माहूरगडावर गेली कितीतरी वर्ष जायचं मनात होतं …. नांदेड परभणी जवळ कुठेतरी आहे अशी धूसर माहिती होती … आमची कुलस्वामिनी अंबेजोगाईची ‘योगेश्वरी’ … तिथे गेली तर कधीतरी माहूरगडावर देखील जाऊ … असा देखील विचार अनेकदा मनात येई .. पण जाणं कधी झालं नाही …. हैदराबादला ट्रान्स्फर झाली ….. आम्ही नियमितपणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातली ठिकाणं फिरायला लागलो … तेव्हा मात्र एक शनिवार रविवार आम्ही दोघं नांदेडला पोचलो .. दोन दिवसांकरता एका टुरिस्ट टॅक्सीची व्यवस्था केली … मात्र शनिवारी सकाळी ट्रेन नांदेडला उशिरा पोचल्यामुळे मनात बराच संभ्रम निर्माण झाला …. माहुरगड नांदेडहून साधारण एकशे पंचवीस-तीस किमीवर … त्यात मधल्या काही टप्प्यात रस्त्याची जोरात कामं चालली असल्याने एका दिवसात जाऊन येत येईल का … दुसरा विचार आला की त्या पेक्षा जवळच्या ‘कंधार’ किल्ल्याची ट्रिप करावी … मात्र नांदेडचे मित्रवर्य… प्राध्यापक वेंकटजी सोळंके हे सकाळी भेटायला आले होते .. त्यांनी आणि टुरिस्ट टॅक्सीचे ड्रायव्हर या दोघांनीही सांगितलं की … सर … आरामात जाऊन याल … आणि आम्ही निघालो … (तसं तेलंगणातलं ‘आदिलाबाद’ … महाराष्ट्रातलं किनवट .. यवतमाळ … पांढराकवडा इथून देखील माहूरगड जवळ आहे … )
देवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला …. (चुना, कात, सुपारी, वेलची, लवंग, बडीशोप, खोबरे, जायपत्री, कपूर, कंकोळ, केशर आणि खसखस .. असे तेरा पदार्थ घालून हा विडा करतात) … ट्रस्टींनी देवस्थानच्या वतीनं आमच्या दोघांना देवीचा प्रसाद तर दिलाच पण खास भेट देखील दिली … खूप सन्मान केला ..
महाकोपी जमदग्नी ऋषींची पत्नी आणि महातेजस्वी भगवान परशुराम यांची आई असलेल्या ‘रेणुका’ मातेचं दर्शन तर कधीच विसरता येणार नाही असं झालं …. देवीच्या प्रांगणातून सभोवतालचा माहूरगड … हिरव्यागार डोंगररांगा … समृद्ध निसर्ग बघता आला …. देवीचं दर्शन इतकं सुंदर आणि आश्वासक की सतत तिच्या दर्शनाला जावं अशी सारखी ओढ लागली … आज देखील हे लिहिताना देवी अगदी समोर दिसत्येय …. प्रसन्न आणि आश्वासक रूपात …
— प्रकाश पिटकर
Leave a Reply