सीएसटी स्टेशनजवळचंच, एम्पायरच्या गल्लीतलं ‘विठ्ठल भेळवाला’ म्हणजे चाट पदार्थाचं शाही जॉइंट! विठ्ठल खांडवाला यांनी १८७५ मध्ये हे हॉटेल सुरू केलं.
भेळपुरी, पाणीपुरी म्हणजे चौपाटीवर उभे राहून भैय्याच्या हातच्या खाण्याच्या गोष्टी असे समिकरण होते. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात गिरगाव किंवा दादर चौपाटीच्या मोकळ्या हवेत कगदावर पळसाचं पान ठेउन त्यात दिलेली भेळ एका हातावर घेऊन उडणार्या वाळूपासून स्वत:ला सावरत कडक पुरीने ती भेळ खाण्यात जी लज्जत होती ती मुंबईतील कुठल्याच भेळवाल्याच्या दुकानात नव्हती.
अशावेळी “विठ्ठल”ने या पदार्थाना ‘सॉफिस्टिकेटेड ग्लॅमर’ दिलं. जुन्या जमान्यातले राज कपूरसारखे अनेक फिल्मस्टार्स इथे भेळपुरी खायला आवर्जून यायचे. विठ्ठलच्या भेळपुरीबरोबर मिळणार्या वेगवेगळ्या चटण्या आणि टॉपिंग्स हे तर बहारदारच.
आता मात्र कौटुंबिक वादामुळे विठ्ठल भेळवाला ‘शटरबंद’ अवस्थेत आहे. मात्र, या बंद हॉटेलच्या शेजारीच विठ्ठल खांडवाला यांच्या पुढल्या पिढीतील प्रतिनिधी मनहर आणि सुनील हे ‘विठ्ठल फॅमिली रेस्टॉरन्ट’ चालवीत आहेत.
कॅपिटॉल थिएटरच्यासमोर आझाद मैदानाच्या कोपर्यावर “कॅनन” हा भाजी-पाव व डोश्याचा नवीन नवीन स्टॉल सुरू झाला होता. लोकांची तिथे सदैव गर्दी असे. “माजी जवानाचा उपक्रम” अशी त्याची जाहिरात व्हायची. भाजी पाव तर फॅन्टास्टिक असायचा. या स्टॉलवर असलेला भाजी बनवण्याचा अजस्त्र तवासुद्धा लोकांच्या आकर्षणाचा विषय झाला होता. दूरवरुन लोकं “कॅनन”ची पाव-भाजी खायला यायचे.
गिरगावातील ‘माधवाश्रम’ हे हॉटेल १९०८ साली सुरू झाले. या हॉटेलला आता ११० वर्षे पूर्ण झाली आहेत.
परशुराम महाजन आणि त्यांचे मामा धोंडू सावले यांनी हे हॉटेल सुरू केले. सुरुवातीला ठाकूरद्वारला झावबाची वाडी येथे हे हॉटेल सुरू झालं. नंतर ते मोहन बिल्डिंगमध्ये हलविण्यात आलं. सुरुवातीला एक खानावळ असे स्वरूप असलेले हे हॉटेल १९१७ मध्ये हॉटेल म्हणून नावारूपाला आले. सध्या महाजन यांची चौथी पिढी- म्हणजे रमेश महाजन यांची मुलगी गौरी वेलणकर या हॉटेलच्या व्यवस्थापनाचे काम पाहत आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनल समोरच डी. एन. रोडवर असलेले ‘नृसिंह लॉज आणि साबर व्हेज रेस्टॉरंट’ गेले शतकभराहून जास्त काळ कार्यरत आहे. पहिल्या मजल्यावरील रेस्टॉरंट गुजराती थाळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र गुजराती थाळी हे वैशिष्ट्य असूनही केवळ गुजरातीच नव्हे तर सर्वभाषक लोक या हॉटेलमधील स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतात.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply