आकाशातून पडणारी वीज ही आकाशात किती दूरपर्यंत पसरलेली असू शकते? दूरपर्यंत पसरलेल्या अशा विजेचा, आतापर्यंतचा विक्रम होता तो २००७ सालचा – अमेरिकेतल्या ओक्लाहोमा इथला. या विजेची आकाशातली लांबी सुमारे ३२१ किलोमीटर इतकी होती. या लांबलचक विजेला सहजपणे मागे टाकेल अशा विजेची दोन वर्षांपूर्वी निर्मिती झाल्याचं अलीकडेच लक्षात आलं आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कडाडलेल्या या विजेची, आकाशातली लांबी सुमारे ७०९ किलोमीटर इतकी प्रचंड होती. ही वीज दक्षिण ब्राझिलच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ते पश्चिमेकडील अर्जेंटिनाच्या सीमेपर्यंत पसरली होती. जागतिक हवामान संघटनेनं केलेल्या एका विश्लेषणात या महाविजेचं अस्तित्व स्पष्ट झालं. (हे अंतर मुंबई ते अमरावतीमधील सरळ अंतरापेक्षाही जास्त भरतं.)
जागतिक हवामान संघटनेनं काढलेला हा निष्कर्ष एकूण चार कृत्रिम उपग्रहांनी केलेल्या निरीक्षणांवर आधारित आहे. यातील दोन उपग्रह हे अमेरीकेचे तर उर्वरित दोन उपग्रहांपैकी, एक उपग्रह हा युरोपीय समुदायाचा आणि तर एक उपग्रह हा चीनचा आहे. आतापर्यंत विजेची निरीक्षणं ही फक्त जमिनीवरून केली जात असत. मात्र आता त्याला अंतराळशास्त्राचीही जोड मिळाल्यामुळे ही निरीक्षण अधिक सुलभ झाली आहेत, तशीच ती अचूकही झाली आहेत.
जागतिक हवामान संघटनेनं आपला आणखी एक निष्कर्षही जाहीर केला आहे. हा निष्कर्ष विजेच्या कडाडण्याच्या कालावधीशी संबंधित आहे. आतापर्यंत एकच वीज कडाडण्याचा जास्तीत जास्त कालावधी हा सुमारे ८ सेकदांचा होता. ही वीज ३० ऑगस्ट २०१२ रोजी, फ्रान्समधील आल्प्स पर्वताच्या परिसरात कडाडली होती. जागतिक हवामान संघटनेच्या नव्या निष्कर्षानं या कालवधीला खूपच मागं टाकलं आहे. या नव्या निष्कर्षानुसार उत्तर अर्जेंटिनामध्ये ४ मार्च २०१९ रोजी कडाडलेली वीज सर्वाधिक कालावधीची ठरते. ही वीज तब्बल सुमारे १७ सेकंद कडाडत होती!
आभार: डॉ. राजीव चिटणीस
(विज्ञानमार्ग संकेतस्थळ)
छायाचित्र सौजन्य: World Meteorological Organization
Leave a Reply