाज बनतो. थेंबे थेंबे साचणाऱ्या तळ्यासारखा. आपल्या सद्वर्तनाचे, माणुसकीचे थेंब तर आपण समाजतळ्यात टाकू शकतो.
नाहीतर असे होईल… पुन्हा सौमित्रच्या शब्दात ..
‘ देव,अल्ला,गॉड फक्त एवढेच शब्द लिहू लागतील,
मुलं आता हळूहळू शाळेत जायला भिऊ लागतील.’

आराधना कुलकर्णी

Avatar
About सौ. आराधना अनिल कुलकर्णी 5 Articles
सेवानिवृत्तजेष्ठ अधिव्याख्याता.कथालेखन व अनुवाद. काही पुस्तके प्रकाशित. वृत्तपत्रीय प्रासंगिक लेख व दै. प्रजपत्र साठी सदर लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..