आपण शाही पुलावावर पेरलेला सुका मेवा बघितला असेल, त्यावर भरपूर काजू पेरलेला पुलाव फार आकर्षक दिसतो. आज आपण या काजूचा विचार करणार आहोत.
काजू हा सदाहरित वृक्ष अॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात दक्षिण अमेरिकेतून आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू म्हणतात. मराठीतही तेच नाव रूढ झाले आहे.
काजूचे झाड फार काटक असते. त्याची उंची सु. १२ मी. असते. कधीकधी तो विस्तारलेला असतो. बुंधा आखूड, जाड व वाकडातिकडा असतो. पाने मोठी व अंडाकृती, टोकाला गोल व चिवट असून त्यांची वरची बाजू चकचकीत असते. फुले लहान व पिवळी असून त्यांवर गुलाबी छटा असतात. वृक्षाला बहर नोव्हेंबर-फेब्रुवारी येतो. काजूच्या फळाचे आभासी फळ आणि खरे फळ असे दोन भाग असतात. आभासी फळ लहान सफरचंदाच्या आकाराचे, पिवळ्या रंगाचे, फुगीर व रसाळ असते. यालाच बोंडू म्हणतात. बोंडू खाल्ले जाते. काजूचे खरे फळ (काजूगर) मूत्रपिंडाकृती हिरवट व पिवळ्या नारिंगी रंगाचे असून त्यावर कठिण कवच असते. कवच वेगळे केले की काजूचे बी मिळते. काजूचे बी भाजून सालपट वेगळे केले की काजू मिळतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी ६८ किग्रॅ. फळे व ९ किग्रॅ बिया मिळतात. काजूबियांचे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन सुमारे ८४० किलोग्रॅम आहे.
हवामान, लागवड व जमीन : काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियांपासून रोपे तयार करून केली जाते. भारतात विशेषत: केरळ राज्यातील महाराष्ट्र; कोकण व कोल्हापूर जिल्ह्याचा भाग, गोवा, तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली, तंजावर व दक्षिण अर्काट हे जिल्हे, आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा, नेल्लोर, गोदावरी व विशाखापटनम हे जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील दक्षिण व उत्तर कानडा जिल्हे या प्रदेशांत काजूची प्रामुख्याने लागवड केली जाते. महाराष्ट्रातील कोकण व त्यालगतच्या समुद्रकिनारी वेंगुर्ला, सिंधदुर्ग, रत्नागिरी व शेजारच्या गोवा राज्यात काजूची लागवड खूप प्रमाणात होते.
काजूची लागवड सामान्यत: ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावर करतात. याप्रमाणे प्रति हेक्टरी २०० ते १५५ अनुक्रमे झाडे बसतात. काजू झाडाची पूर्णवाढ होऊन वरीलप्रमाणे असलेले लागवडीचे अंतर व्यापण्याकरिता १० वर्षाचा कालावधी लागतो. जर काजूची घन लागवड ४ बाय ४ किंवा ५ बाय ५ मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी प्रचलित ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावरील लागवडीपेक्षा सुमारे दुप्पट झाडे बसतात. शिवाय सदर घन लागवडीपासून दुप्पट उत्पन्नसुद्धा मिळते.
काजूचे झाड उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत वाढू शकते, परंतु त्याला थोडीशीही थंडी सहन होत नाही. यामुळे ते उत्तरेकडील प्रदेशात वाढत नाही. काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून ७०० मी. उंचीच्या प्रदेशात आणि कमीतकमी ४०० मिमी व जास्तीत जास्त ४००० मिमी पाऊस पडणा-या भागात हे पीक चांगले येते. काजूची लागवड समुद्रकिनाऱ्यानजीकच्या प्रदेशात केली जाते. मात्र क्षार जमीन त्यास मानवत नाही.
झाडाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी फुले, फळे यावयास सुरुवात होते. झाडे ७-८ वर्षांची झाल्यावर भरपूर फळे येतात. योग्य काळजी घेतल्यास ती ३०-३७ वर्षापर्यत भरपूर फळे देतात. खोल व चांगला निचरा असलेल्या समुद्रकाठची जांभ्या दगडापासून तयार झालेली उत्तम निच-याच्या आम्लधर्मीय जमिनीत ही झाडे 70 वर्षापर्यंत उत्पन्न देतात. नोव्हेंबर-फेब्रुवारी या दरम्यान त्यांना फुले येतात. परागण (परागसिंचन) झाल्यापासून दोन महिन्यांत फळे पिकतात. फुले येण्याच्या काळात ढगाळ हवा किंवा पाऊस पडल्यास फळ चांगले लागत नाही. मात्र फळ लागल्यानंतर पाऊस पडल्यास चांगले असते. सामान्यतः वर्षातून एकदा बहार येतो.
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
काजूत पुढीलप्रमाणे घटक असतात. पाणी (५.९ %), प्रथिने (२१.२ %), स्निग्ध पदार्थ (४६.९ %), कर्बोदके (२२.३ %), खनिजे (२.४ %), कॅल्शियम (०.०५ %) आणि फॉस्फरस (०.४५ %), काजूचे पोषणमूल्य प्रति १०० ग्रॅमला ५९० कॅलरी आहे.
हवामान
यास स्वच्छ व भरपूर सुर्यप्रकाश आवश्यक असतो. कोकणात या पिकाची लागवड डोंगर उतारावर किफायतशीर ठरत आहे. खेळती हवा व भरपूर सुर्यप्रकाशामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात अधिक भर पडते. काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या ७-८ वर्षात आंतरपिके घेतल्यास आर्थिक फायदा होतो, तसेच लागवडीवरील खर्च कमी होण्यास मदत होते. भोपळा या आंतरपिकांची लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आढळून आली आहे. त्याचप्रमाणे अननसाची लागवड देखील सुरुवातीच्या कालावधीत फायदेशीर आहे. नंतरच्या कालावधीत अननस लागवडीमुळे काजू बी गोळा करण्यास आंतरपीक म्हणून लागवड करण्याबाबत संशोधन सुरू आहे.
या पिवळ्या लाल, गोड, लोभस, व देखण्या फळाच्या पोटाशी त्याची बी चिकटलेली असते.
काजू संबंधात संशोधनाची माहिती:
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथून विकसित झालेल्या भरघोस उत्पादन व निर्यातक्षम गुणधर्म असलेल्या वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ६, वेंगुर्ला ७, वेंगुर्ला ८ आणि वेंगुर्ला ९ या जातीची कलमे लावून लागवड करावी.
कोकणात काजू लागवडीस भविष्यात भरपूर वाव असून आजमितीस या पिकाखाली २.८४ लाख हेक्टर क्षेत्र असून अजुनही ३ लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीस उपयुक्त आहे. कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, केळी, मसाला पिके इत्यादी महत्त्वाच्या पिकासाठी भविष्यात लागवडीयोग्य सदरचे ३ लाख हेक्टर क्षेत्र लागणार असल्याने यापैकी ५० टक्के म्हणजेच १.५० लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली आल्यास वर्षभर लागणारी काजू कारखान्याला लागणारी मागणी पूर्ण करता येईल तसेच परदेशातून होणारी काजू बीची आयात थांबवून काजू उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होईल.
त्याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेले नवीन काजू लागवड तंत्रज्ञान काजू बागायतदारांनी आत्मसात केल्यास सध्या मिळणा-या सरासरी १३०० किलो ग्रॅम प्रति हेक्टर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊन काजूचे सरासरी उत्पादन २ टन प्रति हेक्टर यापेक्षा जास्त मिळू शकेल. काजू पिकावरील शेतक-यांना विविध शिफारशी देण्यात आल्या. त्यामुळे एकत्रितरित्या काजू लागवडीखाली क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पादकता वाढून रोजगार निर्मिती होऊन शहराकडे जाणारा तरूण वर्ग ग्रामीण भागात स्थिरावेल.
काजू वरील औद्योगिक प्रक्रिया :
काजूच्या फळावर होणाऱ्या औद्योगिक प्रक्रिये च्या माहिती शिवाय हा लेख अपूर्णच राहील.
भारतात काजूगर व टरफल तेल काढणे हा धंदा मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर चालतो. काजूगर फोडण्याचे व टरफल तेल काढण्याचे १५० कारखाने देशात आहेत. त्यापैकी १०० कारखाने क्किलॉन (केरळ) शहराच्या आजूबाजूस आहेत.
काजूचे फळ व बिया दोन्ही महत्वाची आहेत. फळापासून सरबत, सायरप व मद्य तयार करतात तर बियांपासून काजूगर, गरतेल व टरफल तेल मिळते. काजूबिया भाजून त्यातील गर वेगळा करणे हे काम कौशल्याचे आहे. काजूबिया भाजल्याने आतील गराच्या गंधात व चवीत वाढ होते. काजूबिया जरुरीपेक्षा कमी किंवा जास्त भाजल्या गेल्यास त्याचा काजूगराच्या प्रतीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काजूबिया भाजत असताना निर्माण होणारा धूर आणि बाहेर फेकल्या जाणाऱ्या तेलाच्या थेंबापासून अपाय होत असल्याने या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते.
टरफलतेल : टरफलांत २५ ते ३०% तेल असते. यातील मुख्य रासायनिक घटक म्हणजे कार्डोन व ॲनाकार्डिक आम्ल होय. हयामुळे हया तेलाचा शरीरास स्पर्श झाल्यास कातडीवर फोड येतात.
काजू प्रक्रिया उद्योगाची थोडक्यात पद्धती अशी : झाडावरून पडलेले काजू गोळा करतात, किंवा काजू बिया विकत आणतात. त्या स्वच्छ पाण्यात धुऊन चार दिवस उन्हात सुकवतात. नंतर बिया ९० ते १०० अंश सें., तापमानात ४५ मिनिटे उकळून घेतात. (बॉयलर वापरून हे करता येते.). बिया तशाच १२ तास सावलीत वाळवतात (यासाठी ड्रायर वापरता येतो.). दुसर्या दिवशी बिया (काजू बी कटर) मशीनद्वारे फोडतात. बियांची टरफले काढून, त्या सुमारे आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर, काजूगरांच्या आकारमानानुसार वर्गीकरण करून हाताने पॉलिश केल्यानंतर त्यांचे पॅकिंग करतात.
काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तर्हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी प्रसिद्ध आहे.
बोंडूचा रस आंबटगोड व तुरट असतो. रस टिकविण्यासाठी तो तापवून त्यात संरक्षक पदाथ घालतात. या रसापासून जॅम, गोळया, सरबत, सायरप, मद्य व शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. रस आंबवून ऊर्ध्वपातन केल्यास (उकळून व वाफ थंड करुन) मद्य मिळते. प्रथम ऊर्ध्वपातित द्रवास `अरक’ म्हणतात व अरक पुन्हा ऊर्ध्वपातित करुन मिळणाऱ्या द्रवास `कजेल’ म्हणतात. गोव्यामध्ये हे मद्य `फेणी’ या नावाने प्रसिध्द आहे.
काजूचे उपयोग :
व्यावहारिक उपयोग:
१. सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो.
२. काजूगराचे तेल बदामाच्या तेलासारखे असून पेंडीचा उपयोग पौष्टिक खाद्य म्हणून होतो.
३. सालीपासून कपड्यावर खुणा करण्यासाठी न पुसली जाणारी शाई मिळवितात.
४. जलाभेद्य रंग, व्हार्निश, रंगद्रव्ये, मोटारींचे गतिरोधक अस्तर वगैरेंच्या निर्मितीमध्ये तेलाचा उपयोग होतो. या तेलाचे उपयोग व मागणी सतत वाढत आहे.
५. काजूचे लाकूड तांबूस वा तपकिरी रंगाचे व कठिण असते.त्याचा उपयोग होड्या, कोळसा तयार करण्यासाठी करतात.
६. काजू हे निर्यातक्षम फळ आहे. काजूच्या जागतिक व्यापारात भारताला अग्रस्थान आहे. भारताचा हिस्सा काजू निर्यातीत ६० टक्के आहे तर ब्राझीलचा हिस्सा ३० टक्के आहे. एकूण निर्यातमूल्याच्या १.५ टक्के परकीय चलन काजू निर्यातीपासून मिळते.
७. काजू टिन फिलिग मशीन, टिन पॅकिंग मशीन, कॅश्यू साइझिंग मशीन अशा प्रकारच्या मशिनरीसुद्धा पॅकिंगसाठी उपलब्ध असतात. शक्यतो पाव किलो, अर्धा किलो व एक किलोचे पॅकिंग ठेवणे किफायतशीर असते.
८. ओल्या काजूगरांची भाजी फार छान होते.
ब. औषधी गुणधर्म व उपयोग:
1. झाडाची साल स्तंभक (आकुंचन करणारी) आहे.
2. काजू सर्वांना सुपरिचित असा सुकामेवा आहे. चवीनं तुरट, गोड असलेला काजू गुणानं उष्ण, लघू आणि धातुवर्धक आहे. वात, कफ, पोटातला गोळा, ताप येणं, कृमी, व्रण या तक्रारीत उपयुक्त आहे. अग्निमांद्य, त्वचारोग, पांढरे कोड, पोटदुखी, मूळव्याध, पोटफुगी इत्यादि विकारांचा काजू नाश करतो. पायाला चिखल्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी काजूच्या बियांचा चिक लावावा म्हणजे चिखल्या बर्या होतात.
3. जनावरांच्या पायांना विशेषत गायी, म्हशींना एक प्रकारचा उपद्रव होतो. त्याला ‘लाळ्या’ म्हणतात. यामुळे पाय सुजून गुरांना चालता येत नाही. या तक्रारींवर काजूच्या बियांचा चिक लावला असता त्रास कमी होतो.
४ काजू किमतीनं महाग असल्यानं सर्वसामान्यांना परवडत नाही. तथापि कृश व्यक्तींना काजूमध्ये असणारे स्निग्ध घटक उपयुक्त ठरतात आणि त्याचे दौर्बल्य कमी करून शक्ती वाढवतात.
५. सुकलेले काजू चवीला अत्यंत गोड, किंचित कषाय, मधूर विपाकी, उष्ण वीर्यात्मक व पित्तकर आहेत. तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्व, तंतूमय, पिष्टमय पदार्थ , खनिजे, मेद अशी सर्व घटकद्रव्ये त्यात असतात.
६. भिजविलेल्या मनुक्यासह ४-५ काजू रोज सकाळी खाल्ल्यास मलावरोध दूर होतो.
७. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.
८. हृदयरोगाशी लढण्यास सक्षम आणी उच्च रक्तदाब कमी करण्यात व मज्जासंस्था बळकट करण्यास मदत होते.
९. वजन कमी करण्यात, हाडांसाठी फायदेशीर, कोलन, पुर:स्थ आणि यकृत कर्करोग रोखण्यास मदत करते
१०. काजूचे पिकलेले फळ, सुंठ, मिरे व संधव घालून खाल्ल्यास पोटदुखी कमी होते. तसेच पोटात गुब्बारा धरणे, शौचास साफ न होणे ही लक्षणे कमी होतात.
११. रक्ताची कमतरता झाली असेल तर रोज ४ ते ५ काजूचे सेवन करावे. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने रक्त वाढण्यास मदत होते. काजू रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
१२. चिरतारुण्य टिकविण्यासाठी व शरीर काटक व प्रमाणबद्ध करण्यासाठी काजूचे सेवन नियमितपणे करावे.
१३. काजूमद्धे फ्री रॅडिकल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते अँटी ऑक्सीडेन्ट प्रमाणे काम करतात व त्वचा, मेंदू व आतड्याच्या कॅन्सरला प्रतिबंधित करतात.
तर असा हा काजू बहुगुणी, औषधोपयोगी व भारताला परकीय चलन मिळवून देण्यात अग्रेसर असे फळ आहे.
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
The article is highly informative and useful for the common man who wants to start kaju agriculture and business.
Very informative and exhaustive
description of “काजू “.This article
by Dr.DK Kulkarni is useful for
Agricultural people, Botany study
as well as Medical students/doctors.
Many thanks to the Author for this
excellent post.
काजूवरील लेख खूप आवडला. अत्यंत माहिती पूर्ण आणि उद्बोधक वाटला . धन्यवाद !