आजकाल आपण एखाद्या गाण्याचा मनात विचार जरी आला तरी गुगलवर वा युट्युबवर गाणी ऐकू वा पाहू शकतो.
बरोबर..?
पण आजपासून वीस तीस वर्षांपाठी अशी परिस्थिती नव्हती. आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे.
कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते.
बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं.
आमच्या लहाणपणी (साधारण ऐंशीच्या दशकात) अजून टिव्ही घरोघरी पोचलेला नव्हता. पण रेडियो मात्र महानगरांपासून ते अतिदुर्गम खेड्यांपर्यंत पोचले होते.
मोठ्या टिव्हीच्या आकाराच्या रेडियोपासून छोट्या tab च्या आकाराचे transistor रेडियो पर्यंत व्हरायटीचे रेडियोसंच मिळायचे. आपापल्या ऐपतीप्रमाणे रेडियोचे मॉडेल निवडले असले तरी त्याचे घरात ‘असणे’ हे बंधनकारक होते.
रेडियोचे कार्यक्रम प्रसारीत करणारे तीन मुख्य ब्रॉडकास्टिंग संस्था तेंव्हा अस्तितवात होत्या.
१. आकाशवाणी:
आकाशवाणी ही सरकारी संस्था. त्यामुळे् मनोरंजना बरोबरच सरकारचे कार्यक्रम, योजना लोकांपर्यंत पोचवणे हे तिचे मुख्य काम. बातम्या, प्रबोधनपर कार्यक्रम, माहिती वर आधारीत कार्यक्रम अन इतर वेळी मराठी वा हिंदी गाणी असे त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरुप. क्रिकेटचे सामने असताना दिवसभर रनींग कॉमेंट्री देखील यायची आणि पूर्ण देश मग रेडियोला चिकटून बसलेला असायचा. (ज्यांनी 83 पाहिलाय त्यांना लक्षात असेल बॉर्डरवर कॉमेंटरी ऐकणारे आपले जवान)
तुमचे जवळचे आकाशवाणी केंद्र जितके जवळ तितके प्रसारण चांगले व सुस्पष्ट असायचे. आमच्या मिरजेला आमच्या सांगली आकाशवाणी केंद्राचेच प्रसारण असल्याने आम्ही याबाबतीत भाग्यवान होतो. पुणे, मुंबई, नागपूर नंतर केवळ सांगली आकाशवाणीलाच थेट कार्यक्रम प्रसारणाची सोय होती. त्यामुळे कार्यक्रम सांगली व आसपासच्या भागावर केंद्रीत असायचे.
सकाळी सहाला भक्तीसंगीताने जे कार्यक्रम सुरु होत ते थेट दुपारी दिड दोनलाच बंद होत. मग परत संध्याकाळी पाचला प्रसारण सुरु होउन रात्री दहालाच संपायचे. सांगली केंद्राचे गाण्यांचे कलेक्शन खूप जबरदस्त होते. मराठी गाणी तर अफाट. त्याकाळी मराठी भाव, सुगम, नाट्य व चित्रपट संगीतातले कुठलीही गाणी ही हमखास सांगली केंद्रावर वाजायचीच. इथली रविवारी दुपारी लागणारी मराठी गाण्यांची ‘आपली आवड’ तर सुपरहीट होती. त्यामुळे हिंदी बरोबरच मराठी संगीताचे वैभव देखील लहाणपापासूनच आम्हाला अनुभवता आले.
२. विविधभारती:
ज्या रेडियो प्रेमींना हिंदी व विशेषतः जुन्या गाण्यांची आवड होती ते विशेषकरुन विवीधभारतीची ‘ऑल इंडिया रेडियो सर्विस’ ऐकायचे. ऑल इंडिया सर्विस म्हणजे भारतात तुम्ही कुठेही रहात असाल तरी तुम्हाला त्या फ्रिक्वेंसी बैंडवर तेच प्रसारण ऐकायला मिळायचे. या कारणाने हिंदी भाषीक लोकांमधे विवीधभारती जास्त लोकप्रिय होती.
विवीध भारतीवर सकाळपासून रात्रीपर्यंत विवीध कार्यक्रमातून जास्तीत जास्त हिंदी चित्रपट संगीत ऐकवलं जाई. विशेष करुन १९५० ते १९८० या काळातले,म्हणजे हिंदी सिने संगीताच्या सुवर्ण काळातले संगीत ऐकण्याचे मुख्य ठिकाण तेंव्हाही विविध भारतीच होते व आजही आहे. एखादा व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत एका दिवशी साधारण शंभर एक गाणी नक्की ऐकू शकायचा.
विवीध भारती वर विशेष लोकप्रिय असे कार्यक्रम म्हणजे त्यांचे फर्माइशवर आधारीत कार्यक्रम. सामान्य लोकांपासून फौजी लोकांपर्यंत सर्वजण आपल्या आवडीची गाणी विवीध भारतीला टपालाने पाठवत व विवीध भारती त्यांचे संकलन करुन कधीतरी तीन चार महिन्याने ते गाणे कोणत्यातरी कार्यक्रमात लावत असे. तरीही लोक लाखोंनी पत्र पाठवत असत. कमी जाहिराती व जास्तीतजास्त गाणी हे उद्देश ठेउन विवीध भिरती सुरवातीपासून लोका़चे मनोरंजन करत आली आहे.
आजही FM Radio च्या झंजावातात विवीधभारती आपले वैशिष्ठ्यांसह जर टिकून आहे, तर केवळ तिथल्या उत्तम निवेदकांमुळे व लोकांच्या या जुन्या गाण्यांकडे असलेल्या अखंड ओढ्यामुळेच.
३. रेडियो सिलोन
श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात SLBC ही संस्था खरं तर श्रीलंकेतील कोलंबोस्थित कंपनी. पण आजच्या पिढीला कदाचीत पटणार नाही की १९५२ पासून जवळ जवळ १९८९ फर्यंत ही संस्था तिच्या हिंदी प्रसारणाने भारतीय असलेल्या आकाशवाणी व विवीधभारतीला तोडीस तोड स्पर्धा देत होती. अमिन सायानी संचलीत ‘बिनाका गीतमाला’ सारखा रेडियो सिलोनवरचा कार्यक्रम तर इतका लोकप्रिय होता, की प्रत्येक आठवड्यात कोणते गाणे ‘पहले पायदान’ वर राहणार यावरुन पैजा लागायच्या. चालू गाण्यांच्या लोकप्रियतेचा बिनाका गितमाला हा एक पारदर्शी मापदंड होता..ज्यावरुन त्या त्या वर्षाचे सर्वात लोकप्रिय गाणे देखील ठरायचे.
अमिन सायानीं बरोबरच रेडियो सिलोनचे इतर अनेक कार्यक्रम व त्यांचे निवेदक अतिशय लोकप्रिय होते. ‘ये रेडियो सिलोनका प्रसारण है’ असे म्हणत एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम तिथून प्रसारीत व्हायचे. नव्वदच्या दशकात ही सेवा बंद पडली व रेडियोच्या इतिहासातली एका सोनेरी कालखंडाची समाप्ती झाली.
अशा या तीन रेडियो प्रसारण सेविंनी एकेकाळी भारतीय मनांवर एकत्रित राज्य केलय. यापैकी आकाशवाणी व विवीधभिरती या दोन्ही संस्था आपापले अस्तित्व टिकवून असले तरी इंटरनेट, टिव्ही व मोबाइल एप्सच्या झंजावातात त्या किती व कसे तग धरतात हा एक महत्वाचा प्रश्नच आहे.
बाकी वैयक्तिक माझ्या लहाणपणीच्या व तरूण होतानाच्या काळातल्या अनेक गोड आठवणी रेडियोशी जोडलेल्या आहेत. आज जसा मोबाइल आहे तसाच रेडियो हा जनमाणसाच्या जिवनाचा अविभाज्य भाग एकेकाळी होता यात माझ्या व माझ्या आधीच्या पिढीतील कोणाचेही दुमत असणार नाही.
मला आठवतंय की लहाणपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी, आजोळी जायचो तेंव्हा सर्व भावंडं घराच्या वरच्या गच्चीवर झोपायला जायचो. तेंव्हा रात्री सोबतच्या transistor radio वर जिथे छान गाणी लागली असतील असे स्टेशन ट्यून करुन ती गाणी आकाशाकडे पहात, अंथरुणावर पडून ऐकण्यात जे सुख, जो आनंद, जे समाधान भेटायचे ते आजच्या कोणत्याही किमती गैजेटने मिळणार नाही हे नक्की.
‘तारोंको देखते रहे छत पर पडे हुए’ हे गुलजारचे शब्द लताच्या आवाजात ऐकत ऐकत नकळत डोळा लागणे म्हणजे काय स्वर्गसुख असतं हे आताच्या मिलेनियल जनरेशनला कदाचीत लक्षात येणार नाही.
पण आमची पिढी मात्र रेडियोच्या त्या सुवर्ण काळाची आठवण काढीत हेच गुणगुणत राहील..
‘दिल ढुंढता, है फिर वही..फुरसत के रात दिन…!!’
— सुनील गोबुरे.
Leave a Reply