तरुण वयातील व्यासपीठ अतिशय आकर्षक असते आणि त्याकडे अनेक कारणांसाठी बरेचजण वळतात. गेले २-३ दिवस “पुरुषोत्तम करंडक ” च्या यंदाच्या निर्णयांनी एकूणच स्पर्धा-विश्व ढवळून निघाले आहे.
मी गेली ५० हून अधिक वर्षे वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, काव्यवाचन, एकांकीका अशा विविध स्पर्धांशी चार भूमिकांमधून जोडलेलो आहे- स्पर्धक, मार्गदर्शक (विद्यार्थ्यांना काहीतरी सुचविणे -पुस्तके, मुद्दे इ.), परीक्षक आणि सध्या संयोजक.
दोन अनुभव इथे नमूद करावेसे वाटताहेत-
(१) वालचंदला असताना आम्ही सांगलीच्या ADA ( AMATURES DRAMATIC ASSOCIATION) च्या वतीने आयोजित केलेल्या एकांकीका स्पर्धेत चं.प्र. देशपांडे यांची “इतिहास” ही एकांकिका सादर केली होती- फक्त तीन पात्रांची! सर्वदूर गाजलेली आणि पारितोषिके पटकावणारी पण शब्दबंबाळ!!
समोरच्या विलिंग्डन कॉलेजने (आमचा रंगकर्मी मित्र आणि प्रतिस्पर्धी – प्रदीप पाटील) ” कावळे” ही तितकीच तुल्यबळ एकांकिका सादर केली होती. सर्वांना पहिले बक्षीस पद्याला मिळणार असे वाटत होते आणि त्याला तर खात्रीच होती.
नेपथ्य, प्रकाश योजना, अभिनय आणि आमच्याइतकीच शब्दबंबाळ एकांकिका असे ते सादरीकरण होते. अनपेक्षितपणे आम्हांला पहिले आणि पद्याच्या एकांकिकेला दुसरे बक्षीस मिळाले.
तो पेटला.
पारितोषिक वितरण होते पुण्याच्या पी डी ए ( PROGRESSIVE DRAMATIC ASSOCIATION) चे अध्यक्ष -भालबा केळकरांच्या हस्ते ! त्यांना पडद्यामागच्या या “नाटकाबद्दल ” अर्थातच काही माहित नव्हते. पारितोषिक वितरणाच्या वेळी पद्या आणि त्याचा विलिंग्डन संघ दंडाला (निषेधाच्या) काळ्या पट्ट्या बांधून उपस्थित होता.प्रत्येक वेळी त्यांचे नांव पुकारले की मान खाली घालून पुरस्कार स्वीकारायचा आणि कोणाशीही हस्तांदोलन न करता खालमानेने परतायचे असे सुरु होते. भालबांना हे कोणीतरी सांगितले. अध्यक्षीय भाषणात ते नेहेमीप्रमाणे मनोज्ञ बोलले-
“एकदा कोणत्याही स्पर्धेत तुम्ही भाग घेतला की त्याचा अर्थ असतो- तुम्हांला स्पर्धेचे सर्व नियम मान्य आहेत. यांत परीक्षकांचा निर्णयही आला. तो तुम्हांला पटो वा ना पटो, स्वीकारायलाच हवा. बहिष्कार वगैरे तंत्रे वापरून स्पर्धांचे वातावरण दूषित करायचे नसते. हे अमान्य असेल तर मूळात भागच घ्यायचा नाही.”
(२) “दिव्य जीवन संघ ” पुणे शाखेच्या वतीने गेली १८ वर्षे आम्ही राज्य पातळीवरील आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व (त्यांत गेली दोन वर्षे ऑनलाईन) आणि १७ वर्षे राज्यस्तरीय आंतरशालेय निबंध स्पर्धा आयोजित करीत असतो.
(यंदाची निबंध स्पर्धा मागील महिन्यात संपन्न झाली आणि वक्तृत्व उद्या आहे).
साधारण ४-५ वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठातील एक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाला होता. निर्णय जाहीर झाल्यावर त्याने परीक्षकांशी वाद घालायला सुरुवात केली-
” मला मार्क्स बघायचे आहेत. त्याचे भाषण (माझ्यापेक्षा) चांगले झालेले नसूनही त्याला कां नंबर आणि मला कां नाही?”
दोघे परीक्षक त्याला समजावू लागले. शेवटी मी संयोजक म्हणून मध्ये पडलो. त्याला आणि त्या निमित्ताने सर्वच सहभागी स्पर्धकांना स्पष्ट सांगितले-
” स्पर्धेच्या आधी गुणांकनाचे निकष मी आधीच जाहीर केले होते. दोन्ही परीक्षकांचा परिचय करून दिला होता आणि त्यांचे कर्तृत्व कथन केले होते. आम्ही संयोजक म्हणून निर्णय प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही, हेही तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. मित्रा ,आमच्या पत्रकात एक नियम आहे- परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागी स्पर्धकांवर बंधनकारी असेल.” (भालबा जिंदाबाद )
(आम्ही स्पर्धा संपली की तेथेच अर्ध्या तासात निर्णय जाहीर करतो आणि त्यानंतर परीक्षकांचे मनोगत आणि पारितोषिक वितरण समारंभ असतो.)
स्पर्धा पारितोषिकांसाठी(करंडक, ढाल ,चषक वगैरे)असतात की बक्षिसाच्या रकमेसाठी की मिळालेल्या व्यासपीठावर स्वतःला पारखून घेण्यासाठी असतात कां मैत्र नको, शत्रू हवा याचा सर्वांनीच यानिमित्ताने (पुन्हा एकदा) विचार करण्याची पाळी आलीय.
#पुरुषोत्तमकरंडक
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply