गावखेड्यातील मुलं शाळेत येतात. शिक्षण घेतात. तसेच महाविद्यालयातही प्रवेश घेतात. मात्र ग्रामीण भागात शिक्षण घेण्यास आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षणाच्या सोयी अत्यल्प असतात. घरची परिस्थिती नाजूक असते. कृषी संस्कृतीशी निगडित व्यवसाय असतो. घरचे संस्कार त्यांच्यासोबत असतात. गावचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांचा पगडा मनावर असतो. शिक्षण ही संकल्पना जसजशी प्रगल्भ होऊ पाहते, तितकीच ती कठीण होत जाते. मुलं मोठी झाली की, पालकांना त्यांची जबाबदारी वाढल्याचे जाणवते. किंबहुना ते आपल्या पाल्याचे पालनपोषणाचे ओझे डोक्यावर घेऊन हिंडताना दिसतात. तत्कालीन परिस्थितीत ते योग्यच असते. तसेच साहजिकही आहे. दहावीनंतर शिक्षणाचा अनेक शाखांमध्ये विस्तार होतो. ती शाखा विद्यार्थ्यास त्याच्या आवडीनिवडीप्रमाणो मिळेलच असे नाही.
मुलींच्या त्यातही विशेषत: ग्रामीण भागातील मुलींच्या बाबतीत तर अनेक समस्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षणात मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. पालकांनी करून घेतलेला गैरसमज. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी नसणो. शिक्षणाची सुविधा नसणो. आपल्या मुली सुरक्षित नाहीत ही पालकांना भेडसावणारी अनाठायी चिंता. आर्थिक दुर्बलता. महाविद्यालयात जाण्यासाठी वाहनांची सोय नसते. मुलगी हे परक्याचे धन आहे ही मानसिकता. समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, अडाणीपणा ही काही प्रमुख कारणो त्यामागे आहेत. आजही तिला सन्मानाची वागणूक देण्यास समाज कचरतो.
दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिका, चित्रपट यातून जे अवास्तव दर्शन घडविले जाते. जे विकृतीकरण करतात, ते वर्तमान सामाजिक परिस्थितीशी साधर्म्य असतेच असे नाही. रक्षण करणार्या यंत्रणांवर असणारी विश्वासार्हता. रक्षण करणारी आणि न्याय देणारी यंत्रणा हे कितपत तिच्या रक्षणासाठी सजग राहतील, यावर हे अवलंबून असते. महाविद्यालये शिक्षण देण्यासाठी कितपत सोयी उपलब्ध करून देतात? हाही एक प्रश्न आहे. कारण या युवती एकतर प्रवेश घेत नाहीत आणि घेतला तर फक्त पटावर नाव असते. केवळ परीक्षेसाठी येणो जाणो असते. ती परीक्षाही कॉपीयुक्त. शिष्यवृत्ती, तडजोडी, शिक्षणाचा खर्च, संस्थाचालकांचे हित अशा अनेकविध बाबी अशा आहेत की, त्या शिक्षणातील अडथळा ठरतात. परगावहून येणार्या मुलींच्या अनेक समस्या आहेत. वाहनांची सुविधा अपुरी असणो. वाटेत, प्रवासादरम्यान मिळणारी वागणूक या सर्वांचा परिणाम मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणावर होतो आहे. आज महाविद्यालयात पाहिले तर तास नियमित होत असतील. परंतु काही शहरांतील मोजकी महाविद्यालये सोडली तर इतर महाविद्यालयांत मात्र मुलींचे बेंच रिकामेच असतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. एखाद्या वर्गात एखादी-दुसरी विद्यार्थिनी असलीच तर ती नियमित येतेच असे नाही. हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे.
मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी हमी देऊन शिक्षणसक्ती का करू नये? तसेच जन्मदर वाढविण्यापासून ते आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराची साधने उपलब्ध करून देणो. हे या व्यवस्थेचे कामच आहे. ते आवश्यक आहे. ज्या ठिकाणी मुली अधिक प्रवेश घेतात, त्याठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखविलेली आहे.
महाविद्यालयीन स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व, गायन, वादन किंवा मैदानी खेळ असतील तिथे मुलीच अग्रक्रमाने पुढे असतात. एमपीएससीच्या किंवा तत्सम परीक्षेच्या निकालात पाहिले तर मुली प्राधान्यक्रमाने पुढे गेलेल्या पाहावयास मिळतील. सचोटी, प्रामाणिक प्रयत्न आणि उपजत गुणकौशल्य यांच्या बळावर अनेक यशशिखरे पादाक्रांत केलेली आहेत. हा इतिहास आहे आणि हे वर्तमानही आहे.
महाविद्यालयाचा परिसर पाहिला तर ग्रंथालयापेक्षा चहाच्या कट्टय़ावर जास्त गर्दी असते. तेथील परिसराचे वातावरण प्रदूषित असते. व्यसनाधिन किंवा कॉलेज म्हणजे मौजमजा असा गैरसमज करून आलेले विद्यार्थी. काही फसलेले, फसवलेली युवाशक्ती पाहिली की, पालक गंभीरपणे विचार करतो. मुलींच्या बाबतीत काळजी करतो. तिथेही तिच्या शिक्षणाला गतिरोध निर्माण होतो.
मुलींच्या वसतिगृहाच्या संदर्भात किंवा आश्रम शाळांमधील मुलींची सुरक्षितता, एकंदरीत सर्वच ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळाली तर पालकांमध्ये नक्कीच आत्मविश्वास वाढेल. ते मुलींना महाविद्यालयीन शिक्षण देतील. पालकांची इच्छाशक्ती असूनही ते हे शिक्षण देऊ शकत नाहीत. परिणामी देशाची प्रचंड हानी होते. भरमसाट वाढलेल्या फीस, शिकवणीचे फुटलेले पेव, त्यांच्याकडून होणारी आर्थिक फसवणूक, महाविद्यालयाची कमी असलेली संख्या या बाबी घातक आहेत.तसेच महाविद्यालयीन शिक्षणाचा बाऊ करू नये. सोप्या पध्दतीने शिक्षण दिले जावे. कॉपीमुक्तीही गरजेची आहे. परीक्षा पध्दतीही सदोष असते. अशा सर्व बाबींचा कमी अधिक परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो.शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक पिळवणूक थांबवून समानतेने त्यांना शिकविले तर मुलींचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. रथाची दोन्ही चाके मजबूत आणि भक्कम असतील तेव्हाच रथ व्यवस्थित चालू शकेल. म्हणून महाविद्यालयीन युवतींचे शिक्षण हे भयमुक्त, भेदभावविरहित विश्वासपूर्ण, सौहार्दपूर्ण वातावरणात व्हायला हवे.
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
( पुण्यनगरी मध्ये पूर्वप्रकाशित)
Leave a Reply