नवीन लेखन...

महानगराचे पिकलेपण (कथा)

कुणीतरी विचारलं, कहा जाना है? वाचता येत असतं तर तुला कशाला विचारलं असतं? असा म्हातारीचा रोखठोक प्रश्न ऐकून प्रश्नकर्ता मागच्या मागे सटकलेला होता.


दादरला  जेवढी गर्दी असते तेवढी इतरत्र कुठे असेल असं वाटत नाही. सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यांना सांधणारा पूल म्हणजे वारुळ फुटलेल्या, सैरभैर झालेल्या मुंग्या कुणीकडून कुणीकडे जातील सांगता येणार नाही. हा पूल सतत वाहत असतो. एकाच प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूला जाणाऱ्या गाडया एकाच वेळी आल्यानंतर होणारा हलकल्लोळ विचारायलाच नको. परळला उतरुनही लोक पश्चिम रेल्वेच्या लोकल गाडया पकडू शकतात, पण या पुलावर फारशी गर्दी नसते. लोकांना दादरची सवय इतकी झालीय की, तर कुठल्या स्टेशनवर उतरायला नको म्हणतात.

मी सुध्दा असाच दादरला उतरलो. सध्या दादरला उतरायला घाबरतो. कारण बाहेर जे काही फ्लाय ओव्हर का उड्डाणपुलांच काम चालू आहे ते पाहवत नाही. दुसऱ्या महायुध्दात लंडन शहराचीसुध्दा अशी दशा झाली नसेल. उड्डाणपुलाऐवजी त्याला उडीपूल म्हणायला काही हरकत नाही. शाळेतला मुलगासुध्दा  त्याच्यावरुन खाली उडी मारु शकेल.

लोकलमधून प्लॅटफॉर्म नंबर तीनवर केव्हा उतरलो समजलंही नाही. नेमक कुठे उतरलोय, पूल कुठल्या बाजूला आहे, हे पाहण्यासाठी जरासा रेंगाळलो, पण मागून गर्दीचा रेटा इतका होता की, शांतपणे उभ राहून आपल्याला आता कुठल्या दिशेला जायच आहे, हे ठरवणं सुध्दा जवळ जवळ मुश्कील होत. गर्दीचा रेटाही अर्थातच पुलाच्या बाजूलाच असणार असा विचार करत पुढे पुढे, ढकलत ढकलत चालत राहिलो. इतकी चेंगराचेंगरी की बाजूबाजूला मागे- पुढे कोण चाललय हे बघायलासुध्दा फुरसत राहिली नाही.

गोठयातली जनावरं तरी परवडली. तीसुध्दा शेजारच जनावर फार जवळ आल तर लाथा झाडतात. प्रत्येकाला अगदी जनावरालासुध्दा स्वत:ची जागा, स्वत:चे शरीर यावर स्वत:चे अधिकार असावेत, अशी भावना असते. दुसरं जनावर तर सोडच. म्हणजे कुत्रा-मांजरीला, मांजर-उंदराला पण स्वत:च्या भाऊबंदांनाही जनावर एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे येऊ देत नाहीत. फार जवळून सलगी करु देत नाहीत.

पण मुंबईत राहणाऱ्या बिचाऱ्या माणसांच काय? वाहतूक व्यवस्थाच अशी आहे की, जरी तुम्हाला हाणामारी करुन खिडकीची जागा मिळालीच तरी हवा मिळेल याची खात्री नसते. दोन बाकाच्या मधल्या अरुंद जागेत चार-पाच लोक दाटीवाटीने उभे असतात. त्यातला एखाददुसरा तर जवळ जवळ मांडीवरच बसलेला असतो, तर बाकीच्यांचे हात, पाय, पोट, खांदे आपल्याला चारी बाजूने चेपत असतात. गर्दीत सगळ सहन कराव लागतं. इतर शहरातही गर्दी असतेच, पण इतका वेळ असे सक्तीने दहा लोकांत जखडून राहावं लागत नसेल.

असल्या जीवघेण्या गर्दीतून बाहे पडल्यावर थोडे हातपाय मोकळे करावेसे वाटले तर त्यात वावगं काय? पण तीच जीवघेणी गर्दी सतत रेटत असते.

एका पायावर उभा राहून मी अक्षरश: वैतागलो होतो. त्यामुळे एखाद्या कसबी जलतरणपटुसारखा गर्दी कापत एका बाजूला झालो. तोपर्यंत लोकलन प्लॅटफॉर्म सोडलेला होता. लोकलमधून बाहेर पडलेली गर्दीही रस्त्यावर ओसंडलेली असावी.

दुसरी लोकल येईपर्यंत काही क्षणच स्तब्धता. नव्याने आत शिरणारे लोक नवीन लाटा तयार करीतच होते.

पुलाच्या पायथ्याशी थोडासा घोळका जमा झालेला दिसला. तसं मुंबईत गर्दी जमायला वेळ लागत नाही. पण एक नजर टाकून लोक पुढे निघून जातात. कारण कशातच कुणाला गुंतून जायचं नसत. त्यात पाकीट मारण्याची भिती असतेच. मीही तसाच सवयीप्रमाणे गर्दी का जमली आहे इकडे एक कटाक्ष टाकून पुढे गेलो असतो.

पण पावलं थबकली. एक जख्ख म्हातारी एक गाठोड घेऊन बसली होती. आजूबाजूला दोन-तीन पोरं उभी होती आणि बरेच बघे जमले होते. केस सोनेरी आणि तोंडत दातांचा पत्ता नव्हता. पण आवाज खणखणीत होता. ती हातात एक दुमडलेलें, खूप वेळा वापरलेले एक पत्र घेऊन लोकाना विचारत होती, भाईसाब, ये कहाँ जाना हेै, जरा बताओ. पण कुणीही पुढे होऊन तो कागद तिच्याकडून घेऊन वाचण्याची तसदी घेत नव्हता. कुणीतरी विचारल, कहां जाना हेै? वाचता येत असत तर तुला कशाला विचारल असतं, असा म्हातारीचा रोखठोक प्रश्न ऐकून प्रश्नकर्ता मागच्या मागे सटकलेला होता आणि अशा तिखट म्हातारीच्या नादी कोण लागणार, असा विचार करुन लोक आपली वाट धरत होते, तर काही नुसतंच तिच्याकडे टक लावून बघत होते.

मीसुध्दा एक पाऊल मागे राखूनच बघत होतो. उत्तर प्रदेशातून ती आजीबाई सकाळच्या गाडीन आली होती.  तिचा नातू-रामप्रांत का कायस नाव होत. तो वर्षापूर्वी  वडिलांवर रागावून मुंबईला निघून आलेला. वर्षात एकच पत्र पाठवलं, त्यात पत्ता कळवला होता. त्या पत्त्यावर म्हातारीनं अनेक पत्र पाठवली. एकाचंही उत्तर आल नाही. शेवटी मी अमक्या अमक्या गाडीनं येत आहे तेव्हा गाडीवर घ्यायला ये, असे पत्र टाकून आजीबाई नातवाच्या शोधात दादर स्टेशनवर उतरुन पाच-सहा तास झाले होते. नातू आलेला नव्हता. मुंबईची माहिती नव्हती. फक्त हातात नातवानं पाठवलेले एकमेव पत्र होत. त्यावर पत्ता होता.

एकजण पुढे झाला. त्यान ते पत्र हातातून घेतल. पत्ता वाचला. चिता कँम्प मधील काहीसा पत्ता होता. चिता कँम्प चेंबूर. पत्र लिहून बराच कालावधी लोटलेला होता. मधल्या काळात त्या भागातील सगळी वस्तीच जमीनदोस्त करण्यात आली होती. वस्ती हलली होती. तिचा नातू कुठे काम करतो तिला माहिती नव्हत. कुणाकडे राहत होता हेही माहीत नव्हतं. हा पत्ता सापडणार नाही अस तिला सांगितल. पण क्यू नही मिलेगा? या प्रश्नाचं तिच समाधान करता येण शक्य नव्हतं.

त्या आजीबाई येणाऱ्या जाणाऱ्याला विचारत गेल्या. पत्ताच नाहीसा झालेला, तो सापडणार कसा?

पोटात गलबलून गेलं. पाय निघत नव्हता. तसाच गर्दीत मिसळून गेलो. गर्दीच्या रेटयात आजीबाई, त्यांचा नातू, तो पत्ता विसरुन  गेलो. पण त्या बिचाऱ्या सोनेरी केसवाल्या आजीबाईंचा चेहरा मात्र डोळयांसमोरुन हलत नाही. कुठे गेल्या असतील त्या?

— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक 9 डिसेंबर 1993

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..