दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते.
“अरे तो दारू पितो”,
“बेवडा आहे पक्का साला”,
“त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”,
“त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो”
असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे.
त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू… निषिद्ध मानली जाते.
पण… एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सध्या… निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..!
ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय..?
चला तर आज तेच बघूयात…!
कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे ‘ दारू ‘ अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची..!
त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते.
अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर ‘अल्कोहोल’ मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात.
त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल)
दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार.
दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती..? ह्यावरून, दोन प्रकार पडतात..!
‘लिकर’ आणि ‘लिक्युअर.’
लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली.
लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवणानंतर घेण्याचा प्रकार.
लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर… लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार..!
(इथे… कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्चाने इथे दुर्लक्ष करावे).
लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे..? त्यावरून..!
व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती… वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते.
अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते..!
कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते.
कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते.
जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते.
मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते.
व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते.
जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते..!
लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात..!
तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात..!
भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोल मध्ये वेगवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण… विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते.
ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे… असला शास्त्रोक्तपणा नसतो.
इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो.
प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारूचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते.
बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे… जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर… तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते.
मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून
त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते..!
ह्याउलट…हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण… बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय.
अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये…! ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते. माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण… बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो.
ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो. त्यामुळे… कच्चा माल दर्जाहीन असला तरीही
काहीही फरक पडत नाही. कारण… इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते.
डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो.
ह्या प्रकारच्या दारूमुळेच, ‘दारू वाईट’ असा सरसकट समज झाला आहे..!
ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे… देशी दारू किंवा सरकार मान्य दारू..!
हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य. हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही… स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असते.
आता दारू म्हणजे काय.? ते कळले. पण… दारू प्यायल्यावर नेमके होते काय.?
खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने.
जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते.
त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.
जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण… पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे… अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो.
एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोलच्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात. शरीराच्या हालचाली मंदावतात.
त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते.
अर्थात… हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे. त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते.
‘अती तिथे माती’ ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली, तर… सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते..!
ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते.
३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो.
शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल शरीरासाठी एक अॅन्टीबॉडीच असते. त्यामुळे… यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात.
आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात. आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग.?
तर… त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते. त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते. आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते..! त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात. त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते..!
तर… दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर… माणसाची अवस्था बिकट होते…
आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल..?
तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते..?
तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही..?
तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते.
आणि… दारू पिणार्याचा ‘वकार युनुस’ होतो..!!
त्यामुळे… दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, ना पेक्षा ‘दारू म्हणजे वाईट’ असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते..!
तर आता ”दारू म्हणजे काय..?” ”ते… कळले का रे भाऊ..!!!”
Leave a Reply