माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास. सूर्यास्तापासून प्रत्येक प्रहरात विशिष्ट उपचार अर्पण करुन पूजा केली जाते. (सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचे अंतर काढून त्याला ४ ने भागून येणारे उत्तर हे एक प्रहर व्याप्ती होय) ज्यांना चार याम पूजा शक्य नाहीत त्यांनी मध्यरात्री (निशिथकाळांत) पूजन, दर्शन घ्यावे. शिवरात्रि व्रतांत निशिथ काळाला प्राधान्य आहे. कारण ईशानसंहितेत ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव निशिथ काळात झाला आहे. या व्रताने मुक्ति मिळते असे सांगितले आहे.
या व्रताची कथा – व्रतराजात या विषयी दोन कथा सांगितल्या आहेत. दोन्ही कथांचा सारांश अजाणतेपणी उपवास घडला, शिवदर्शन झाले आणि मुक्ति मिळाली असे आहे. हे व्रत काही ठिकाणी चौदा वर्षे करावे, तर काही ठिकाणी बारा वर्षे तर काही ठिकाणी आयुष्यभर करावे असे सांगितले आहे. चौदा वर्षे व्रत करावे हे कालोत्तर खंडात सांगितले आहे. ‘चतुर्दशाब्दं कर्तव्यं शिवरात्रिव्रतं शुभम् ।’
महाराष्ट्रांत बहुतेक सर्वच शिवस्थानात या दिवशी उत्सव होतो. ठराविक देवळे वगळतां बहुतेक सर्व देवळे रात्री बंद करतात. हे चुकीचे वाटते.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply