बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म ४ मे १६४९ रोजी झांशीजवळ ककर-कचनय गावामध्ये झाला.
छत्रसाल राजाने बुंदेलखंडला शक्तिशाली राज्य बनवले होते. छतरपूर नगर छत्रसालनेच वसवले होते. त्यांची राजधानी महोबा होती. ते धार्मिक स्वभावाचे होते. छत्रसाल यांना बुंदेलखंडचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसाल यांच्या वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी १७ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा प्रदेशाला मुघल साम्राज्यातून स्वतंत्र करण्याचा प्रण केला होता. यासाठी त्यांनी विद्रोचा झेंडा हाती घेतला होता. परंतु चंपतराय यांना स्वकीयांविरुद्धच अनेकदा युद्ध करावे लागले. कारण स्वकीयांपैकी काही जण हे मुघलांची हुजरेगिरी करून त्यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न करत होते. ३० वर्षे संघर्षानंतर स्वकीयांपैकीच काहींनी कट करून १६६१ मध्ये चंपतराय यांचा वध केला आणि मुंडके कापून औरंगजेबाकडे पाठवले. या संघर्षाच्या काळात बालक छत्रसालही आपल्या वडिलांसोबत जागोजागी भटकत राहिले. आणि त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेत राहिले.
आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना छत्रसाल यांच्यात वाढीस लागली होती. यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसल्याने ते सुसंधीची प्रतीक्षा करत होते. दरम्यानच्या काळात छत्रसाल मुघल सैन्यात भरती झाले. आणि सैन्यासह दख्खनच्या मोहिमेवर आले. तेथे मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह सैन्यासह पुरंदरच्या वेढ्यात, आपला भाऊ अंगद तथा काका जामशहा यांच्या सोबत होते. त्या वेढ्याच्या वेळी शौर्य गाजवल्याने त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. परंतु, छत्रसालच्या हृदयात आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची जिद्द पेटलेली होती. शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या संघर्षामुळे ते प्रभावित झाले. मुघल सल्तनतीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागी झाली.
एका दिवशी शिकारीच्या बहाण्याने छत्रसाल मुघलांच्या कंपूतून बाहेर पळून गेले. त्यांनी भीमा नदी पार करून आपल्या पत्नीसह शिवाजी महाराजंची पुण्यात भेट घेतली. इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी व छत्रसाल भेट, शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेनंतर 1667 मध्ये झाली. छत्रसाल काही काळ शिवाजी महाराजांकडे पुण्यात राहिले. तेथे त्यांनी महाराजांकडून युद्धनीती, कूटनीती आणि शासननीतीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी या शिक्षणाचा आपल्या मुलखात बुंदेलखंडात मोठ्या खुबीने उपयोग केला.
महाराजा छत्रसालची इच्छा होती की, दक्षिणेत राहून मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या कामी यावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नाला फक्त दक्षिणेपर्यंत सीमित ठेवायचे नव्हते. म्हणून त्यांनी छत्रसालला सल्ला दिला की, तुम्ही बुंदेलखंडात परता आणि मुघलांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद करा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्ला प्राणपणाने मानून छत्रसाल बुंदेलखंडात परतले. तेथे त्यांनी फक्त ५ घोडदळातील सैनिक आणि २५ तलवारबाज यांच्यासह संघर्षाला सुरुवात केली. जवळ होती फक्त छत्रपतींनी चेतवलेले स्वराज्याचे स्फुलिंग. लवकरच ती संधी आली जेव्हा औरंगजेबाने आपल्या सैन्याला ओरछातील मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या वेळी रयतेच्या दृष्टीने छत्रसालच एकमेव आशेची किरण होते. म्हणून सर्व जण छत्रसाल यांच्या नेतृत्वा संघटित झाले. यानंतर एकेक जहागीरदार अन् सरदार छत्रसाल यांना जोडत गेले अन् सर्वांनी मुघलांचा सशस्त्र प्रतिकार केला.
छत्रसाल बुंदेला यांचे निधन २० डिसेंबर १७३१ रोजी झाले.
Leave a Reply