माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी निशीथ कालव्यापिनी असेल तो दिवस महाशिवरात्रीचा मानला जातो. यात निशीथ काल म्हणजे काय याची अनेकांना कल्पना नसेल. रात्रीच्या एकूण वेळेचे १५ समान भाग केले म्हणजे त्यातील प्रत्येक भागाला मुहूर्त असे म्हणतात. त्यातील आठव्या मुहूर्ताला निशीथ असे म्हटले जाते. महाशिवरात्रीला निशीथ काळी शिवपूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या दिवशी शंकराची मनोभावे उपासना करावी.
आपल्या देशात सोरटी सोमनाथ, श्रीशैल, महांकालेश्वर, ओंकारमांधाता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, काशी विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, रामेश्वर, औंढ्या नागनाथ, केदारनाथ आणि घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. महाशिवरात्रीला या सर्व ठिकाणी मोठा उत्सव भरत असतो.
ब्रम्हाने सृष्टी निर्माण केली, विष्णू तिचे पालन करतात आणि शंकर भगवान लय करणार आहे अशी एक समजूत आहे. महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि श्रध्देने साजरा केला जातो. पण या उत्सवासंदर्भात काही गैरसमजही आहेत. या दिवशी भांग पिण्याची पध्दत अशीच गैरसमजावर आधारित आहे. वास्तविक त्याला धर्मशास्त्रात कोणताही आधार नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांचे महात्म्य समजून घ्यायला हवे. त्यानुसार केलेली आराधना, उपासना निश्चित फलदायी ठरेल.
आणखी एक बाब म्हणजे या महिन्यात आकाशात मृग नक्षत्र व्याधासह पाहताना मन हरपून जाते. फुलांची परडी उपडी करावी तशी नक्षत्र तारकांची फुलं विलोभनीय दर्शन देतात. याचाही लाभ सर्वांनी घ्यायला हवा. या महिन्यात आकाशात मृग नक्षत्र व्याधाच्या दर्शनाचाही लाभ घ्यायला हवा. त्यातून महाशिवरात्र पुण्यप्रद, फलदायी ठरेल.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply