(श्राद्ध हा हिंदू धर्मशास्त्रातील एक जटील आणि गहन असा विषय आहे. या विधीचा साकल्याने विचार एका छोट्या लेखात करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधीक रूपात विषयाचा परिचय करून देण्याचा हा अल्प प्रयत्न.)
हिंदू धर्म संस्कृतीमधील एक महत्वाची संकल्पना म्हणजे धार्मिक आचार. नामकरण, मुंज, विवाह अशा विधींच्या जोडीनेच हिंदू जीवनप्रणालीत श्राद्धविधीचे महत्व विशेषत्वाने आहे.
श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. श्राद्धाच्या विविध व्याख्या धर्मशास्त्रकारांनी सांगितल्या आहेत. त्यामध्ये दिवंगत पूर्वजांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देश काळ आणि पात्रता विचारात घेता ब्राह्मणाला काही देणे याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धामध्ये दिवंगत व्यक्तीला अनुसरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण व गरजू व्यक्तीना भोजन व दान दिले जाते. अशी एकूण ९६ प्रकारची विविध श्राद्धे करणे विहित मानले जाई. आता या सर्व श्राद्धविधींचे आचरण करणे काळाच्या ओघात शक्य नसले तरी व्यक्तीच्या निधनानंतर केले जाणारे श्राद्ध, वर्षश्राद्ध असे काही निवडक श्राद्धविधी आजही समाजात केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे महालय श्राद्ध-
भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. अनंताची पूजा काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुस-या दिवशी सुरु होतो पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काल हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सर्वसामान्यपणे शुभ कार्य करीत नाहीत, त्याविषयी बोलणी करीत नाहीत आणि खरेदीही करीत नाहीत !
महालयाचा काळ
- वस्तुत: मध्ययुगात आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु होत असे. आणि भाद्रपद महिन्याच्या अखेरीस संपत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवला जात असत होतो असे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी नोंदविले आहे.
- भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी आपल्या हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथात नोंदविले आहे की आषाढ महिन्यातील पौर्णिमेपासून पुढे पाच कक्ष म्हणजे भाद्रपद कृष्ण पक्षात महालय श्राद्ध करावे. यावेळी सूर्य कन्या राशीत असतो आणि दक्षिणयान मध्यात आलेले असते. याला गजछाया असेही म्हटले जाते.
या काळात महालय करणे न जमल्यास आश्विन अमावास्येला दिवे लावून हे श्राद्ध करावे. या श्राद्धात विश्वेदेव तसेच धुरिलोचन नावाच्या पितरांना पिंडदान केले जाते.
महालयश्राद्धाचा गौण काळ आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत मानण्यात आला आहे.
- दक्षिणायनात स्वर्गातील देवांची रात्र असते पण त्यावेळी पितृलोकात दिवस असतो असा एक धर्मशास्त्रीय संकेत प्रचलित आहे. त्यामुळे दक्षिणायनात पितरांना संतुष्ट करावे असेही संदर्भ आढळतात.
- धर्मसिंधु या ग्रंथात ही काशिनाथशास्त्री उपाध्ये यांनीही कन्या राशीस्थित रवी हा प्रशस्ती संपादक असल्याने या काळात महालय करायला पुष्टी दिली आहे.
( याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात विपुल चर्चा आढळते, तरी येथे केवळ निवडक संदर्भच नोंदविले आहेत. जिज्ञासूंनी याविषयी अधिक माहिती अवश्य घ्यावी. )
महालयाचे वेगळेपण- वसुधैव कुटुंबकम।
महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही !
Leave a Reply