पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुलांमध्ये मिसळण्यात खूप आनंद वाटे. ते त्यांच्याशी खेळतही.
एकदा तीन मूर्ती भवनमध्ये लहान मुलांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी देशातल्या प्रत्येक प्रांतातली मुले आपापल्या पारंपरिक स्थानिक वेशभूषेत नटून थटून हजर होती. ही मुले आपापल्या प्रांतांची लोकगीते म्हणून दाखवत होती. आपल्या भारतीय भाषांमध्ये लोकगीतांचा, लोकसंगीताचा समृद्ध असा खजिना आहे. त्याचेच मनोहारी रूप मुलांच्या कार्यक्रमातन दिसून आले. या कार्यक्रमात कवी डॉ. बच्चन यांनी ‘ऑथेलो’ मधून घेतलेले एक छान बालगीत गायले होते. त्याचे शब्द असे होते.’
एक मोठा राजा होता, त्याने शिवली विजार…’
पंडितजींचा स्वभाव निरागस व बाल्यवत होता. पंडितजी आले. पंडितीजींचा रुबाब पाहून मुले बावरली. ती बावरून दबून बसली. पंडितजींनी मुलांचे चेहरे पाहूनच ओळखले की, मुलांच्या चेहऱ्यावर ताणतणाव आहे. हे गंभीर वातावरण बदलण्यासाठी पंडितजी पायातील जोडे न काढता तसेच गालिच्यावर मांडी घालून बसले. एका पायातील जोडा काढून त्यांनी तो दूर फेकला व म्हणाले, “ते बघा मांजर पळाले. ‘
आणि ताबडतोब दुसऱ्या पायातील जोडा काढून दूर सरकवला व म्हणाले ‘आणि हा आला उंदीर”.
सारी मुले खळखळून हसली. वातावरण प्रसन्न मोकळे झाले. मुले उत्तेजित झाली. आणि मग गाणी म्हणण्यासाठी मुलांची चढाओढ सुरू झाली.
या कार्यक्रमात केरळच्या एका मुलाने मल्याळम् भाषेत एक गाणे गायले. पंडितजींनी त्या मुलाला त्याचा अर्थ विचारला तेव्हा तो म्हणाला, “याचा अर्थ असा आहे की, बळीराजाच्या राज्यात कुणी दीन नव्हते की दुःखी नव्हते, कुणी खोटेनाटे वागणारे नव्हते.
‘ पंडितजी पटकन म्हणाले, “अरे वा! मग पहिल्यांदा बळीराजालाच शोधून काढू या!” मुलांचा हा कार्यक्रम पंडितजींना अत्यंत आवडला.
मुलांमध्ये मिसळून त्यांच्या मनात शिरून त्यांचे कोवळे निरागस बोल ऐकण्यात पंडितजींना आनंद वाटे. ते खळखळून हसत. त्यांच्या व्यस्त जीवनामध्ये असा विरंगुळा मिळणे हे जणू काही टॉनिकसारखे होते. पंडितजींच्या वाढदिवसाला बालदिन का म्हणतात याचे रहस्य हेच होते की, त्यांना बालगोपाळांमध्ये रमणे आवडे. अनेक प्रसंगी लहान मुले जमून चाचा नेहरू जिन्दाबादच्या घोषणा देत असत. पंडितजींवर लहान मुले प्रेम करत. १४ नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असे. इंदिराजींचा वाढदिवस १९ नोव्हेंबरला येई.
अशाच एका वाढदिवशी डॉ. बच्चन व तेजी बच्चन इंदिराजींना भेटायला आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन यांचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला येई. त्यांनी २७ तारखेला इंदिराजींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.
ते म्हणाले “मी येत्या २७ तारखेला पन्नास वर्षे पूर्ण करीत आहे. याला काही फार अर्थ आहे असे नाही, परंतु आम्ही त्या दिवशी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रम तुम्हाला आवडेल. पण कार्यक्रम कोणता आहे ते. मात्र आताच सांगत नाही त्याचे औत्सुक्य असू द्या. पण आपण नक्की या.’ ”
“हो, नक्कीच येईन”
इंदिराजी म्हणाल्या.
डॉ. बच्चनजींचा पन्नासावा वाढदिवस थाटामाटाने साजरा व्हावा अशी त्यांची रसिक चाहत्यांची इच्छा होती. परंतु जास्त गाजावाजा न करता वाढदिवस साजरा करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले की, समारंभ करण्यापेक्षा त्यांच्या आवडत्या कविता मित्रांनी घरी बसून वाचाव्यात, आणि समारंभ टाळावा.
डॉ. बच्चन यांनी ‘मॅक्बेथ’ चा हिंदी अनुवाद केला होता. तो त्यांनी पंडितजींना अर्पण केला होता. आपल्या वाढदिवशी आपले निवडक पाचपन्नास मित्र बोलावले. इंदिराजी हजर होत्या. डॉ. बच्चन व तेजी यांनी ‘मॅक्बेथ’च्या नाट्यवाचनाचा कार्यक्रम केला. इंदिराजी खूप भारावून गेल्या. त्या दिवशी बच्चन पतीपत्नींनी हे जाहीर केले की, हे नाटक ते रंगभूमीवर आणणार आहेत. आणि जर या प्रयोगाला यश मिळाले तर, शेक्सपिअरची इतर नाटकेही हिंदी रंगभूमीवर आणण्याचा त्यांचा विचार आहे.
इंदिराजींनी ‘मॅक्बेथ’चा विषय पंडितजींकडे काढला. ‘मॅक्बेथ’चे देशी रूप त्यांना खरोखरच भावले होते. हे नाटक रंगभूमीवर आणायचे आहे, हेही त्यांनी पंडितजींना सांगितले होते. पंडितजी रसिकराज होते. हरिवंशराय बच्चन यांची ‘मॅक्बेथ’ ही कलाकृती रंगभूमीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे हे समजताच पंडितजींनी डॉ. बच्चन यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या हातात १५,००० रुपयांचा चेक ठेवला ते म्हणाले, “मॅक्बेथ स्टेजवर आणण्याची
तुमचा प्रयत्न सुरू आहे हे मला माहीत आहे. तुमच्या या कामाकरता पंतप्रधान फंडातून ही मदत करत आहे. तुमचा प्रयोग पाहायला मी अवश्य येईन.’
बच्चन आनंदित झाले. डॉ. बच्चन यांनी शेक्स्पीअरच्या ‘मॅक्बेथ’चा पद्यबद्ध अनुवाद केला होता. हिंदीत प्रथम असा प्रयोग होत होता. ५८ च्या नोव्हेंबर महिन्यात १८ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर रोजी शेक्स्पीअर मंच या संस्थेने नव्या दिल्लीत फाईन आर्ट्स थिएटरमध्ये ‘मॅक्बेथ’चा प्रयोग मोठ्या धूमधडाक्यात केला. पंडितजींनी येण्याचे कबूल केले होते. ते पहिल्या दिवशी हजर राहिले. इंदिराजी हजर होत्या. दोघांनी हा प्रयोग शेवटपर्यंत पाहिला.
पंडितजी डॉ.बच्चन यांना म्हणा-ले, “तुमचं अभिनंदन! इट्स अ रिमार्केबल अचिव्हमेंट!” पंडितजींनी पाठ थोपटल्यामुळे डॉ. बच्चन यांना आपल्या परिश्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. या नाटकाचा प्रयोग पाहायला ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर शेवटच्या दिवशी आले होते. त्यांनी डॉ. बच्चन यांची प्रशंसा करताना असे उद्गार काढले,
“हिंदी व्हर्शन ऑफ मॅक्बेथ इज अ न्यू अँड प्रेझवर्दी व्हेंचर, “
नाटकाची वाहवा झाली. भारतातल्या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रांनी ‘मॅक्बेथ’चा हिंदी नाट्यानुवाद व कलाकारांचा नाट्याभिनय यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. नाटकाचे तीनही प्रयोग हाऊसफुल झाले. तिकिटे मात्र जेमतेमच विकली गेली. त्याचे कारण असे होते की, नाटकमंडळीतील प्रत्येक व्यक्तीला आपापले मित्र, नातेवाईक नि ओळखीचे लोक यांना नाटक दाखविता यावे, म्हणून मोफत पास हवे होते. अनेकांनी मोफत मिळालेले पास विकून पैसे कमावले. या नाट्यप्रयोगासाठी बराच खर्च झाला. या नाटकात तीस कलाकारांनी भाग घेतला होता. त्यांची वस्त्रप्रावरणे, ढाल-तलवारी, ध्वज-पताका, लाठ्या-काठ्या, बिगुल – भोंगे, विविध सेट, रंगपीठावर वेळोवेळी लागणारे साहित्ये, मेकअपमनचा मोबदला, मेकअपचे बारीक-सारीक सामान व नटमंडळीच्या येण्याजाण्याचा प्रवासखर्च वगैरे सर्व मिळून पंधरा हजार रुपये खर्च झाला. पंडितजींनी दिलेले सर्व पैसे खर्च झाले होते. स्मरणिका-जाहिरातीतून मिळालेली रक्कमही खर्च पडली होती. हा प्रयोग अर्थातच पंतप्रधान मदतनिधीसाठी केला होता. तिकिट विक्रीतून केवळ एक हजार रुपये मिळाले. ते हजार रुपये पंडितजींना दिले. अर्थातच खऱ्या अर्थाने हे सुदाम्याचे पोहेच होते जणू. कारण पंडितजींनी प्रयोगासाठी १५,००० रुपये दिले होते. आणि बच्चनजी पंडितजींना एक हजार परत देत होते. अर्थात हे पैसे देताना डॉ. बच्चन हे अत्यंत ओशाळले होते. त्यांच्या आवडत्या नाटककाराची परंतु शेक्स्पीअरची महान कलाकृती राष्ट्रभाषेत अनुवादित होऊन सादर केली जाते याचेच त्यांना अप्रूप होते.
‘चिंतन आदेश’ वरून
Leave a Reply