नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ४ – डाळिंब

डाळिंबाला आयुर्वेदात खूप महत्वाचे स्थान आहे. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाची ओळख आहे. डाळिंब हे असे फळ आहे जे केवळ चवच नाही तर आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरत असते. तर अशा ह्या डाळिंब फळाची ओळख करून घेऊ.

याचे शास्त्रीय नाव Punica granatum आहे.

डाळिंबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्‍हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्‍याचा उल्‍लेख आढळून येतो; डाळिंबाचे उगमस्‍थान इराण असून इ.स. 2000 वर्षापासून डाळिंबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्‍पेन, इजिप्‍त, अफगाणिस्‍थान, मोराक्‍को, बलूचीस्‍थान, पाकीस्‍तान, इराक, ब्रम्‍हदेश चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्‍ये लागवड केली जाते. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राचा देशाच्या उत्पादनामध्ये ६६.९० टक्के वाटा आहे.

डाळिंब हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात साधारणतः ९०००० हेक्टरहून अधिक क्षेत्र या फळपिकाखाली लागवडीत आहे. वर्षातून कोणताही – मृग, हस्त आणि आंबे – बहार घेता येतो व संपूर्ण वर्षभर बाजार पेठेत फळे पाठविणे सहज शक्य होते. त्यामुळे राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंब पिकाची लागवड केली जाते.

हवामान : उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा या पिकास चांगला मानवतो. फळधारणेपासून फळे तयार होईपर्यंत कडक ऊन व कोरडी हवा आणि पक्वतेच्या काळात साधारणपणे उष्ण व दमट हवा असल्यास चांगल्या दर्जाची फळे मिळतात.फळांच्या पूर्ण वाढीनंतर आर्द्रता वाढल्यास फळास वरून व आतून चांगला रंग येतो. परंतु फळांची वाढ होताना आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास रोग व किडीचे प्रमाण वाढते व फळांचा दर्जा खालावतो.

जमीन : उत्तम निचऱ्याची हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन डाळिंब पिकास योग्य आहे. जमिनीचा सामू ६.५० ते ७.५० इतका असावा. जमिनीत चुनखडीचे प्रमाण अत्यल्प असल्यास झाडांची वाढ चांगली होते. परंतु चुनखडीचे प्रमाण ५ ते ६ टक्क्यांवर गेल्यास झाडाची वाढ खुंटते. फार भारी जमिनीत वाढ जोमाने होते, परंतु पुढे झाडाला विश्रांती देणे कठीण होते आणि बहाराची अनिश्चितता वाढते.

लागवड : डाळिंबाची लागवड बियांपासून केल्यास झाडे एकसारख्या गुणधर्माची व चांगल्या प्रतीची फळे देत नाहीत, त्याचप्रमाणे फलधारणेसही उशीर लागतो. त्यामुळे डाळिंबाची लागवड कलमांपासूनच करतात. तांबड्या रंगाची मुळे असलेल्या गुटी कलमांमध्ये यशाचे प्रमाण जास्त असते आणि हे कलम कडक उन्हाळा सोडता इतर कोणत्याही हंगामात करता येते.

जाती : गणेश, जी १३७, मृदला, फुले आरक्ता, भगवा,फुले भगवा सुपर या डाळिंबाच्या वाणाच्या प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्रात सध्या फुले भगवा सुपर ही जाती लागवडीत आहे. सदर वाण गर्द केशरी रंगाचे आहे. फळांची साल जाड व चकचकीत असून दाणे मऊ आहेत. फळांमध्ये रसाचे प्रमाण भरपूर आहे. फळांचे सरासरी उत्पादन २४ किग्रॅ.प्रति झाड आहे. देशांतर्गत तसेच निर्यातीसाठी ही जात उत्तम आहे.

प्रमुख किडी व रोग : डाळिंब फळ पिकाला निरनिराळे रोग होण्याची हवामानाच्या चढउतारामुळे जास्त शक्यता असते. पिकाच्या सर्वच भागांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रामुख्याने मावा, पांढरी माशी, बुरशीजन्य,जीवाणूजन्य (बॅक्टेरिया) रोग आणि तेलकट डाग किंवा तेल्या रोग, मर रोग यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगांमुळे फळांचा तजेला व रंग बिघडतो. अशा फळांना बाजारभाव मिळत नाही. हे रोग जर नियंत्रित केले नाहीत तर संपूर्ण पीक हातातून जाते. त्यामुळे या पिकाची फार काळजी घ्यावी लागते.

डाळिंबाचे औषधी उपयोग:

१. रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते : डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने रक्त प्रवाह सुरळीत चालतो व रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
२. तापापासून मुक्ती : वारंवार ताप येत असेल तर किंवा उष्णतेचा त्रास होत असेल तर डाळिंब खावे. डाळिंब खाल्ल्याने शरीरात वाढलेली उष्णता झपाट्याने कमी होते.
३. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी उपायोगी : डाळींब हे शक्तिवर्धक आणि रक्तवर्धक आहे. ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे ऍनिमिया आहे, त्यांनी दररोज डाळिंब खावे. डाळिंबात लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्त वाढीसाठी डाळिंब डाळिंब खाणे फायदेशीर आहे.
४. खोकला व घसा खवखवीवर गुणकारी : घशात खवखव होत असेल तर, डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घ्यावी. असे केल्याने घशाची खवखव व खोकला बंद होतो.
५. जुलाब, अल्सरवर गुणकारी : डाळिंबाच्या आतल्या सफेद रंगाच्या बिया जुलाब, हगवण, तोंडाच्या आणि घशाच्या अल्सर वर खूप चांगला आयुर्वेदिक उपाय आहे.
६. पचनव्यवस्था सुधारण्यास मदत करते : पचन व्यवस्थित होत नसेल, पोटात गॅस होणे, शौच साफ न होणे यांवर डाळिंब गुणकारी ठरते. अन्नपचन क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी डाळिंब खाणे फायदेशीर ठरते.
७. पित्तावर गुणकारी: डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने पित्त होत नाही तसेच अन्नप्रक्रिया सुरळीत चालते.
८. तोंडाची दुर्गंधी घालवते : अपचन, ताप, आम्लपित्त या कारणांमुळे तोंडाचा दुर्गंध येत असेल तर डाळींबाचे दाणे चावून खाल्ल्याने किंवा डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळना केला. तर, तोंडाचा दुर्गंध येत नाही.
९. चेहऱ्याला उजळपणा देते : चेहऱ्याच्या उजळपणासाठी व सौंदर्यासाठी डाळींबाचा रस गुणकारी आहेत. डाळिंब नियमित खाल्ल्याने त्वचा उजळदार आणि तजेलदार राहण्यास मदत होते.
१०. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर : डाळिंब वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते, खास करून महिलांसाठी डाळिंब खूपच गुणकारी ठरते.
११. सांधेदुखीवर गुणकारी : डाळींबाचे सेवन सांधेदुखी आणि हाडांच्या आजारासाठी उपयोगी ठरते. .
१२. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयोगी
१३ मुळव्याधीवर गुणकारी : मूळव्याध या आजारामध्ये रक्त पडत असेल तर, डाळिंबाच्या सालीचे बारीक चूर्ण नागकेशर मध्ये घालून प्यावे.
१४. हृदय रोगांवर फायदेशीर : हृदय मजबूत करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर व गूळ, वेलची घालून त्याचे ज्यूस करावे. व दररोज थोडे प्यावे.
१५. डाळिंबाचे दाण्यात चोथा, व्हिटॅमिन्स, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. डाळिंबाच्या सालीत प्युनिगालीन नावाचे अँटी अँटीओकसिडेंट्स असतात. ते रेडवाईन व ग्रीन टी पेक्षा तीन पट अधिक असतात. डाळिंबाच्या दाण्याच्या बियांत प्युनिसिक ऍसिड हे महत्वाचे फॅटी ऍसिड असते.यामुळे याचा उपयोग प्रोस्टेट, स्तनाचा कॅन्सर व संधिवातात होतो. यामध्ये अजून संशोधनास वाव आहे.
१६. डाळिंबापासून रस, कार्बोनेटेड शितपेये, अनारदाणा, जेली, सिरप, वाईन, दंतमंजन, अनारगोळी, जेली, स्क्वॅश, जॅम असे अनेक पदार्थ तयार करता येतात. त्याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 81 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ४ – डाळिंब

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..