नवीन लेखन...

महारथी तोरणे

१९४४ सालातील गोष्ट आहे. भालजी पेंढारकर ‘महारथी कर्ण’ चित्रपटाची निर्मिती करीत होते. त्यांना बालकर्णाच्या भूमिकेसाठी बारा वर्षांच्या मुलाची आवश्यकता होती. स्टुडिओत आलेल्या एका देखण्या मुलावर त्यांची नजर पडली.. त्याला त्यांनी विचारले, ‘चित्रपटात काम करशील का?’ त्याने त्वरीत होकार दिला, तोच बालकर्णाचे काम करणारा हुशार मुलगा, पुढे अनेक चित्रपटांसाठी भालजींचा सहायक दिग्दर्शक झाला.. त्याचं नाव, कमलाकर तोरणे!

बेळगांवमध्ये कमलाकरचा जन्म २५ मार्च १९३२ साली झाला. लहान वयातच त्याच्या वडिलांचे निधन झाले. आईने हाॅस्पिटलमध्ये नोकरी करुन कमलाकरला वाढवले. पुढील शिक्षण त्याने कोल्हापूर येथे केले. डाॅक्टर होण्यासाठी त्याने बी. एससी. चे शिक्षण घेतले, मात्र चित्रपटाच्या आकर्षणाने त्याला भालजींचे शिष्यत्व प्राप्त झाले..

गांधीवधानंतर भालजींचा स्टुडिओ, आगीत नष्ट झाला. ‘मीठ भाकर’ हा तयार झालेला चित्रपट जळून गेला होता. कमलाकरची स्मरणशक्ती दांडगी होती. त्याने त्या चित्रपटाचे पटकथा-संवाद पुन्हा लिहून काढले. भालजींनी पुन्हा नव्याने ‘मीठ भाकर’ची निर्मिती केली..

१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘गरीबाघरची लेक’ या चित्रपटापासून कमलाकर तोरणे यांची कारकिर्द सुरु झाली. त्यांचं वाचन दांडगं होतं. पन्नासच्या दशकातील ‘वुई आर नो एंजल्स’ या गाजलेल्या इंग्रजी चित्रपटावरुन मराठी चित्रपट करण्याचे त्यांनी ठरविले. १९६८ साली त्यांचं ते स्वप्नं ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ द्वारे प्रत्यक्षात उतरलं..

तीन चोरांची ती गोष्ट होती. प्रत्येकाने चोरी, खून, लबाडी करुन तुरुंगाची हवा खात असताना, ते तुरुंगातून पलायन करुन एका घरामध्ये आश्रय घेतात. तिथे चोरीच्या उद्देशाने आलेले असूनही, त्यांचं मतपरिवर्तन होऊन त्या कुटुंबाचे सदस्यच होतात. त्या घरातील मुलीला, आपली पुतणी मानून तिचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देतात. दरम्यान त्यांची खरी ओळख पटल्याने ते स्वतःहून पोलीसांच्या स्वाधीन होतात..

हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. यातील सर्व गाणी उत्तम होती. सर्व कलाकार हे नाटकांतून कामं केलेले, नामवंत होते. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा..’ हे गाणं त्याकाळी अतिशय गाजलं होतं.. चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल कमलाकर तोरणे यांनी सर्व कलाकारांना चांदीची ट्राॅफी व रोख दहा हजार रुपये दिले. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाचे, एकूण नऊ पुरस्कार मिळाले. याच कथेवरुन, ‘तीन चोर’ नावाच्या हिंदी चित्रपटाचीही निर्मिती झाली होती..

त्यानंतर तोरणेंचे अनेक कौटुंबिक चित्रपट प्रदर्शित झाले.. ‘लाखात अशी देखणी’, ‘अनोळखी’, ‘आराम हराम आहे’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘भैरु पैलवान की जय’, ‘जावयाची जात’, ‘थोरली जाऊ’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘देवता’, ‘माहेरची माणसं, ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘आई पाहिजे’ असे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.. त्यांपैकी ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा काश्मीरमध्ये चित्रीकरण केले.. १९७८ साली ‘नेताजी पालकर’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. ‘देवता’ चित्रपटातील ‘ढोलकीच्या तालावर..’ हे गाणं त्याकाळी खूप गाजलं. एकूण २७ वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी २८ चित्रपट केले…

१९६६ साली त्यांनी पद्मा चव्हाण या सिनेअभिनेत्रीशी लग्न केले. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या बाबा कदम यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘ज्योतिबाचा नवस’ या चित्रपटात पद्मा चव्हाण या नायिकेच्या भूमिकेत होत्या. ‘माहेरची माणसं’ या चित्रपटातील एका गाण्यातून त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडवलं होतं. ‘नणंद भावजय’ चित्रपटात रिमा लागू हिला नायिका होण्याची पहिली संधी, त्यांनीच दिली.

कमलाकर तोरणे यांनी दूरदर्शनसाठी तीन विनोदी मालिकाही केलेल्या. त्यातील ‘नस्ती आफत’ ही धमाल विनोदी होती. रामायण मालिकेतील अरूण गोविल याला घेऊन एका हिंदी चित्रपटाची तोरणे यांनी तयारी केली होती. स्क्रिप्टचं बाडही तयार होतं.. मात्र अचानक सकाळी उठल्यावर त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्यांना उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं.. उपचार चालू असतानाच त्यांचं निधन झालं..

कोल्हापूरमध्ये अनंत माने व मुंबईत कमलाकर तोरणे यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. वयाच्या पासष्ठाव्या वर्षीच, कमलाकर तोरणे ‘त्यांच्या गावा’ निघून गेले..

डाॅक्टर होण्याची स्वप्नं पाहिलेल्या कमलाकर यांनी, मराठी चित्रपटसृष्टीच्या मनोरंजन-रथाचं सारथ्य करुन, रसिकांच्या दोन पिढ्यांचं, कौटुंबिक मनोरंजन केलं… असे थोर निर्माते-दिग्दर्शक पुन्हा होणे नाही…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२६-४-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..