|| हरी ॐ ||
आज देशात सगळीकडे महागाईचा आगडोंब उसळा आहे आणि त्याची झळ प्रत्येक कुटुंबाला बसतेच पण त्यात जास्त त्रास सहन करावा लागतो त्या कुटुंबातील स्त्रीला आणि मग बाजारातील वस्तूंचे भाव कडाडलेले बघितले की साहजिकच तिच्या कपाळाला आठ्या पडतात. कारण कुटुंबातील स्त्रीलाच सर्व गोष्टींचा दैनंदिन जीवनात सामना करावा लागतो. एखादी गोष्ट/वस्तू खूप मिळायला लागली, आवडायला लागली की तिचे महत्त्व वाटेनासे होते. सध्याच्या महागाईने सर्वांचे असेच झाले असले तरी खुपदा सगळ्या गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचे सोंग कसे आणणार आणि आर्थिक ताळमेळ कसा घालणार? महागाईचा भस्मासूर सामान्य माणसाला खूप त्रासदायक झाला आहे. महागाईने वस्तूंचे दर वाढले की बऱ्याच कुटुंबांची जीवन प्रणाली बदलताना दिसते. यामुळे बऱ्याच जणांना आपली हौस/मौज पूर्ण करता येत नाही.
सध्याची महागाई बघितली की आपल्या घरातील सिनियर/बुजुर्ग आजी-आजोबा गोष्टी सांगायला सुरुवात करतात आणि आपल्याला त्या गोष्टी दंतकथाच वाटतात. काय तर म्हणे, पूर्वी रुपायाला चार ते पाच शेर तांदूळ मिळत होते. लोणी, साजूकतूप, दूध यांची रेलचेल होती. सोने दहा रुपये तोळा होते. महिना पंधरा-वीस रुपयांच्या पगारात आठ-दहा माणसांचे कुटुंब आनंदाने राहत होते आणि वर पाच-सहा रुपये शिल्लक टाकता येत होते. असो.
आत्ताच्या दिवसात शाळा/कॉलेजात जाणाऱ्या मुला/मुलींना दिवसभरासाठी पॉकीटमनीच पन्ना-साठ रुपये द्यावा लागतो आणि कधी कधी तेही पुरत नाहीत. या सर्व गोष्टी आज परिकथेप्रमाणे अदभूत आणि असंभवनीय वाटतात. आज पैशाचे मूल्य घसरत चालले आहे. कितीही पैसे कमावले तरी ते पुरे पडत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलेली स्वप्नं आज भंग पावली आहेत. तेव्हा असे वाटत होते की, स्वराज्य आले की, आपण खूप सुखी होऊ. पण सध्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेले वास्तव रौद्र रूप धारण करीत आहे. सध्याच्या महागाईमुळे देशातील काही गोरगरीब आणि मजुरांना एका वेळचे अन्न देखील मिळू शकत नाही. महागाईचा आलेख सतत वरवरच चढत जात आहे. त्यामुळे कित्येक जीवनावश्यक गोष्टीही आज दैनंदीन जीवनातून गायब होताना दिसतात.
खरे पाहता, स्वातंत्र्योत्तर काळात आपण कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रात प्रचंड प्रगती केली होती. परंतु सध्या शेतीची अवस्था, महापुरासारख्या विविध गोष्टींमुळे पिकांची नासाडी होते. यामुळे शेतातून योग्य तो माल मिळत नाही. यामुळे बाजारपेठेत माल कमी येतो. तसेच सरकारकडून मालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळतात व या परिस्थितून महागाई वाढण्यास सहजरित्या अनेक विविध पर्याय उपलब्ध होतात. हरितक्रांती, श्वेतक्रांती झाली असे उत्पादक म्हणतात. मग आजही गरीबांच्या मुलांना किमान एक वेळची भाजी/भाकरी व दूध का मिळू नये ? याला जबाबदार कोण ? स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक स्थितीचा अधिक सखोल अभ्यास केला तर लक्षात येते की, श्रीमंत हे अधिक श्रीमंत व गरीब हे अधिक गरीब होत चालले आहेत. दैनंदिन गरजेच्या गोष्टी महाग झाल्यावर त्याने काय करावे ? दूध हे पूर्णान्न पण आज ती चैनीची गोष्ट झाली आहे, अन्नधान्य, तेल-तूप, डाळी तसेच भाजीपाला यावर महागाईचे आक्रमण झाल्यावर गरीबांना ते मिळणे केवळ अशक्य आहे. आज घरांच्या/जागांच्या किमती गगनाला भिडल्याने झोपडपट्ट्या सतत वाढत आहेत. महागाईमुळे कौटुंबिक सौख्याची हानी होत आहे यामुळे ताण/तणाव वाढून मुलांच्या लहानमोठ्या गरजादेखील पूर्ण करणे पालकांना शक्य होत नाही. वैयक्तिक व सामाजिक चारित्र्याच्या ऱ्हासाचे बोलायलाच नको. अशी ही महागाईरुपी महामाया अनेक संकटांना आमंत्रण देते. आजच्या या प्रगत जगात अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. इंधन टंचाई आणि वाढलेले दर हा महत्वाचा घटक आहे. दळणवळण तर एवढे महाग झाले आहे की, गरीबांनी प्रवास करणे अशक्य झाले आहे.
महागाई वाढण्याची करणे कदाचित पुढील प्रमाणे असू शकतात.
नित्य उपयोगी वस्तूंवरील खर्च वाढतो, मागणी वाढते आणि बाजारात त्याच वस्तूंचा पुरवठा असमतोल होतो आणि किंमतीत भरमसाठ वाढ होते. वाढत्या लोकसंख्येमुळे गरजा वाढतात, मागणी वाढते. परकीय चलन वाढविण्याच्या नादात निर्यातीत वाढ होऊन वस्तूंच्या साठ्यात घट होते, पुरवठा कमी होतो आणि वस्तू महाग होतात. महागाई वाढल्याने उत्पादनात घट होऊन वस्तूंची टंचाई होते. नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी उत्पन्नाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. साठेबाज कृत्रिम टंचाई निर्माण करून आपले उखळ पांढरे करून घेतात. भाव वाढीच्या परिणामामुळे चलन मूल्यात घट होऊन सार्वजनिक बचत करण्यात लोकांत उत्साह राहत नाही. याने देशी-विदेशी गुंतवणुकीतही घट होते. बाजारात वस्तूंची मागणी वाढल्याने वस्तूंचा दर्जा राखला जात नाही.
देशात भाववाढीने सर्वसाधारण माणसांचे कंबरडे मोडले आहे. महागाईला कळत नकळत आपण सर्व जबाबदार आहोत. कारण आपल्या ऐयाशी, खर्चिक आणि अतृप्त गरजांनी आपल्या मनाचा ताबा घेतला आणि त्या पुऱ्या करण्यासाठी आपण काय वाट्टेल ते करण्यास तयार होतो. त्याची परिणीती सर्व गोष्टींचे भाव वाढण्यात झाली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
बऱ्याच राज्यांमध्ये सरकारी तिजोऱ्या रिकाम्या आहेत. कृषीक्षेत्रातील इतर आवश्यक आर्थिक सुधारणांबरोबर मंडयांच्या खरेदीमधील एकाधिकार संपविणे, शेतजमिनींच्या विविध तुकड्यांचे एकत्रीकरण, शेतमालाच्या किंमतीत व शहरी ग्राहकांनी मोजलेल्या किंमतीतली तफावत कमी करणे. भ्रष्टाचाराने निर्माण होणारा काळापैसा, बनावट नोटा, गरीब आणि श्रीमंत यांच्यात वाढत चाललेली दरी, सदोष करपद्धती, कमोडिटी मार्केटमधील सट्टेबाजी आणि ‘इझीमनी’मध्ये गेल्या काही वर्षांत झालेली वाढ, जगात वाढत चाललेले परस्परावलंबी व्यवहार या सगळ्याचा एकत्रित परिणाम वस्तूंचे भाव/दर वाढण्यात होतो.
एकच उदाहरण पुरेसे आहे. देशात चारचाकी वाहनांची संख्या काही वर्षांपूर्वी किती होती? आणि आता किती आहे? सरकारच्या आर्थिक आणि जागतिक उदारीकरणाच्या नावाखाली आज कित्येक देशातील मोटारींचे उद्योग देशात आले त्याने रोजगार निर्माण झाले खरे पण त्याबरोबर पेट्रोल/डिझेलची मागणी कित्येक पटींनी वाढली, आणि ती पुरी करण्याकरिता सरकारला अतिरिक्त इंधन आयात करावे लागते यामुळे आपल्याच चलनाचे अवमूल्यन होते आणि देशात महागाई तोंड वर काढते ! त्यात कमी म्हणून की काय प्रदूषण आणि ट्राफिकचा प्रश्न दररोज जीवघेणा होत चालला आहे.
जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply