भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३९ रोजी विदर्भातल्या पारवा या गावात झाला.
त्रिधारा या नाट्य प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. महेश एलकुंचवार यांचा जन्म तेलगु भाषक कुटुंबात झाला. त्यांची मातृभाषा तेलगूच. पारवा गावातच प्राथमिक शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते नागपूरला आले. मॉरिस कॉलेजमधून बी.ए आणि नागपूर विद्यापीठातून इंग्लिश विषय घेऊन एम.एची पदवी मिळवली. कॉलेजजीवनात असताना, १९५७ ते १९६३ या काळात,त्यांनी जवळजवळ पाचशे ते सहाशे इंग्रजी चित्रपट पाहिले होते. पण विद्यार्थिदशेतच विजय तेंडुलकर यांचे “मी जिंकलो, मी हरलो’, हे नाटक पाहून त्यांना नाट्य लेखनाची प्रेरणा मिळाली. व सहजपणे पाहिलेल्या नाटक या घटनेचा परिणाम होऊन एलकुंचवार नाटक या माध्यमाकडे वळले. चौफेर वाचन असलेल्या एलकुंचवार यांनी १९६७ साली “सुलताना’हे पहिले नाटक लिहिले आणि ते सत्यकथा मासिकात प्रसिद्ध होताच,नाट्य दिग्दर्शक आणि ख्यातनाम अभिनेत्री विजया मेहता यांनी रंगायन या संस्थेतर्फे ते रंगभूमीवर आणले. मानवी जीवनातली विलक्षण गुंतागुंत, पारंपरिक चालीरीतींचा प्रभाव, त्यामुळे निर्माण होणारे विविध सामाजिक प्रश्न, लोककथा,लोककलांचा सामाजिक प्रभाव, स्त्री जीवनाची मानसिक कोंडी, याचे प्रचंड चिंतन असलेल्या एलकुंचवार यांची नाटके चाकोरीबाह्य आणि नव्या विषयांवर प्रकाशझोत पाडणारी होती. पूर्ण अभ्यास आणि चिंतन केल्याशिवाय त्यांनी नाटके लिहिलेली नाहीत. त्यांच्या नाट्य लेखनात विलक्षण ताकद असल्यामुळेच त्यांच्या नाटकातली पात्रे प्रेक्षकांनाही नवा विचार देतात. १९८४ साली “होळी’ या नाटकावर केतन मेहता यांनी तर गोविंद निहलानी यांनी “पार्टी’ या नाटकावर हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोन्ही चित्रपटांसाठी पटकथा लेखनही एलकुंचवार यांनीच केले होते.
रुद्राक्ष, झुंबर, एका म्हाताऱ्याचा मृत्यू,कैफियत, यातनाघर, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, प्रतिबिंब, धर्मपुत्र, एका नाट्याचा मृत्यू, रक्तपुष्प, यासह त्यांनी लिहिलेली तीस नाटके मराठी रंगभूमीला नवी दिशा देणारी ठरली आहेत. त्यांच्या काही नाटकांचे हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषातही अनुवाद झाले आहेत.
मराठी भाषेवर विलक्षण प्रेम आणि या भाषेचा अभिमान असलेल्या महेश एलकुंचवार यांनी मराठीतच नाट्य लेखन केले. मराठी नाटक हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव असल्याचे ते सांगतात. ‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, युगांत,गाबरे यासारख्या प्रसिद्ध नाटकाचे लेखन करून क्रांती घडवून आणणाऱ्या महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला राज्य सरकारने १९८७ मध्ये उत्कृष्ट नाटक म्हणून सन्मानित केले होते.‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘युगांत’ या नाटकाला देण्यात आला. १९९४ मध्ये संगीत नाटक अकादमीचा २००३ मध्ये अत्यंत मानाचा असा ‘सरस्वती सन्मान’,२००४ मध्ये साहित्य अकादमीचा व २००८ मध्ये पु.ल देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’ त्यांना मिळाला. मराठी नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकाने त्यांचा सन्मान झाला होता.त्यांना ‘प्रिय जी. ए. सन्मान पुरस्कार,’ के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे ‘सरस्वती पुरस्कारा’साठी सन्मानित करण्यात आलेआहे. तसेच संगीत मराठी अकादमीने विशेष अभ्यासवृत्ती जाहीर करून त्यांचा गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply