मातीमोल म्हणजे मूल्यहीन! मातीत शेती फुलते. शेतीला प्रतिष्ठा नाही म्हणून मातीला मोल नसल्याची चुकीची भावना बळावली असण्याची शक्यता आहे.
खडकांची झीज होऊन माती तयार होते. ठिसळ गहू-ज्वारीचे पीठ दळायला दहा अश्वशक्तीची चक्की लागते. मग पाषाणहृदयी, वज्रतुल्य, कठीण खडकांची माती करायला निसर्गाला किती बळ आणि वेळ खर्च करावा लागत असेल? अशा महत्प्रयासाने तयार झालेल्या संपत्तीला मातीमोल ठरविणारे हे कोण असे पंचांगपंडित?
मातीचा १५ सें. मी. थर नसता तर जमिनीवर जीवसृष्टी अस्तित्वातच आली नसती. माती आहे म्हणून वनस्पती आहे आणि वनस्पती आहे म्हणून प्राणी आहेत. आता बोला मातीचे मोल?
माती निसर्गाचा एक अजब चमत्कार आहे. एकच माती, पण तिच्या चवी किती प्रकारच्या? आंबट, तिखट, कडू, गोड, खारट, तुरट आणि या सर्वांचे हजारो संमिश्र स्वाद! आहे की नाही गंमत? एवढ्या गुणसंपन्न मातीला मातीमोल म्हणून संभावना करणारे किती अरसिक म्हणावेत?
हजारो वर्षे भुतासारखे खपून निसर्ग माती तयार करतो आणि करंटा माणूस तिच्यावर वरवंटा फिरवितो. निचऱ्याच्या नाड्या बंद केल्या जातात, तिच्यात नको तेवढी रसायने ओतली जातात, महाकाय यंत्रे तिचे ऊर दाबून टाकतात. अन्नद्रव्याचे शोषण अव्याहत चालू असते. उपजाऊ जमिनीला मरणोन्मुख बनवून कंगाल झालेली कृषी संस्कृती तिच्या उशाला अश्रू ढाळत बसलेली दिसते.
मानवाने दानवाचा अनुनय करण्याचा चंग बांधला असल्यामुळे त्याने झाडे-झाडोरा छाटून टाकला. त्यामुळे जमिनीची धूप सातत्याने होते आणि मातीचा वरचा थर वाहून जातो. भोंगळी झालेली धरणीमाता सर्व आघात सोसत उघड्यावर पडली. ऊन, थंडी, वारा, पाऊस यांच्या माऱ्याने तिचा देह छिन्नविच्छिन्न केला.
एका एकरातून वर्षाला शेकडो टन माती वाहून समुद्रात लुप्त होत असेल तर पृथ्वीवर मानववंशाचे किती दिवस राहिलेत त्याचा अंदाज बांधता येईल. जमीन खंगत आहे… हाक ना बोंब !
मातीमोल समजायची मानसिकता बदलावी लागेल.
प्रा. बापू अडकिने, परभणी
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply