
राम गणेश गडकरी यांना जाऊन १०३ वर्षे झालेली आहेत.. अवघं ३४ वर्षांचंच आयुष्य या सरस्वती पुत्राला मिळावं, याचं मनस्वी दुःख होतं. महाराष्ट्राचा हा शेक्सपिअर जर दीर्घायुषी जगला असता तर मराठी साहित्यात, नक्कीच मोलाची भर पडली असती.. मोजून पंचाक्षरी पाचच नाटकं, विनोदी लेखन व काव्य लिहून हा साहित्य सम्राट अकालीच अनंतात विलीन झाला.
२६ मे १८८५ रोजी गुजरात मधील नवसारी येथे त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण रामनगर येथे झाले. त्यानंतरचे कर्जत व पुणे येथे झाले. १९१२ साली राम गणेश गडकरी फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.
किर्लोस्कर नाटक मंडळीतील नाटकात काम करणाऱ्या मुलांचे, ते मास्तर होते. काही काळ त्यांनी विदर्भातील बाळापूर येथे शिक्षकांची नोकरी केली. नंतर ते पुन्हा पुण्यात आले व ‘ज्ञानप्रकाशा’त उपसंपादकाचे काम करु लागले.
पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्येही त्यांनी शिक्षक म्हणून काही वर्षे नोकरी केली. दरम्यान त्यांचे लेखन चालूच होते.
त्यांच्या विनोदी लेखनावर त्यांचे गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा प्रभाव, त्यांच्या संस्कारक्षम वयातच पडलेला होता.
वयाच्या १७ व्या वर्षांपासूनच राम गणेश गडकरी यांनी लेखनास सुरुवात केली होती. काव्यलेखनात, केशवसुतांचे ते पक्के ‘चेले’ होते.
त्या काळातील ‘रंगभूमी’ मासिकात ते ‘सवाई नाटकी’ या टोपणनावाने लेखन करीत असत. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ व ‘राजसंन्यास’ या पाच नाटकांतूनच राम गणेश गडकरी, हे किती थोर नाटककार होते हे समजते..
‘एकच प्याला’ तील सिंधू, सुधाकर, तळीराम व गीता. ‘भावबंधन’ मधील धुंडिराज, लतिका, घनःश्याम, कामण्णा. ‘प्रेमसंन्यास’ मधील गोकुळ. ‘पुण्य प्रभाव’ मधील कालिंदी. ‘राजसंन्यास’ मधील तुळशी. या गडकरींच्या नाटकातील व्यक्तिरेखा अजरामर आहेत..
गडकरींचं समग्र काव्यलेखन ‘वाग्वैजयंती’ या संग्रहात समाविष्ट केलेलं आहे. १९६३ साली ‘अप्रकाशित गडकरी’ हे आचार्य अत्रे यांनी, संपादित केलेलं पुस्तक प्रकाशित केलं.
२३ जानेवारी १९१९ रोजी राम गणेश गडकरी हे विदर्भातील सावनेर येथे क्षयाने आजारी असताना, ‘भावबंधन’ नाटकातील शेवटचा अंक लिहून इहलोक सोडून गेले..
त्यांचं ‘भावबंधन’ हे नाटक मी भरत नाट्य मंदिर येथे लहानपणी पाहिलेलं आहे. त्यावेळी ‘घनःश्याम’ची भूमिका चित्तरंजन कोल्हटकर करायचे. त्यातील शेवटच्या अंकातील घनःश्याम व लतिका यांचे संवाद, मला अजूनही आठवतात..
मी स्वतःला भाग्यवान समजतो, की १९९० साली याच राम गणेश गडकरी यांच्या पत्नी, पार्वती पायथ्याशी एका इमारतीत रहात होत्या. त्यांना प्रत्यक्ष भेटलो.. त्यांचे आशीर्वाद घेतले..
संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण, आचार्य अत्रे यांच्या हस्ते झालेले आहे. आज तो पुतळा हटवला गेला असला तरी, प्रत्येक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांच्या हृदयात, तो शतकानुशतके विराजमान रहाणार आहे!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२३-१-२२.
Leave a Reply