जें कांहीं मिळतें कोणाला मदिरापानानें
त्याहुन कैकपटीत फायदा मदिरा-गानानें
मद्यपान अतिरिक्तच होतें, शुद्ध उरत नाहीं
मद्य-गान अतिरिक्त, धुंदवी शुद्धीत राहुनही ।।
”होळीचा सण अन् ‘गटारी अवस’ अमुचे लाडके
रात्र ‘ओली’ ती, कुणीही ना पिण्यां अडवूं शके” ।
”हाय ! दोस्तांनो, तुम्हांला सण कशाला लागती ?
‘भरुन पेला कर रिता’, हें रोजचे क्षण सांगती” ।।
सर्वांपुढे निजदु:खा मिरवीत ल्यायलो मी
क्लेशांबरोबर थोडी मदिराहि प्यायलो मी
झिंगून धुंद झालो, उतरली नशा नंतर
पण, वेदना मनाची राहीच मजबरोबर ।।
हें मद्य म्हणा वा ‘जळजळणारें जल’
अमृत म्हणा हवें तर, किंवा म्हणा हलाहल
कांहीही नाम ठेवा, पण ‘नांवें ठेवुं नका’
हें ‘संजीवन’ जीवनिंचें, त्याविण हा जन्म फुका ।।
रे घेऊं द्या ज़राशी, कां ‘नाट’ लावता रे ?
मद्यालयात जातो, कां वाट अडवतां रे ?
या, बसून माझ्यासंगें थोडीतरि चाखा तुम्ही
रे मान सुरा-राज्ञीचा थोडातरि राखा तुम्ही ।।
हातामधें सुरेचा पेला काठोकाठ आहे
हा पेला म्हणजे स्वर्गसुखाची वाट आहे
या पेल्यामधे सुरेचा झगमगता थाट आहे
ती कंठामधें उतरतां, आनंद-लाट आहे ।।
द्या सुरा मजला ज़रा, ना तर मला मारा सुरा
या सुरेचा मोह पडला यक्ष-गंधर्वां-सुरां
जर सुरा नाहीं मिळाली, काय जगण्यांची मजा ?
द्या सुर्यानें मरण, मदिरेविण असे जीवन सज़ा ।।
सुरा : (१) मदिरा, मद्य ; (२) चाकू .
सुरां : देवांना . नाट लावणें : अपशकुन करणें
अडखळत बोलतो मी, धडपडत चालतो मी
मधुनीच तोल जातां, धरणीस चुंबतो मी
‘वृद्धत्व यास आले’, म्हणती बघून सारे ,
पण, मद्य फार झालें, म्हणुनी असें घडे रे ।।
रोगास माझिया या, मद्यार्क फक्त चाले
खाणें नको, ‘पिणें’ द्या, हें पथ्य सक्त चाले
हा ‘डोस’ रोज मज द्या, ना तर अशक्त होतो
चाटून थेंब-मदिरा, ‘अस्तित्व-मुक्त’ होतो ।।
दारूवर कैसी बंदी ?, की नुसती उगिच प्रसिद्दी ?
चालतोच खुल्ला धंदा, खुर्च्यांना चारुन चंदी
मदधुंदांच्या कुटुंबां आक्रंद कराया बंदी
अधिकारधुंद जे, त्यांना ठेवूं कायम आनंदी ।।
प्राशकहो, तुम्हांसाठी हा सिग्नल लालच असतो
दारूबंदी असतांना, परवाना कोणां नसतो
पण या दारूबंदीची खुर्च्यांना नाहीं पर्वा
त्यांच्यासाठी तर आहे सिग्नल कायमचा हिरवा ।।
प्राशक : पिणारे
— सुभाष स. नाईक.
Leave a Reply