इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते. चिंतामणी गंगाधर गोगटे यांनी किल्याच्या माहितीवरील पुस्तक लिहिण्याचे ठरविले. गोगटेंनी गड किल्ल्यांची माहिती संकलित करून व काही किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन ‘महाराष्ट्र देशातील किल्ले भाग – १’ हे पुस्तक इ.स. १८९६ साली प्रकाशित केले. पुढे इ.स. १९०५ साली ‘महाराष्ट्र देशातील किल्ले भाग – २’ हे पुस्तक देखील प्रकाशित केले.
हे दोनही ग्रंथ पुणे शहरातील शुक्रवार पेठेत इंदिरा / इंद्रायणी छापखान्यात प्रकाशित झाले. आज तो छापखाना बंद होऊन ५० पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली. पुणे येथे शुक्रवार पेठेत हा छापखाना कुठे होता हे देखील आज सांगता येणार नाही.
आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता. इ.स. १८९६ मध्ये ‘महाराष्ट्र देशांतील किल्ले भाग -१’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला.
या ग्रंथाला डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटीतर्फे २०० रुपयांचा पुरस्कार मिळाला. पुढे नऊ वर्षांनी पुन्हा गोगटेंनी ‘महाराष्ट्र देशांतील किल्ले भाग – २’ हा ग्रंथ प्रकाशित केला. १९०५ साली झालेल्या या ग्रंथामध्ये रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील किल्ल्यांचा समावेश होता. या ग्रंथाला देखील पुन्हा एकदा डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटी ‘Deccan Vernacular Society’ तर्फे २०० रुपयांचा पुरस्कार मिळाला.
इ.स. १८९६ व १९०५ या दोन वर्षी त्यांना २०० रुपये पुरस्कार म्हणून मिळाले. या कालखंडात सोन्याचा भाव हा १५ ते १८ रुपये तोळा असा होता. अशावेळी २०० रुपयांचा पुरस्कार हा खूप मोठा होता.
आजपर्यंत भटक्यांना, गिर्यारोहकांना, आणि अभ्यासकांना दुर्मिळ असलेल्या या ‘चिं. गं. गोगटे’ लिखित ‘महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ आणि २’ या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ५ मे २०१९ रोजी पुणे येथे झाले.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply