मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली
फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।।
दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं
खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।।
काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी
घर पेटवून द्याया चहुंवर खड्या मशाली ।।
माझ्यामुळेच ज्यांचा जगिं मान वाढताहे
दाबून ओठ, करतो त्यांचीच मी हमाली ।।
मधुनीच हात स्फुरती, पण हाय रे नशीबा !
नाही कणा, बसे मी घालून मान खाली ।।
तक्रार कुठे नेऊ ? मी दाद कुणां मागू ?
चढवून सभ्य बुरखे, सारे उभे मवाली ।।
— सुभाष स. नाईक
मुंबई.
M- 9869002126.
Leave a Reply