लहानपणी आपल्यासाठी आईने स्वतःच्या हाताने केलेले अंगडे टोपडे किंवा कानटोपी, उतारवयात जर हातात आली तर आपलं मन त्या भूतकाळात जातं.. त्या कापडाचा स्पर्श, आपल्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो..
माझे रमेश चव्हाण नावाचे एक लेखक मित्र आहेत. मी त्यांच्या घरी गेलेलो असताना त्यांनी मला त्यांच्या लहानपणी वापरलेले खणाच्या कापडाचे, गोंडेदार अंगडे टोपडे दाखवले.. त्याशिवाय त्यांच्या आजोबांनी वापरलेला नक्षीकामाची कलाकुसर असलेला दुर्मिळ अडकित्ताही दाखवला.. या वस्तू मला दाखवताना, ते काही क्षणांसाठी वर्तमानातून भूतकाळात गेलेले होते..
संवेदनशील माणसंच अशा वस्तू जिवापाड प्रेमानं जपून ठेवू शकतात. आता ‘युज अॅंड थ्रू’चा जमाना आलेला आहे. अलीकडच्या वस्तूही तेवढ्या टिकाऊ नसतात..
माझे मित्र, केदार यादव हे उत्तम चित्रकार आहेत. त्यांनी परवा गप्पा मारताना, त्यांच्या एका मित्राची गोष्ट मला सांगितली…
सचिन हा लहानपणापासूनच त्याच्या आईचा अत्यंत लाडका. एकुलता एक असल्याने आईच्या सहवासातच तो लहानाचा मोठा झाला. वडीलांचही त्याच्यावर प्रेम होतंच, तरीदेखील आईशिवाय त्याला करमत नसे.
सचिनचं शिक्षण झालं. नोकरी लागली. योग्य वयात आई-वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. सचिन संसारात रमला. आई वयोमानानुसार थकत चालली होती. वडील निवृत्त झाले. एव्हाना त्यानं स्वतःचा टुमदार बंगला बांधला होता. आजी-आजोबा आता नातवंडांमध्ये रमले होते.
काही वर्षांनंतर वडिलांची तब्येत बिघडली. हृदयविकाराच्या झटक्याने ते गेले. आता सचिनला आईची सोबत महत्त्वाची वाटू लागली. तो तिची अधिक काळजी घेऊ लागला. एक दिवस आईचं बाथरूममध्ये घसरुन पडण्याचं निमित्त झालं आणि तिला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. उपचार चालू असतानाच तिची तब्येत बिघडली आणि ती गेली. सचिनला मोठा मानसिक धक्का बसला..
त्यानंतर सचिनची दिवसेंदिवस झोप कमी होऊ लागली. त्याने डाॅक्टरांचा सल्ला घेतला. जवळच्या नातेवाईकांनी सांगितललेले उपाय करुन पाहिले.. मात्र झोप काही लागेना.. रात्रभर तो तळमळत राही.
सचिनची केदारशी भेट झाल्यानंतर केदारने त्याला सल्ला दिला. त्याने सचिनला विचारले, ‘तुझ्या आईच्या साड्या, घरातील कपाटात असतीलच ना? त्यातील चार साड्या काढ व त्यांची एक रजई करवून घे. रात्री झोपताना, ती अंगावर घेतलीस तर तुला आईच्याच सहवासात असल्यासारखं वाटेल आणि शांत झोप लागेल.’
सचिननं तसं केलं. त्या चार साड्यांपासून तयार केलेल्या रजईमुळे त्याला ‘मायेच्या उबेत’ शांत झोप लागू लागली. जणू तो पुन्हा आपल्या आईच्या कुशीत झोपी जाऊ लागला होता…
ही एक सत्यकथा आहे. सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती गेल्यावर तिच्या वापरातील सर्व गोष्टी नाहीशा केल्या जातात. मात्र त्या ठेवल्या तरी, त्याचा असाही उपयोग होऊ शकतो.. ती वस्तू त्या व्यक्तीच्या आठवणींचं प्रतिनिधित्व करीत, आशीर्वाद देत राहते..
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१७-८-२१.
Leave a Reply