नवीन लेखन...

माधव गडकरी

तब्बल सहा दशके वृत्तपत्रीय क्षेत्रात ‘चौफेर’ मुशाफिरी करणारा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असलेला एक लढवय्या, व्यासंगी, व्रतस्थ पत्रकार, एक तत्वचिंतक, मार्गदर्शक, पत्रकारितेच्या अथांग सागरातील दीपस्तंभ माधव गडकरी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला.

एकविसाव्या वर्षांपासून आपल्या अमोघ वक्तृत्वाने राज्यात, देश-विदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फर्डे वक्ते, लिहावे कसे… बोलावे कसे.. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच माधव गडकरी. अफाट ग्रंथसंपदा, अनेक संपादने, हजारो विषयांवरील अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख, यामधून काय वेचायचे आणि कसे वेचायचे, असा प्रश्न पडावा, इतके विपुल लेखन माधव गडकरी यांनी केले आहे.

माधव गडकरी हे मूळचे निफाडचे. तेथे वडिलोपार्जित अशी ३०० एकर सुपीक जमीन होती. मात्र नियतीचे असे काही विचित्र फासे पडले, निफाड कायमचे दुरावले आणि त्यांच्या वडिलांनी मुंबईत येऊन शून्यातून विश्व निर्माण करून माधव गडकरी यांना वाढवले, शिकविले, मोठे केले.

माधव गडकरी यांचे लहानपण लॅमिंग्टनरोड वरील टोपीवाला चाळीत गेले. १९३२ मध्ये माधवराव ठाण्यास राहावयास आले. गोखले रोडवरील मारुती मंदिरासमोरील ‘सिद्धाश्रम’ या इमारतीत दोन वर्ष वास्तव्य. पुढे १९३४ मध्ये वडिलांनी राममारुती रोडवर एकमजली टुमदार घर बांधले. आजोबांचे ‘सीताराम’ हे नाव या घराला दिले. १९३४ ते १९५८ असे तब्बल चोवीस वर्षे माधव गडकरी यांचे वास्तव्य ठाणे येथे होते. याच कालखंडात माधवरांवाचे शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच माधव गडकरी संपादकीय भूमिकेत शिरलेले होते. निर्झर क्षितिज (१९४७) कडून निर्धार (१९५४) या साप्ताहिकापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला.

माधव गडकरींच्या पत्रकारितेची बीजे ‘निर्धार’ या राजकीय साप्ताहिकाने पेरली. म्हणूनच ‘निर्धार ते लोकसत्ता’ माधव गडकरी यांचा वृत्तपत्रीय कारकिर्दीमधला प्रवास वाचनीय, अनुकरणीय आणि संस्मरणीय असा आहे. दा. भ. कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, पाडगावकर, मधू मंगेश कर्णिक, प्रभाकर अत्रे, नी. गो. पंडितराव अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास माधव गडकरी यांना लाभला. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

ठाण्याचे नी. गो. पंडितराव यांनी माधवरावांना वक्तृत्वातील खुब्या शिकवल्या. सभेत बोलावे कसे, भाषण कसे असावे याचे जणू धडे दिले. माधवरावांचे पहिले जाहीर भाषण गावदेवी मैदानात झाले. ‘ज्यांचे पाठांतर खूप, वाचन भरपूर, अनुभव समृद्ध असतात, ते चांगले वक्ते सहजपणे होतात.’ असे माधव गडकरी नेहमी सांगत असत. मा.माधव गडकरी हे संपादकीय भूमिकेत शिरल्यानंतर वृत्तपत्रलेखनाद्वारे, स्तंभलेखनाद्वारे अनेक लोकाभिमुख, सामाजिक संस्थांचा, थोर व्यक्तींचा, स्थळांचा, प्रांतांचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि परदेशातील अनेक घटनांचा तपशील वाचकांना करून देताना त्यांची प्रामाणिक तळमळ, धावपळ अधोरेखित होते. मा.माधव गडकरी यांच्या बद्दल पु. ल. देशपांडे म्हणत असत, ‘आजवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक कारागिरांचे हात लागले, त्याच्या हातून घडलेल्या सांस्कृतिक जडावांची आणि ते जडाव घडविणाऱ्या त्या लोकोत्तर कारागिरांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची शब्दचित्रे माधवरावांनी काढली. गडकऱ्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांचा वाचकांशी सलोखा वाढला. कारण गडकऱ्यांचा मन:पिंड ज्या ज्या संस्कारांनी घडला त्यांच्याशी कृतज्ञ राहून, इमान ठेवून गडकऱ्यांनी अफाट लिहिले, मोकळ्या मनाने लिहिले.’

पत्रकारितेच्या निमित्ताने माधव गडकरी यांनी जवळजवळ सर्वच देशात उदंड भ्रमंती केली. जे काही अनुभवले ते सारे लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे मांडले. जनमानसामध्ये उदंड आणि सार्थ विश्वास संपादन करून माधवरावांनी एक आदर्श निर्माण केला. समाजातील अनेक वंचितांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केली. तसेच समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर आणि भ्रष्टाचारावर प्रहारात्मक, परखडपणे लिखाण केले. एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माधवरावांची भाषणे गाजत असायची, तर दुसरीकडे त्यांची विविधांगी विषयांवरची पुस्तके, लेखसंग्रह सातत्याने प्रकाशित होत असायचे.

माधव गडकरी यांच्या एकूण संपादकीय कारिकर्दीचा, लेखनाचा वेळोवेळी गौरव झाला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यात पद्मश्री, अनन्त हरी गद्रे पुरस्कार, भ्रमन्ती पुरस्कार, लोकश्री पुरस्कार, भारतकार हेगडे देसाई पुरस्कार, प्राचार्य अत्रे पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले होते. २००६ मध्ये ठाणे येथे संपन्न झालेल्या नवव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वरकरणी खूप कठोर आणि कडक स्वभावाचे वाटायचे. मात्र अंतरंगी ते अतिशय मृदू स्वभावाचे होते, कुटुंबवत्सल होते.
१ जून २००६ रोजी माधव गडकरी यांचे निधन झाले.

माधव गडकरी यांची साहित्यसंपदा
त्यांचे एकूण पस्तीसच्यावर ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘चौफेर’ या त्यांच्या स्तंभलेखनाचे पाच खंड, ‘दृष्टीक्षेप’ या सदरांचे तीन खंड अभ्यासपूर्ण आहेत. व्यक्तिचित्रे प्रवासवर्णने गाजली आहेत. काही निवडक पुस्तके – ‘असा हा महाराष्ट्र’, ‘असा हा गोमंतक’, ‘मुंबई ते मास्को व्हाया लंडन’, ‘सोनार बंगला’, ‘सत्ता आणि लेखणी’, ‘हॅलो चार्लस’, ‘माओ नंतरचा चीन’, ‘कुसुमाग्रज गौरव’, ‘गुलमोहराची पाने’ इ.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.रामदास खरे/लोकमत

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..