“दंगल” चित्रपटानिमित्त हा खास लेख
आजच “दंगल” हा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती पै.कु. गीता फोगट च्या जीवनावर सत्यकथा असलेला दंगल चित्रपट रिलीज झाला. गीता चा सर्व जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.प्रत्येक पालकांनी पहावा असा हा चित्रपट आहे.
आजच्या घडीला महाराष्ट्रात पण अनेक गीता,बबिता संघर्षमय जीवन जगताना दिसून येतात.
बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातून आलेली पै.कु.सोनाली तोडकर हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले,कोल्हापूर च्या रेश्मा माने हीने सुवर्णपदक जिंकले.
मुरगुड कोल्हापूर च्या स्वाती व नंदिनी या एकदम गरीब घरच्या मुली जीची आई दुसऱ्याच्या घरी धुणे भांडी घासून मुलींना राष्ट्रीय पैलवान करून दाखवले.
पुण्याच्या वंदना खेनंत या महिलेने 15/15 तास ट्रेव्हेल कंपनीत ओव्हरकाम करून आपली एकुलती एक मुलगी निशा ला पैलवान बनवले.
या सर्वांच्या कथा ही दंगल पेक्षा कमी नाहीत. अनेक समस्यां घेऊन आज महिला कुस्ती कासवाच्या गतीने महाराष्ट्रात पुढे जात आहे.
एकीकडे मुलांसाठी तालमी सहज उपलब्ध होतात पण मुलींच्या तालमी शोधून पण सापडणे मुश्किल.
आळंदी देवाची येथील मा.दिनेशजी गुंड सरांची जोग महाराज कुस्ती केंद्र,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांची राष्ट्रकुल कुस्ती केंद्र कोल्हापूर, NIS कोच अश्विनी बोऱ्हाडे यांची राजगुरूनगर येथील केंद्र,NIS कोच संदीप पाटील सर यांचे साई कुस्ती केंद्र आमशी, मुरगुड चे दादा लवटे सर यांचे कुस्ती केंद्र असे काही बोटावर मोजण्या एवढ्या महिला कुस्ती केंद्रे शिल्लक आहेत
आज शासकीय दरबारी महिला कुस्ती वाढावी म्हणून एकही योजना नाही,पुरुषप्रधान संस्कृतीला चिटकून असणारे पालक मुलींना कुस्ती हा खेळ करियर साठी निवडू देत नाहीत तिथे गीता व बबिता यांच्या वडिलांनी म्हणजेच पै.महावीर फोगट यांनी आपल्या मुलींना पैलवान बनवले,नोकरी मिळवून देऊन तिचे आयुष्य सोन्याचे केले ही बाब नक्कीच महाराष्ट्रातील पालकांनी ध्यानात घ्यावी व आपल्या मुलींना आता तरी जुनाट रुढीप्रमाणे घरी न ठेवता कुस्ती कडे पाठवावे….अगदी त्या पदक जिंकत नाहीत तोवर जर पालकांचे लक्ष असेल तर मुली त्यांच्या घराचे,गावाचे,देशाचे नाव उज्वल करतील यात शंका नाही.
महिला कुस्तीसाठी पुर्वी लिहलेला लेख व महत्वाचे मुद्दे मांडत आहे..
कुस्ती सारख्या पुरुष प्रधान खेळात सुद्धा स्त्रियांनी इतिहास निर्माण केला आहे.
आज कित्येक महिला मल्ल आपल्या झुंझार खेळीने जन माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदीपयमान मल्लपरंपरा आहे.
मात्र महिला या खेळात येण्याचा ओढा तसा फारसा नाही.
पण ज्या ज्या मुली आज कुस्ती सारखा खेळ आपल्या करियर चा विषय म्हणून निवडत आहे त्यांना खरच आज सरकारी पाठबळाची गरज आहे.
महाराष्ट्रातील अनेक महिला खेळाडू आहेत ज्यांना जर शासकीय नोकरीत समावून घेतले तर त्या कुस्ती कडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यात यश मिळवतील.
कुस्तीमध्ये करियरसाठी महिलांना सुवर्णसंधी
कुस्ती मध्ये महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसतात.
साहजिकच महिला कुस्तीगीरांनी संख्या कमी आहे म्हणून आजच्या घडीला त्यांना कुस्ती मध्ये करियर ची संधी आहे.
जिथे मुलांना अनेक फेऱ्या अनेक दिगग्ज मल्लांच्यासोबत खेळाव्या लागतात तिथे केवळ काही फेऱ्या नंतर राज्य,राष्ट्रीय पातळीवर मुली जाऊ शकतात.
या गोष्टीची पालकांनी जरूर दखल घ्यावी असे वाटते.
महिला कुस्तीगीराना कुस्ती खेळातील प्रमुख समस्या
कुस्ती हा खेळ तसा मनगट मस्तीचा,नाजूक रुसव्या फुगव्याना इथे काही अर्थ नसतो.
त्यामुळे ज्या मुलींना कुस्ती हा करियर चा खेळ निवडावा असे वाटते त्यांनी आधी हे लक्षात ठेवावे की हा पुरुषांचा खेळ पुरुष बनूनच खेळावा लागेल.
झोकून देऊन व्यायाम करावा लागेल,सकस आहार घ्यावा लागेल,योग्य झोप घ्यावी लागेल व यासह वस्तादनाचा मार सुद्धा खावा लागेल.
या सर्व गोष्टींची तयारी करुन मगच हा खेळ निवडा कारण एकदा तुम्ही हा विषय निवडला आणि कालांतराने यातून निवृत्ती घेतली तर तुमचे पूर्वीचे आयुष्य जसेच्या तसे मिळेल याची खात्री नाही,कारण कुस्ती मध्ये जास्त ऊर्जेचा आहार,प्रामाणिक कष्ट यामुळे शरीर पुरुषाप्रमाणे टणक बनू लागते,सौन्दर्यावर परिणाम दिसतो.
त्यामुळे कुस्ती करत असताना योग्य गुरु,मार्गदर्शक ची निवड करणे हे सुद्धा महत्वाचे असते.
कारण कुस्ती निवृत्तीनंतर तुम्हाला लग्न करुन संसार सुद्धा करणे हा संस्कृतीचा भाग असतो.
तुमचे सौन्दर्य सुद्धा टिकणे हे तुम्ही खात असलेल्या खुराकावर अवलंबून असते.
कुस्ती नंतर वजन बेफाम वाढू शकते,यासाठी आहार,व्यायाम शास्त्र यांची माहिती असणारा गुरु जरूर असावा.
ही अट पुरुषांना लागू नाही कारण पुरुषांची कुस्ती कारकीर्द वयाच्या 11 वर्षांपासून ते 15 वर्ष असते,तिथून पुढे कितीही वर्ष तो त्याच्या कर्तृत्वावर आपला फॉर्म टिकवू शकतो,मात्र मुलींची कुस्ती कारकीर्द 5 ते 8 वर्ष इतकीच असते आणि यानंतर वैवाहिक जीवन.
त्यामुळे महिला मल्लानी या गोष्टीची जरूर काळजी घ्यावी.
पण एकदा तुम्ही या वर्तुळातून बाहेर आलात तर समाजातील अनेक मुलींना सुर्यासारखा तेजस्वी आदर्श नक्कीच निर्माण कराल.
आज गीता फोगट सारखी महिला पैलवान DYSP सारख्या क्लास वन पदावर केवळ कुस्तीमुळे पोहोचली आहे ,अनेक मुली पोलीस दलात आहेत.
त्यामुळे कुस्ती मध्ये महिलना नक्कीच सुवर्णसंधी आहे.
अभ्यासू महिला “कोच” ची आवश्यकता
महिला कुस्ती मध्ये कोच महिला असणे सर्व दृष्टीने आवश्यक आहे असे मला वाटते.
जिथे महिला कुस्ती सेंटर आहे तिथे केवळ महिलाच कोच असणे हि गरजेची बाब आहे.
पण,अनेक ठिकाणी सराव करताना महिला मल्लच नसल्याने नाईलाजाने मुलांच्या सोबत सराव करणे मुलींना भाग पडत आहे.
ही जशी फायद्याची बाब आहे तशीच तोट्याची सुद्धा आहे.
तोटा एवढ्या साठी की ज्या वयात मुली कुस्ती कडे येतात ते वय म्हणजे त्यांच्या मनात अनेक भावभावनांचा गुंता सुरु होण्याचे वय असते त्यामुळे सहाजिकच नकळत त्यांच्या हातून चुका घडण्याची शक्यता असते व त्या चुका पुढे जाऊन जटील समस्यां बनतात.
पालकांनी जो दृष्टिकोन ठेवून त्यांना कुस्ती मध्ये घातले असते ते ध्येय दूरच राहते व इतर समस्यां सोडवता सोडवता नाके नऊ येते आणि का हि चूक केली असे वाटू लागते.
अश्या अनेक महिला पालकांच्या तक्रारी मला येतात पण त्यावर उघडपणे भाष्य करणे ना पालकांना शक्य आहे ना मला.
यावर केवळ एकच उपाय कि मुलींना याची जाणीव अगोदर करून द्यावी असे मला वाटते.
त्यासाठी त्यांची मने समजून घेणारी महिला कोच त्या त्या सेंटर वर उपलब्ध करून देणे हि काळाची गरज बनली आहे.
आज अनेक सेंटर अशी आहेत जिथे पुरुष कोच नी अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान घडवल्या,मात्र प्रत्येक ठिकाणी असे होईलच असे नाही.
या सर्वांचा अभ्यास करून महिला कुस्तीगीरांनी कुस्ती निवृत्तीनंतर कुस्तीच्या दीर्घ आभ्यासाकडे जरूर लक्ष द्यावे.
NIS सारख्या शासकीय कोर्स मध्ये करियर ची सुवर्णसंधी आहे.
पुण्याची पै.कु. अश्विनी बोऱ्हाडे ही NIS पतियाळा पंजाब येथे कुस्तीचा दीर्घ अभ्यास करुन महाराष्ट्राच्या महिला कुस्तीसाठी भव्य कामगिरी करण्याची स्वप्ने पाहू शकते तशी प्रत्येक महिला कुस्तीगीरांनी आपआपल्या परीने यासाठी योगदान देणे गरजेचे आहे तर भविष्यात महाराष्ट्रातून अनेक महिला कुस्तीगीर घडतील अशी खात्री वाटते..!
अश्विनी बरोबर मुंबई ची कौशल्या वाघ देखील पंजाब मध्ये NIS डिप्लोमा पूर्ण करत आहे.
महाराष्ट्राच्या सर्व महिला मल्लाना कुस्ती-मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा..!
तुमच्या सारख्या महिला हे महाराष्ट्राचे खरे भूषण आहे.
— पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
Www.facebook.com/
Leave a Reply