अमेरिकेतील पहिली कृष्णवर्णीय उद्योजिका मॅडम सी.जे. वॉकर
अमेरिकेत अत्यंत प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत सराह ब्रीडलव्ह ही मुलगी जन्मास आली होती. १९१८ साली ती जेव्हा निधन पावली तेव्हा तिला मॅडम सी. जे. वॉकर या नावाने सारी अमेरिका ओळखत होती. त्याखेरीज अमेरिकेतील पहिलीच कृष्णवर्णीय कोट्यधीश उद्योजिका म्हणून तिची सर्वत्र ओळख पटलेली तिची सर्वत्र ओळख पटलेली होती. अशक्यप्राय वाटावी अशी ही घटना होती.
मला नेहमी असे वाटते की, परमेश्वर आणि निसर्ग हा पक्षपातीच असावा. आफ्रिकन कृष्णवर्णीय वंशाच्या मानवजातीबाबत तर अनेक प्रकारे परमेश्वराने वा निसर्गाने अन्यायच केलेला आहे. धडधाकट शरीरयष्टीव्यतिरिक्त शरीरसौंदर्याच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट ही कुरूप स्वरूपातच निसर्गाने आफ्रिकन कृष्णवर्णीयांना दिलेली आहे. अत्यंत कुरळे, दाट-घट्ट केस, काळा कुळकुळीत रंग, जाड नाक व ओठ, जबड्याची-गालाची-चेहऱ्याची कुरूपच वाटावी अशी जडणघडण ! हवामानही एका टोकाचे प्रतिकूल !
आफ्रिकन कृष्णवर्णीय माणसावर निसर्गाने अन्याय केलाच; परंतु गोऱ्या कातडीच्या तथाकथित सुशिक्षित समाजानेही केलेला अन्याय मोठा होता.
परंतु आपल्या शारीरिक ताकदीबरोबरच बौद्धिक आणि मानसिक शक्तीचा वापर करून विलक्षण परिश्रमाने अनेक कृष्णवर्णीय माणसांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा प्रेरक ठसा उमटवला आहे. संगीत, क्रीडा, राजकारण, समाजकारण, कायदा, न्याय, अर्थकारण, शौर्य, वक्तृत्व, नाट्य, चित्रपट, अभिनय, उद्योग इत्यादी माणसांच्या जीवनक्षेत्रांतील विविध शाखात आज आफ्रिकन कृष्णवर्णीय लहानथोर वयांची माणसे आपापल्या वैशिष्ट्यांनी अमेरिकेतच नव्हे, तर जगात अन्यत्रही यशस्वीपणे कार्यरत झालेली दिसतात.
शरीराच्या बाह्य सौंदर्यास एका विशिष्ट मर्यादेतच महत्त्व असते. किंबहुना माणसाच्या रंगास आणि बाह्य सौंदर्यास भुलण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहावे, असे सर्वच संतांनी व विचारवंतांनी सुचविलेले आहे. ‘ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा’ किंवा ‘चातुर्ये शृंगारे अंतर’ ही संत सावतामाळी आणि संत रामदास यांची वचने जणू अमेरिकेतील कृष्णवर्णीय सी. जे. वॉकरने वाचली-ऐकली होती. नुसती वाचली-ऐकली नव्हती, तर ती आपल्या आचरणातून इतरांना दाखविली होती!
केवळ ५१ वर्षे वयाचे आयुष्य लाभलेली मॅडम सी.जे. वॉकर ही २३ डिसेंबर १८६७ रोजी म्हणजे भारतात १८५७ चे सुप्रसिद्ध क्रांतियुद्ध (किंवा १८५७चे बंड) झाल्यानंतर दहा वर्षांनी अमेरिकेत डेल्टा, लुएझिआना येथे जन्मास आली. पाचव्या वर्षीच आईवडील निधन पावले आणि पोरकेपण तिच्या नशिबी आले. वयाच्या चौदाव्या वर्षी तिचे लग्न झाले. एका मुलीस जन्म देऊन सहा वर्षे संसार करून तिचा नवराही निधन पावला. वयाच्या विसाव्या वर्षी पतीनिधनाचे दुःख सी.जे. वॉकरच्या कपाळी लिहिलेले होते. एलेलिया नामक आपल्या छोट्या मुलीस घेऊन सी. जे. वॉकर दोघींच्या उदरनिर्वाहासाठी सेंट लुईस येथे गेली. तेथे १८ वर्षे तिने धोब्याच्या भूमिकेत लोकांचे कपडे धुऊन पोटापाण्याची व्यवस्था केली.
स्वप्ने प्रत्येक माणूसच पाहतो. परंतु आपली भव्य वा जगावेगळी स्वप्ने वास्तव्यात आणू शकणारी माणसेच अलौकिक ठरतात. सी. जे. वॉकरने केस सरळ करणाऱ्या साधननिर्मितीच्या कारखान्याचे स्वप्न पाहिले आणि ते वास्तव्यास आणले. काळ्या केसांच्या सशक्त करण्याची नवी पद्धती सी.जे. वॉकरने शोधून काढतानाच उष्णता देणाऱ्या खास स्वरूपाच्या धातूच्या कंगव्याचा तिने शोध लावला.
कृष्णवर्णीय स्त्रियांना श्वेतवर्णीय स्त्रियांप्रमाणे दृश्यमान करण्याचा प्रयत्न सराह उर्फ सी.जे. वॉकर करीत असल्याची टीका अनेक लोकांनी केली होती. परंतु लोकांचा हा आरोप तिने जोरदारपणे नाकारला. ‘आफ्रिकन अमेरिकन’ केसांना धक्का न लावता वा इजा न करता (ब्युटिफाय ब्लॅक अमेरिका) ‘काळी अमेरिका’ सुंदर करण्याच्या ध्येयाने ती केशसंवर्धक साधनांची निर्मिती करीत होती.
आपल्या कारखान्यात नवीन तऱ्हेचा माल तयार करून विक्रीसाठी ती प्रथम कुणावर अवलंबून राहिली नव्हती. ती स्वतः रस्त्यांवरून हिंडून, दारोदार जाऊन आपण शोध लावलेल्या वस्तूंची विक्री करीत होती. आपल्या मालाच्या गुणवत्तेची, लोकांच्या प्रतिक्रियेचा आणि विक्रीतील यशापयशाची, अडीअडचणींची कल्पना तिला आली असावी.
मॅडम सी.जे. वॉकरच्या परिश्रमांना आणि दूरदृष्टीला चांगलेच यश लाभले. अवघ्या पाच वर्षांत ती खूप श्रीमंत झाली. इंडियानामध्ये इंडियाना पोलीस येथे तिने ङ्गमॅडम सी.जे. वॉकर मॅन्युफॅक्चरींग कंपनीफ स्थापन करून तीन हजार लोकांना नोकरी दिली. तिने निर्माण केलेली केशसंवर्धक साधने महिलावर्गात अत्यंत प्रिय ठरली. केस सरळ करण्याच्या सी.जे. वॉकर निर्मित साधनांपूर्वी स्त्रिया आपले केस सरळ करण्यासाठी एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवून त्यावर इस्त्री फिरवीत असत. त्यामुळे केस जळत असत किंवा केसांना जळल्याचा वाईट वास येत असे. मॅडम सी.जे. वॉकरनिर्मित साधनांमुळे ‘तुम्हाला केस जळल्याचा वास येतो का?’ या प्रश्नाचे उत्तर ग्राहकाकडून ‘नाही!’ असेच येत असे.
पॅरीसमधील लोकप्रिय जोसेफाईन बेकर या विदुषीने जेव्हा तिच्या ‘डू’च्या संदर्भात वॉकर पद्धतीचे आभार मानले तेव्हा साऱ्या युरोपात मॅडम वॉकरची कीर्ती पसरली.
मॅडम सी.जे. वॉकर ही आपल्या कंपनीची एकमेव मालक आणि अध्यक्षही होती. तिच्या उद्योगजगताचे साम्राज्यच तिने वाढवून ठेवलेले होते. या साम्राज्यात कारखाना, वॉकर कॉलेज ऑफ हेअर कल्चर आणि ‘मेल ऑर्डर बिझिनेस’ वा पोस्टातर्फे व्यवसाय यांचा समावेश होता. संपूर्ण अमेरिकेत तिचे एजंटस् सौंदर्यप्रसाधनांचे प्रात्यक्षिक दाखवीत विक्री करीत फिरत होते.
मॅडम सी. जे. वॉकर ही खरोखरच संशोधक उद्योजिका, प्रतिभावंत विव्रेती आणि यशस्वी प्रशासक म्हणून विसाव्या शतकाच्या प्रारंभातील जगावेगळी स्त्री होती. वयाच्या अडतिसाव्या वर्षी, १९०५ च्या सुमारास परमेश्वराला आपले केस सरळ व्हावेत म्हणून तिने नुसती प्रार्थनाच केलेली नव्हती तर कोणत्या उपाययोजना केस सरळ होण्यासाठी कराव्यात याचा ध्यास तिने घेतला होता.
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या उक्तीप्रमाणे तिच्या स्वप्नात आलेल्या उपाययोजना आपल्या प्रतिभेने, बुद्धीमत्तेने, निर्मितीशक्तीने आणि विक्रीकौशल्याने जगासाठी तिने उपलब्ध करून दिल्या. आपले नाव सौंदर्यसाधनांच्या विश्वात अमर केले. आपले आयुष्य असंख्य तरुण-तरुणींना प्रेरक बनविले.
मॅडम सी. जे. वॉकरच्या अनेक कार्यांतील सर्वात अभिमानास्पद असे वाटणारे कार्य म्हणजे तिने असंख्य कृष्णवर्णीय स्त्रियांना एजंट म्हणून नोकरी दिली. ‘ॲव्हॉन लेडीज’ पूर्वी ‘वॉकर एजंटस्’ निर्माण झाले होते. वॉकर एजंटस् संपूर्ण अमेरिकेतील सर्वज्ञात व्यक्ती झाल्या होत्या. घराघरातून त्यांना बोलावणी येत. वॉकर एजंटस् कमरेपर्यंतचा पांढरा शर्ट, लांब काळ्या स्कर्टमध्ये खोचून वॉकर सौंदर्यसाधनांनी परिपूर्ण असलेल्या काळ्या बॅग्ज घेऊन रस्त्यारस्त्यावर धडक देत असत. विक्रीचा हंगामाच करीत असत.
सर्व एजंटस्ना नोकरीत येण्यापूर्वी सी.जे. वॉकर कंपनीचीच सौंदर्यसाधने आपण स्वतः वापरू याची निश्चित स्वरूपाची हमी द्यावी लागत असे. तसेच स्वच्छ राहणीमानाचे त्यांच्यावर बंधन असे.
मॅडम सी. जे. वॉकर वारंवार आपल्या एजंटस्च्या भेटीगाठी घेत असे. ‘स्वच्छता आणि सौंदर्य’ यांची शिकवण ती आपल्या एजंटस्ना देऊन स्वसन्मान आणि वांशिक प्रगती कशी होईल, हे सांगत असे.
मॅडम सी. जे. वॉकरने वॉकर क्लब्जमध्ये आपल्या एजंटस्ची विभागणी केलेली होती. कृष्णवर्णीयांसाठी औदार्याच्या कार्यास आधारभूत होण्यासाठी ती आपल्या एजंटस्ना उद्युक्त करीत असे.
दरवर्षी आयोजित होणाऱ्या एजंटस्च्या मेळाव्यात समाजकार्य करणाऱ्यांना मॅडम सी. जे. वॉकर रोख रकमांची पारितोषिके देत असे.
केसांना ‘वॉकर सिस्टिम’ची प्रात्यक्षिके दाखविणारे आणि सतत वाढत्या संख्येतील ‘वॉकर प्रॉडक्टस्’ लोकांपर्यंत नेणाऱ्या एजंटस्ची एकूण संख्या मॅडम सी. जे. वॉकरच्या मृत्यूपूर्वी दोन हजार इतकी होती.
मॅडम सी. जे. वॉकर आपल्या खेड्यात तिच्या वयाच्या एकावन्नाव्या वर्षी म्हणजे १९९८ साली निधन पावली. तिच्या किडनीज निकामी झाल्या असताही आणि रक्तदाबाचा विकार जडला असताही डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध ती तिच्या वेगवान कामाच्या व्यापापासून दूर राहिली नाही. डॉ. नीतू मांडकेंप्रमाणेच ‘वर्कोहोलिक’ स्वभावाची सारीच माणसे अकाली आपली आयुष्ये संपविताना जगभर दिसतात. माझ्या दृष्टीने समाजाच्या व त्यांच्या कुटुंबियांच्याही दृष्टीने अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान असलेल्या या माणसांचे मृत्यू म्हणजे आत्महत्याच असतात! मॅडम सी. जे. वॉकरचा मृत्यूही एका दृष्टीने आत्महत्याच होती, असे मला वाटते.
आपल्या आईच्या मृत्यूनंतर एलेलियाने मथळे वी शीर्षके मिळवणारी पावले आपल्या आईच्या पावलावर टाकीत एक फार मोठी सभा ‘दि डार्क टॉवर’ या शीर्षकाने आयोजित केलेली होती. या सभेसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या लोकांच्या यादीत प्रतिभावंत कृष्णवर्णीय संगीततज्ज्ञ, कलावंत आणि लेखकांप्रमाणेच श्वेतवर्णीय बुद्धीवंत, प्रकाशक, टीकाकार आणि त्यांचे पाठीराखे होते.
-–प्रा. अशोक चिटणीस
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply