MENU
नवीन लेखन...

दोन नोबेल पारितोषिके मिळविणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मादाम मारी क्युरी

दोन नोबेल पारितोषिके मिळविणारी पहिली महिला शास्त्रज्ञ

७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंडमध्ये शिक्षकी पेशातील स्क्लोडोवस्की दाम्पत्याच्या पोटी मादाम मारी यांचा जन्म झाला होता. रेडियमचा शोध लावून आणि पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या विषयांतील दोन नोबेल पारितोषिके मिळवून मादाम मारी क्युरी यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले. १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत विज्ञानक्षेत्राचे दरवाजे महिलांना बंदच असताना आणि संशोधन क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी असताना जगातील पहिली महिला शास्त्रज्ञ म्हणून मादाम मारी क्युरी यांनी जागतिक कीर्ती मिळविली. न्यूटन, एडिसन, मार्कोनी आणि आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांच्या मालिकेत मादाम मारी क्युरींना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. म.गांधींना मादाम मारी क्युरींचा मानवतावादी दृष्टिकोन विलोभनीय वाटला. पं. नेहरूंना मादाम मारी क्युरींचा शास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा वाटला. लालबहादूर शास्त्री यांनी तर मादाम मारी क्युरींची मुलगी ईव्ह क्युरी हिने लिहिलेल्या मादाम मारी क्युरींच्या चरित्राचे हिंदी भाषेत अनुवादच केला आहे!

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पती पिअर क्युरी (Pierre Curie) आणि एक शास्त्रज्ञ हेन्री बेक्वेल Henri Becquel याच्या भागीदारीत २६ डिसेंबर १८९८ रोजी मादाम मारी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला होता. स्टॉकहोमच्या ॲकॅजमी ऑफ सायन्स द्वारा १० डिसेंबर १९०३ रोजी मादाम मारी क्युरी, पिअर क्युरी आणि हेन्री बेक्वेल यांना भागीदारीत नोबेल पारितोषिक दिले गेले.

रेडियमचा उपयोग उपचारांसाठी केला जाऊ लागल्यामुळे रेडियमचे कण अत्यंत अचूकपणे अलग करण्याची जरुरी निर्माण झाली होती. एका मिली ग्रॅमचा एक हजारांश कण तोलावयाचा असेल तेव्हा तराजूचा मुळीच उपयोग होत नसतो. त्यामुळे रेडियममधून जे किरण परावर्तित होतात त्यावरून रेडियमचे वजन करण्याची पद्धत मादाम मारी क्युरींनी शोधून काढली.

डिसेंबर १९११ मध्ये ‘स्विडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सीस’ या संस्थेने मादाम मारी क्युरींना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक दिले. लायन्स पॉलिंग या शास्त्रज्ञाचा अपवाद वगळता अन्य कुणाही शास्त्रज्ञांस दोन वेळा नोबेल पारितोषिक आजपर्यंत मिळालेले नाही!

विशेष म्हणजे, मादाम मारी क्युरी यांची कन्या इरीन हिनेही आपले पती फ्रेड्रिक जोलिएट यांच्या भागीदारीत पदार्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळविले. पती, पत्नी, मुलगी आणि जावई अशा चौघांनाही नोबेल पारितोषिक मिळण्याची जगातील एकमेव विक्रमी घटना मादाम क्युरींच्या आयुष्यात आणि कुटुंबातच घडलेली आढळते.

रेडियमचा शोध लावून उदात्त तात्त्विक विचारसरणीमुळे मादाम मारी क्युरी आणि त्यांचे पती पिअर क्युरी यांनी पेटंट घेण्याचे नाकारून कोट्यधीश होण्याची संधी जाणीवपूर्वक दूर लोटली. दारिद्र्यात राहून, विलक्षण प्रतिकूल परिस्थितीशी लढत, चिकाटीने, परिश्रमाने, तहानभूक विसरून, प्रकृतीची आबाळ करीत, पिअर क्युरी आणि मादाम मारी क्युरी यांनी मानवतावादी दृष्टीकोनाने जागतिक कीर्तीचे संशोधन केले. त्यांच्या संशोधनाने नवीन विज्ञान आणि नवीन तत्त्वज्ञानच उदयास आले. कॅन्सरसारख्या एका महाभयंकर रोगावर उपचार करण्याचे साधन मानवजातीच्या हाती आले!

मादाम मारी क्युरीचे आजोबा जोसेफ आणि वडील क्लॉडिस्लाव स्क्लोडोवस्की हे दोघेही शिक्षकी व्यवसायात होते. वडील गणित व पदार्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून वॉरसातील शिक्षणसंस्थेत कार्यरत होते. तत्कालीन पोलंड देश अखंड स्वतंत्र नव्हता. जर्मनी, झारशाही रशिया आणि ऑस्ट्रिया यांनी आपापसात वाटून घेतलेला तो देश तेव्हा होता!

शिक्षिका असलेली मादाम मारी क्युरीची आई दिसायला अतिशय सुंदर, गाणारी आणि पियानो वाजविणारी होती. १८६० साली तिचे मादाम मारी क्युरीच्या वडिलांशी लग्न झालेले होते. सुसंस्कृत आईवडिलांच्या पाच मुलांत सर्वांत लहान असलेली मारी उर्फ मान्या लहानपणापासून भरपूर वाचन करी. पोलंडमधील शाळेत शिकत असताना गणित, वाङ्मय, जर्मन आणि फ्रेंच या विषयांत वर्गात नेहमी पहिली येत असे.

मादाम क्युरीची थोरली १६ वर्षांची बहीण झोसिया विषमज्वराने आणि आई क्षयरोगामुळे मरण पावली. आई वारली तेव्हा मादाम क्युरीचे वय अवघे ८ ते १० वर्षांचे होते!

मादाम क्युरीची भावंडे तिच्यासारखीच अभ्यासात हुशार होती. मोठी बहीण ब्रोनिया आणि भाऊ जोसेफ या दोघांनीही शालेय शिक्षण पूर्ण करताना सुवर्णपदक मिळविले होते. भाऊ वैद्यकशास्त्राच्या शिक्षणासाठी विद्यापीठात दाखल झाला. परंतु बहिणीला ती केवळ महिला म्हणून पोलंडच्या वॉरसा विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी दरवाजे बंद होते! त्यामुळे तिला परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवावे असे बाल मारी क्युरीला वाटले.

१२ जून १८८३ रोजी सुवर्णपदक मिळवून माध्यमिक शिक्षणक्रम मादाम मारी क्युरी यांनी पूर्ण केला. प्रकृतीची हेळसांड करून अभ्यास केला असल्याने त्यांच्या वडिलांच्या सूचनेनुसार त्यांनी एक वर्ष विश्रांती घेतली. घरातील आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी त्यांनी ट्युटर आणि गव्हर्ने स किंवा दाईची नोकरी इ.स. १८८५ मध्ये मिळविली. ब्रोनियाला पॅरिसमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी शिकवण्या करून तीही पैसे जमा करीत होती. पण पैसे अपुरे पडत होते. मादाम मारिया आपल्या बहिणीस म्हणाल्या, “ब्रोनिया, तू तुझ्याकडचे पैसे खर्च करून पॅरिसला जा. मी नोकरी करून तुला पैसे पाठवीन. तू डॉक्टर झालीस की माझ्या उच्च शिक्षणासाठी तू मला मदत कर! आपण सर्वांनीच स्वतः पुरतेच पहावयाचे ठरविले तर कोणाचाच फायदा व्हायचा नाही. पण मा माझे ऐकशील तर तुला या हिवाळ्यात पॅरिसला जाता येईल!”

वॉरसात गव्हर्नेसची नोकरी करताना मादाम क्युरींना कटू अनुभव आले. एका पत्रात त्यांनी या संदर्भात लिहिले होते. अनेक पुस्तकांत अनेक वूर लोकांची वर्णने आहेत. या लोकांना पाहून ती खरी वाटतात. जे लोक संपत्तीने धुंद होऊन गेलेले न गलल असतात अशा लोकांशी संपर्क न ठेवणे हे सुज्ञपणाचे असते!

मादाम मारी क्युरी या इ.स. १८९१ मध्ये उच्च शिक्षणासाठी पॅरिसला सॉरबॉन विद्यापीठात दाखल झाल्या होत्या. १८९४ मध्ये पॅरिसमध्ये भेटलेल्या पिअर क्युरी या शास्त्रज्ञाने मादाम मारी यांना विवाहासाठी मागणी घातली. २६ जुलै १८९५ रोजी पिअर कुरींबरोबर मादाम मारींनी अगदी साधेपणाने विवाह केला. विवाहप्रसंगी पांढरा पोषाख न शिवता निळ्या रंगाचा झगा हिरवा ब्लाऊझ शिवण्यास मादाम मारी यांनी आपल्या सासूबाईंना सुचविताना म्हटले होते, मी रोज घालते त्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पोषाख नाही. तुम्ही मला जो पोषाख भेट म्हणून द्याल, तो मला नेहमी उपयोगी पडेल असा द्या. त्या पोषाखाचा मी प्रयोगशाळेतही उपयोग करीन!

विवाहाची स्मृती म्हणून मादाम मारी यांनी पिअर यांच्याकडून सोन्याची अंगठीही घेतली नाही. सर्व धार्मिक रूढींना फाटा देऊन विवाहानंतरची मेजवानीही रद्द केली!

विवाहानंतर एक वर्षांने ऑगस्ट १८९६ मध्ये मादाम मारींनी फेलोशिफची परीक्षा दिली. त्या परीक्षेत त्या पहिल्या आल्या. त्यानंतर एक वर्षांने १२ सप्टेंबर १८९७ रोजी क्युरी दाम्पत्यास पहिली मुलगी झाली. तिचे नाव इरीन ठेवण्यात आले. इरीन पायगुणाची ठरली! १८९७ च्या अखेरीस मारींनी पदार्थशास्त्र आणि गणित या विषयांच्या मास्टर या पदव्या मिळवून फेलोशिपही मिळविली. याच काळात पोलादातील चुंबकीय मॅग्नेटिक गुणधर्मासंबंधी संशोधनात्मक स्वरूपाचा प्रबंध त्यांनी लिहिला.

मादाम मारीपेक्षा पिअर क्युरी ९ वर्षांनी मोठे होते. विवाहाच्या वेळी मारी २७ वर्षांच्या तर पिअर ३६ वर्षांचे होते. पिअर क्युरींना पती म्हणूनच नव्हे तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि गुरू म्हणून मादाम मारी आदर दाखवीत. विज्ञान विषयातील कोणत्या विषयावर डॉक्टरेट करावी याबाबत पिअर क्युरींशी चर्चा करतानाच हेन्री बेक्वेल Henri Becquel यांचा फ्रान्समधील एका विज्ञानविषयक मासिकात प्रसिद्ध झालेला प्रबंध मादाम मारी क्युरींच्या वाचनात आला. हा प्रबंध स्वयंप्रकाशित पदार्थांसंबंधी होता. ज्या वस्तूंना सूर्य किंवा तारे यांच्यापासून प्रकाश मिळत नाही, अशा वस्तूही प्रकाश परावर्तित करू शकतात, हे हेन्री बेक्वेल यांनी निदर्शनास आणलेले होते. त्यापूर्वी रॉटेन्जन यांनी नवे किरण शोधून काढले होते. या किरणांना रॉटेन्जन किरण किंवा एक्सरे असे नाव दिले गेले होते. काही सुप्त प्रकाशयुक्त घटक प्रकाशाच्या प्रतिक्रियेमुळे क्ष-किरणासारखे किरण परावर्तित करतात काय याचे प्वॉन्केअर या शास्त्रज्ञाने संशोधन चालविले होते. बेक्वेल यांनाही त्याबाबत कुतूहल होते. प्वान्केअर यांनी त्यासाठी अनेक धातूंचे अवलोकन केले होते. त्यांना असे आढळून आले होते की, युरेनियम या नावाच्या दुर्मिळ धातूच्या क्षारातून प्रकाशाचे किरण परावर्तित होतात. काळ्या कागदाने वेष्टिलेल्या छायाचित्रणाच्या तबकडीवर युरेनियमचे मिश्रण ठेवले तर कागदावर छायाचित्र उमटते. इतकेच नव्हे तर क्ष-किरणांप्रमाणे हे युरेनियमचे क्षार सभोवारच्या हवेला किरणोत्सर्गी करून वीजादर्श (इलेक्ट्रोस्कोप) निर्माण करतात. सारांश, जगात अशा प्रकारचे आश्चर्यकारक किरणोत्सर्ग आहेत, हे बेक्वेल यांनी सिद्ध केले. मादाम मारींनी या सिद्धांतांचे स्पष्टीकरण करण्याचे ठरविले. त्यांनी डॉक्टरेटसाठी हाच प्रबंध तयार करण्याचे निश्चित केले.

विज्ञान क्षेत्रात एक शास्त्रज्ञ नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असताना आढळतो. एक शास्त्रज्ञ एक शोध लावतो. दुसरा शास्त्रज्ञ त्याच्या पुढचा शोध लावून विज्ञानाची प्रगती साधतो.

किरणोत्सर्ग कसे निर्माण होतात, त्यांचा आरंभ कसा होतो आणि त्याची कारणे काय हे शोधून काढण्याचे मादाम मारी क्युरींनी निश्चित केले. युरेनियमशिवाय कोणत्या धातूतून प्रकाश परावर्तित होतो हे शोधून काढण्याचेही मादाम मारींनी ठरविले.

आज सांगितले तर आश्चर्य वाटते की नोबेल पारितोषिक मिळविलेल्या संशोधनासाठी प्रयोग करण्यास मादाम मारी क्युरींना प्रयोगशाळा नव्हती! पिअर यांनी स्कूल ऑफ फिजिक्सच्या संचालकांकडून संस्थेच्या गुदामाची जागा मोठ्या जिकिरीने मिळविली. जागा दमट होती. निरुपयोगी उपकरणे आणि लाकडे यांनी रचून ठेवलेली होती! जिकडे तिकडे गुदामात कोळी व कोळिष्टके होती. हिवाळ्यात तेथे पारा शून्याखाली ११ अंश फॅरनहिटवर जात असे. त्यामुळे तेथे उभे राहणारी व्यक्ती गोठून जाई. उपकरणांवर विपरीत परिणाम होत.

अशा प्रतिकूल परिस्थितीत, ध्येयवेडाने तहानभूक हरपून प्रयोग करीत राहून युरेनियमशिवाय थोरियममधूनही प्रकाश परावर्तित होतो हे मादाम मेरी क्युरी यांनी सिद्ध केले. या गुणधर्माला त्यांनीच प्रथम रेडिओ अॅक्टिव्हिटी (किरणोत्सर्ग) हे नाव दिले. प्रकाशनिर्मितीचा हा विशेष गुणधर्म असलेले पदार्थ रेडिओ एलेमेंटस म्हणून ओळखले जाऊ लागले.

मादाम मारी क्युरींनी मिश्र पदार्थ (काम्पौंड), क्षार आणि ऑक्साईड यांचे पृथक्करण करून न थांबता धातूंचेही पृथक्करण केले. काही धातूंत युरेनियम किंवा थोरियम यांच्यापेक्षा अधिक किरणेत्सर्गी घटक असतात. हा निष्कर्ष मादाम क्युरींनी काढला. १२ एप्रिल १८९८ रोजी पिचब्लेन्ड हे खनिज युरेनियमपेक्षाही अधिक किरणोत्सर्गी आहे. हे निवेदन मादाम क्युरींनी जाहीर केले. मारी क्युरींच्या या संशोधनाकडे पिअर क्युरींचे लक्ष

होतेच. त्यांनी मग आपले संशोधन दूर ठेवून मारींच्या संशोधनात सहभाग दिला. संशोधन करताना असे आढळले की, पिचब्लेंडपैकी दोन अज्ञात घटक द्रव्ये किरणोत्सर्गी आहेत. १८९८च्या जुलैमध्ये त्यापैकी शोध लागलेल्या एका घटकद्रव्यास पोलोनियम हे नाव मादाम मेरी क्युरींनी दिले! विवाहामुळे फ्रेंच झालेल्या मारी क्युरींनी आपल्या पोलंड या मातृभूमीवरील प्रेमच पोलोनियम या नामकरणातून व्यक्त केले होते!

पोलोनियमच्या शोधानंतर पाच महिन्यांनीच २६ डिसेंबर १८९८ रोजी पिचब्लेंडमधील दुसऱ्या किरणोत्सर्गी घटकाचाही शोध लागल्याचे पिअर त्यांनी नाव आणि मादाम क्युरी यांनी जाहीर केले. या नवीन घटक द्रव्याला त्यांन दिले रेडियम !

सतत चार वर्षांच्या परिश्रमपूर्वक संशोधनातून मादाम मारी आणि पिअर क्युरी यांनी रेडियम या घटकाचे अस्तित्व सिद्ध केले होते! प्रत्यक्षात १९०२ मध्ये एक डेसिग्रॅम वजनाचे रेडियम तयार करण्यात त्यांना यश आले होते.

रेडियम दिसायला अगदी साधे, स्वयंपाकातील मिठासारखे, परंतु अभूतपूर्व गुणांचे ठरले! रेडियम हे युरेनियमपेक्षा वीस लक्ष पटींनी अधिक सामर्थ्यवान आहे. रेडियमचे किरण अत्यंत कठीण पदार्थालाही भेदून जातात. फक्त जाड शिश्यातून ते जाऊ शकत नाहीत. रेडियम म्हणजे कॅन्सरवरील एक परिणामकारक उपाय असल्याचे आढळले आहे.

रेडियमच्या शोधाव्यतिरिक्त मादाम मारी आणि पिअर क्युरी यांनी कधी स्वतंत्रपणे तर कधी अन्य शास्त्रज्ञांच्या सहकार्याने १८९९ ते १९०४ या काळात एकूण ३२ शास्त्रीय प्रबंध लिहून प्रसिद्ध केले होते.

नोबेल पारितोषिकामुळे क्युरी दाम्पत्यास ७० हजार फ्रँक आणि जागतिक किर्ती मिळाली. १० डिसेंबर १९०३ रोजी स्कॉटहोमच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सद्वारे जाहीर झालेले नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास प्रकृती अस्वास्थ्यामुळे क्युरी दाम्पत्य स्टॉकहोमला जाऊ शकले नाही!

याच सुमारास मादाम मारींना एडवर्ड बॅन्ली या एका शास्त्रज्ञांच्या फ्रँक भागीदारीत ऑसिरिस हे सिंडिकेट द ला प्रेसी या संस्थेतर्फे ५० हजार रकमेचे पारितोषिकही मिळाले होते.

क्युरी दाम्पत्याने आपणास मिळालेल्या रकमेतून बऱ्याच देणग्या दिल्या. स्वतःसाठी मात्र कपडे खरेदीही त्यांनी केली नाही! छानछोकीचा आणि प्रसिद्धीचा त्या दोघांनाही तिटकाराच होता! परंतु प्रसिद्धी त्यांच्यामागे लागणे स्वाभाविक होते!

६ डिसेंबर १९०४ ला क्युरी दाम्पत्यास दुसरी मुलगी झाली. तिचे नाव ईव्ह ठेवण्यात आले होते.

१९०४ मध्ये सॉरबॉन विद्यापीठाने पिअर क्युरी यांची पदार्थशास्त्राच्या शाखेच्या प्रमुखपदी नेमणूक केली. विशेष म्हणजे प्रयोगशाळेच्या प्रमुख म्हणून मादाम मारी यांची नोव्हेंबर १९०४ मध्ये नेमणूक केली गेली.

सॉरबॉन विद्यापीठाने पिअर यांच्या मागणीमुळे दीड लाख फ्रँक खर्च करून एक प्रयोगशाळा उभी तरून दिली. पिअर यांच्या अपेक्षेप्रमाणे ती परिपूर्ण नव्हतीच. मादाम मारींनी या प्रयोगशाळेच्या संदर्भात पुढील काळात एका पत्रात लिहिले होते, पिअर यांना ही सवलत अगदी शेवटी दिली गेली, हा विचार मनात येऊन दुःख वाटते. या अत्यंत श्रेष्ठ शास्त्रज्ञाने आपल्या वयाच्या २० व्या वर्षापासून आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचा प्रभाव पाडण्यास सुरुवात केली, पण त्यांना मनाप्रमाणे प्रयोगशाळा कधीच मिळाली नाही. कदाचित ते अधिक काळ जगले असते तर त्यांना पुढेमागे चांगली प्रयोगशाळा मिळाली असतीही. पण वयाच्या ४७व्या वर्षीही त्यांना प्रयोगशाळा नव्हती. साधनाच्या सतत अभावामुळे आपली आकांक्षा साध्य होत नाही, म्हणून लोकोत्तर कार्य करू पाहणाऱ्या उत्साही व धैर्य यांची किती हानी होत असेल? अत्यंत कठीण परिस्थितीत रेडियमचा शोध लावला गेला हे खरे आहे. त्या परिस्थितीत हे संशोधन करावे लागल्यामुळे आमच्यावर खूप शारीरिक ताण पडला. आम्हाला चांगली साधने मिळाली असती तर आमचे पाच वर्षांचे संशोधन कार्य आम्ही दोन वर्षांत पूर्ण केले असते!

मादाम मारी क्युरींचे हे पत्र फार बोलके आहे. त्यावर भाष्य करण्याची आवश्यकताच उरत नाही. भारतातील शास्त्रज्ञांचा, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आणि त्यांच्या अवहेलनाचा आपण विचारच न केलेला बरा! अनेक शास्त्रज्ञ भारतात अ आत्महत्या का के करतात हेही सांगण्याचे कारण उरत नाही!

६ जून १९०५ रोजी पिअर क्युरी यांनी स्वतःच्या व मारींच्यावतीने स्टॉकहोम येथे ॲकॅडमी ऑफ सायन्स पुढे एक व्याख्यान दिले होते. ते म्हणाले होते, रेडियममुळे ज्ञानात भर पडली आहे. त्यामुळे मानवजातीचा फायदा होईल हे निश्चित. पण त्याबरोरच रेडियम हे गुन्हेगारांच्या हाती घातक शस्त्र न होईल याची काळजी घेतली पाहिजे!

पिअर यांना १९ एप्रिल १९०६ रोजी पॅरिस येथे रस्त्यावरील एका बग्गीने ठोकरले. घोड्यांच्या टापाखाली पिअर यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला! एका महान शास्त्रज्ञाच्या आयुष्याचा असा दुर्दैवी अंत करण्यात नियतीने काय साधले असावे?

मादाम मारींना आणि त्यांच्या मुलींनाच नव्हे साऱ्या जगाला पिअर क्युरींच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने हळहळ वाटली. फ्रेंच सरकारने मारी क्युरींना व त्यांच्या मुलींना पिअर यांच्या निधनानंतर पेन्शन देऊ केले. परंतु मी स्वतःचा व मुलींचा चरितार्थ चालविण्यास समर्थ आहे. असे कळवून मादाम क्युरी यांनी पेन्शन स्वीकारले नाही!

पिअर यांच्या निधनानंतर विद्यापीठाने सर्व परंपरा व रिवाज बाजूला सारून पिअर यांच्या जागी मादाम मारी क्युरी यांची नेमणूक करण्याचा निर्णय १३ मे १९०६ रोजी घेतला. दरवर्षी दहा हजार फ्रॅन्क वेतन देण्याचाही निर्णय घेण्यात आला व मारींना कळविला गेला.

फ्रान्समध्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एका महिलेस असा सन्मान प्रथमच लाभला होता!

सॉरबॉन विद्यापीठात मादाम क्युरी प्राध्यापिका, संशोधक आणि प्रयोगशाळा संचालिका म्हणून तिहेरी भूमिका करीत होत्या. सॉरबॉन विद्यापीठात किरणोत्सर्ग या विषयाचे त्या शिक्षण देत असत. या विषयाचे शिक्षण देणारे सॉरबॉन हे त्यावेळी जगातील एकमेव विद्यापीठ होते!

मादाम क्युरींनी १९१० मध्ये ट्रिटाईज ऑन रेडिओ अॅक्टिव्हिटी हा ९७१ पृष्ठांचा प्रबंध लिहिला. रेडियमच्या शोधानंतर किरणोत्सर्गांच्या क्षेत्रात जे ज्ञान मिळविले त्याची माहिती देणारा हा प्रबंध होता.

१९११ च्या डिसेंबर महिन्यात स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेने रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मादाम मेरी क्युरींना दिले तेव्हा पिअर क्युरी असायला हवे! त्यांच्या तीव्रपणे जाणवणाऱ्या अनुपस्थितीत मादाम क्युरी यांनी आपली बहीण ब्रोनिया आणि कन्या इरीन यांना घेऊन स्टॉकहोम येथे जाऊन नोबेल पारितोषिक स्वीकारले.

पुढे १९३४ साली इरीन आणि तिचा पती फ्रेड्रिक जोलिएट या दाम्पत्यास स्टॉकहोम येथेच नोबेल पारितोषिक दिले गेले होते! मादाम क्युरींना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक स्वीकारताना पाहण्यास पिअर क्युरी हयात नव्हते आणि इरीन-जोलिएट यांना दिले गेलेले नोबेल पारितोषिक पाहण्यास मादाम क्युरी हयात नव्हत्या! नियतीचे हे गणित गणिततज्ञ मादाम क्युरींसारख्यांनाही सोडविता येण्यासारखे नव्हते!!

आयुष्याच्या उत्तरार्धात मादाम मारी क्युरींनी बेल्जम, इटली, हॉलंड, स्पेन, चेकोस्लोव्हाकिया, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि अमेरिका इत्यादी देशांना भेटी दिल्या. स्वित्झर्लंडमधील पर्वतारोहणाच्या प्रवासातील पथकात अल्बर्ट आईन्स्टाईन व त्यांचा मुलगाही होता. मादाम क्युरींची अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्याशी मैत्री होती.

जुलै १९१४ मध्ये पॅरिसमध्ये पाश्चर इन्स्टिट्यूट व सॉरबॉन विद्यापीठ यांनी प्रत्येकी ४ लक्ष सुवर्ण फ्रँक्स खर्च करून इन्स्टिट्यूट ऑफ रेडियम ही प्रयोगशाळा मादाम मारी क्युरींसाठी उभारली. परंतु या संस्थेत कार्य करण्यासाठी मादाम क्युरींना चार वर्षे थांबावे लागले. कारण ऑगस्ट १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते!

महायुद्ध सुरू होताच आपणास कोणते मानवतावादी कार्य करता येईल याचा विचार मादाम क्युरींनी केला. वैद्यकीय मदतयंत्रणेत नाव नोंदविले. आघाडीवर आणि अनेक रुग्णालयांत एक्सरेच्या सोयी नव्हत्या, हे मादाम क्युरींना जाणवले. युद्धावरील जखमी सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बचे तुकडे काढण्यास एक्सरेची आवश्यकता होती.

मादाम क्युरींनी काही तासांतच पॅरिसमधील एक्सरेच्या उपकरणांच्या संख्येचा आढावा घेतला. निरनिराळ्या रुग्णालयांना ती उपकरणे वाटण्याची व्यवस्था केली. या उपकरणांचा उपयोग करू शकणाऱ्या प्राध्यापक, इंजिनीअर्स आणि शास्त्रज्ञांची यादी करून त्यांची वेगवेगळ्या रुग्णालयांत रवानगी केली. युनियन ऑफ विमेन्स ऑफ फ्रान्सच्या मदतीने रेडिओलॉजिकल कार चालू केली. साध्याच कारमध्ये एक्सरेचे उपकरण बसवून अशी १५० वाहने उपलब्ध केली. फिरत्या केंद्राशिवाय दोनशे स्थायी केंद्रे चालू केली. सुमारे दहा लक्ष सैनिकांवर त्यामुळे उपचार होऊ शकले होते.

स्वतः मादाम क्युरी परिचारिकेच्या भूमिकेत शुश्रूषा कार्यही करीत. इरीनच्या मदतीने त्यांनी हे कार्य करीत असतानाच १५० क्ष-किरण तज्ज्ञ शिकवून तयार केले. मादाम क्युरी या कार्यात अत्यंत साध्याच वेषात वावरत. अनेक उच्चभ्रू फॅशनेबल स्त्रियाही या कार्यात सामील झालेल्या होत्या. मादाम क्युरींना त्या ओळखत नसत. झाडूवाली समजून क्युरींचा कधी कधी त्या अपमानही करत. क्युरी दुर्लक्ष करीत, परंतु स्वतःची ओळख देत नसत.

युद्धकाळातील आणि विज्ञानक्षेत्रातील मादाम क्युरींच्या कार्यामुळे ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन’ या संस्थेतर्फे मादाम क्युरींना १९२१ मध्ये एक ग्रॅम रेडियम भेट देण्यात आले.

मादाम क्युरी या केवळ फ्रान्सच्या राहिल्या नव्हत्या. चीनसारख्या देशातही कॉन्फुशिअसच्या मंदिरात मानवजातीच्या उपकारकर्त्या न्यूटन, बुद्ध वगैरे थोर व्यक्तींच्या तैलचित्रांसह मादाम मारी क्युरींच्या तैलचित्रालाही स्थान दिले गेले. १५ मे १९२२ रोजी राष्ट्रसंघाच्या नियामक मंडळाने मारी क्युरींची आंतरराष्ट्रीय सहकार्यासंबधीच्या समितीवर सदस्य म्हणून निवड केली.

मादाम क्युरींचे आपले मातृभूमी असलेल्या पोलंडवर विलक्षण प्रेम होते. अनेक वेळा त्या पोलंडला भेट देण्यास गेल्या होत्या. येथे रेडियम इन्स्टिट्यूट मादाम क्युरींच्या प्रेरणेने आणि प्रयत्नांनी झाली. निधी उभारणीत मारी यांची बहीण ब्रोनिया हिने योजनापूर्वक कार्य केले. इमारत झाली. परंतु कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पैसा उभा करण्यासाठी मादाम क्युरींनी अमेरिकेची मदत घेतली. १९२९ च्या ऑक्टोबर महिन्यात मादाम मारी क्युरी अमेरिकेत पुन्हा कृतज्ञता व्यक्त करण्यास गेल्या होत्या. त्यावेळी सेंट लॉरेन्स विद्यापीठास त्यांनी भेट दिली होती. आज या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारी मादाम मारी क्युरींच्या भव्य पुतळा उभारलेला आहे!

२९ मे १९३२ रोजी वॉरसा येथील रेडियम इन्स्टिट्यूट उद्घाटन करण्यास मारी पोलंडला गेल्या होत्या. आपल्या मायदेशाला दिलेली ही त्यांची शेवटचीच भेट ठरली.

मादाम मारी क्युरींना आणि पिअर क्युरींना अनेक देशांनी सन्मानदर्शक अनेक पुरस्कार, पारितोषिके आणि सुवर्णपदके दिली होती. मादाम मेरी क्युरी यांना १९०७ पासून १९२९ पर्यंत २० विद्यापीठांनी डॉक्टरेट ही पदवी बहाल केली होती. ८५ विख्यात संस्थांनी आपले सदस्यत्व दिले होते.

वस्तुतः रेडिएशनच्या दुष्परिणामाची संपूर्ण नसली तरी काही कल्पना पिअर क्युरी आणि मादाम मारी यांना होती. तरीही धाडशी वृत्तीने युरेनियमची माती दोघांनीही आपल्या उघड्या हाती धरली होती. त्यामुळे नेहमीच त्यांच्या हातावर फोड आलेले होते. विशेष म्हणजे त्यांची सायन्स जर्नल्स आजही (रेडिओ अॅक्टिव्ह) किरणोत्सर्गी दिसतात. आयुष्याच्या उत्तरार्धात १४ वर्षे मादाम मारी क्युरींना दृष्टिदोष प्राप्त झाला होता. हाताची बोटेही आयुष्याच्या अखेरीस नीट वापरता येत नव्हती.

अखेर शेवटी ४ जुलै १९३४ रोजी कॅन्सरने, ल्युकेमियाने मादाम मारी क्युरी या जगप्रसिद्ध मानवतावादी पहिल्या महिला शास्त्रज्ञ असलेल्या विभूतीचा अंत झाला! विलक्षण योगायोग असा की मादाम क्युरींची थोरली कन्या ईरीन हिचाही मृत्यू ल्युकेमियाने आपल्या आईच्या मृत्यूनंतर केवळ एकच वर्षांने झाला. किरणोत्सर्गाच्या संपर्कात सतत राहिल्यामुळेच नोबेल पारितोषिकविजेत्या मायलेकींच्या जीवनाची अखेर झाली असे मानले जाते! मादाम मारी क्युरी यांच्या मृतदेहाचे दफन पिअर क्युरी यांच्या शवाचे जेथे दफन केले होते त्या जागेजवळच केले गेले.

मृत्यूपूर्वी थोडेच दिवस अगोदर मादाम मारी क्युरी यांनी लिहून पूर्ण केलेले रेडिओ अॅक्टिव्हिटी नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले गेले.

मादाम मारी क्युरींसारख्या अद्वितीय व्यक्ती त्यांच्या कृतीने, कार्याने आणि लेखनरूपाने देश आणि काळाला ओलंडून चिरंजीवच राहतात!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..