कालच अविनाश खर्शीकर गेल्याची बातमी फेसबुकवर वाचली. अविनाशने साकारलेला ‘सौजन्याची ऐशी तैशी’ मधील पक्या, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील श्याम, कधी तरी विसरणं शक्य आहे का? ऐंशी सालापासून त्याला नाटकांतून, चित्रपटांतून पहात आलोय. त्याच्याशी प्रत्यक्ष भेट होण्याची संधी, महेश टिळेकरच्या ‘आधार’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मला मिळाली होती. त्यामध्ये अविनाशने इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती.
महेश नावाच्या माणसांना यश आणि प्रसिद्धीही अमाप मिळते. आठवा बरं, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि महेश टिळेकर! हाच महेश टिळेकर, अगदी पोरसवदा असताना आमच्या ऑफिसवर आला. त्याने स्वतःच लिहिलेल्या ‘परोपकारी गंपू’ या बालनाट्याचे त्याला पेपरसाठी डिझाईन करून घ्यायचं होतं. बारीक अंगकाठीचा, डोक्यावरील केसांचा जिरेकट केलेला, अंगात हाफशर्ट, खाली पॅन्ट, पायात चपला अशा वेशात त्याला पाहून मला तो शाळेतूनच आल्यासारखा भासला. बोलताना हसत बोलण्याची त्याला सवय होती. त्याचे काम केले, त्याला ते फार आवडले. तेव्हापासून तो डिझाईनसाठी नेहमीच आमच्याकडे येत राहिला.
काही वर्षांनंतर तो आला, त्याच्या ‘टेस्टी मिसळ’ या नवीन कार्यक्रमाच्या डिझाईनच्या निमित्ताने. बालगंधर्वला आम्ही तो कार्यक्रम पहायला गेलो होतो. आताचे मराठी सुपरस्टार सुमीत राघवन व प्रसाद ओक, यांचे ते उमेदवारीचे दिवस होते. त्यांनी किस्से सांगून धम्माल हसविले. गुड्डी मारुती, देव आनंदची मिमिक्री करणारा किशोर भानुशाली, मनोरमा वागळे अशा अनेक कलाकारांबरोबर त्यावेळचं वादळी व्यक्तिमत्त्व जी. आर. खैरनार यांनाही आमंत्रित करुन त्यांनाही महेशनं बोलतं केलं होतं. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे महेशने ‘टेस्टी मिसळ’ पासूनच मोठ्या सिलेब्रेटीजना एकत्र आणण्याचे ‘भगीरथी काम’ लीलया केलेले आहे.
त्यानंतर तो भेटला ‘उमेद पुरस्कारा’च्या निमित्तानं. महेशने आपल्या संस्थेतर्फे मान्यवर हिंदी मराठी सिनेअभिनेत्यांना ‘उमेद पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली. त्या पुरस्काराचे ट्राॅफी डिझाईन केले. तशा बारा ट्राॅफीज त्याने आमच्याकडून करुन घेतल्या. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या हाॅलमध्ये हा सोहळा साजरा झाला. मी फोटो काढायला हजर होतो. मृणाल कुलकर्णी, रती अग्निहोत्री, अजित वाच्छानी, अशा अनेक नामवंत अभिनेत्यांना पुरस्कार दिले गेले.
महेशने पहिली टेलिफिल्म केली ‘अबोली’ नावाची. त्याचे फोटो काढण्यासाठी आम्ही दोघे महेशच्या युनिटबरोबर सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या खेडेगावात गेलो होतो. संपदा जोगळेकर ही नायिकेच्या भूमिकेत होती. सोबत निळू फुले, भरत जाधव, अरुणा भट, इ. नामवंत कलाकार होते. दोन दिवसांच्या शेड्युलमध्ये टेलिफिल्म तयार झाली.
काही वर्षांनी त्याने अजून एक टेलिफिल्म तयार केली. त्या टेलिफिल्मवरुनच ‘आधार’ नावाचा चित्रपट करायला घेतला. महेशने ‘आधार’च्या स्थिरचित्रणाचे काम माझ्यावर सोपविले. हा चित्रपट, मध्यमवर्गीय कुटुंबासाठी त्याग करणाऱ्या तरुण मुलीचा होता. तरुणीची मध्यवर्ती भूमिका ऐश्र्वर्या नारकरने केली होती. मराठी व हिंदीमधील अनेक नामवंत कलाकारांना एकत्र आणून महेशने हा मल्टीस्टार चित्रपट केला. जंगली महाराज रस्त्यावरील माॅडर्न शाळेसमोरील एका टुमदार घरामध्ये ‘आधार’ चे शुटींग सुरू झाले. ते घर दुमजली होते. वरती मोठ्या हाॅलमध्ये आठ दिवस शुटींग झाले. कॅमेरामन साऊथचा होता. हिंदी चित्रपटात पडद्यावरच पाहिलेले कलाकार या निमित्ताने प्रत्यक्ष भेटले.. युनुस परवेझ, टाॅम आल्टर, शुभा खोटे, अक्षय कुमार, गुड्डी मारुती, सुलभा आर्य, इ. चे मी फोटो काढले. पुण्यात चार लोकेशनवर आणि काही बंगल्यात शुटींग झाल्यावर पहिले शेड्युल पूर्ण झाले.
महेशला फोटो अल्बम दिले. त्या चित्रपटाचा मेकअपमन, जसं सांगेल तसं, महेश ‘त्याचं’ ऐकायचा. काहीही कारण नसताना त्या मेकअपमनने फोटोंसंदर्भात महेशकडे टिका केली, परिणामी दुसऱ्या शेड्युलला महेशने मला बोलावले नाही.
काही वर्षांनंतर त्यानं केलेल्या ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटाचा निर्माता डिझाईनचे काम घेऊन आमच्याकडे आला. तो निर्माता प्रत्यक्ष चित्रपटाच्या सेटवर न गेल्याने खूप अडचणीत आलेला होता. चित्रपटाची डिझाईन झाली. मुंबईला ‘प्लाझा’मध्ये चित्रपटाचा भव्य प्रिमियर शो संपन्न झाला.
त्यानंतर महेशने ‘लाडीगोडी’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या वितरणासाठी त्याला फायनान्सर हवा होता. ‘संस्कृती’ प्रकाशनच्या माईंशी त्याने संपर्क केला. त्यांना चित्रपटक्षेत्राचा काही अनुभव नसल्याने, आम्ही सावध केले. काही वर्षांनी तो चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर महेशने चित्रपट निर्मिती थांबवली.
‘मराठी तारका’ नावाचा इव्हेंट शो घेऊन महेश पुन्हा रंगमंचावर आला. मराठी चित्रपटांतील आघाडीच्या अभिनेत्रींना एकत्र आणून डान्सिकल शोची निर्मिती केली. हे शो त्याने भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात, परदेशात, भारताच्या सीमेवरील जवानांसाठी केले. त्यासाठी त्याला राज्य व केंद्र सरकारने भरपूर सहकार्य केले.
‘मराठी तारका’ नावाचे त्याने एक मोठ्या साईजचे फक्त सिने अभिनेत्रींच्या दुर्मिळ अप्रतिम फोटोंचे पुस्तकही प्रकाशित केले. त्याच्या चार आकडी किंमतीपेक्षा संदर्भ म्हणून त्याची किंमत लाखमोलाची आहे.
पस्तीस वर्षांपूर्वी ऑफिसवर आलेला पोरगेला महेश, आज ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या असंख्य सेलेब्रिटीजना रंगमंचावर आणणारा स्वतःच एक ‘सेलिब्रिटी’ झालेला आहे.पस्तीस वर्षांपूर्वी ऑफिसवर आलेला पोरगेला महेश, आज ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या असंख्य सेलेब्रिटीजना रंगमंचावर आणणारा स्वतःच एक ‘सेलिब्रिटी’ झालेला आहे.
जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सहवासाचा कालावधी हा चित्रगुप्ताकडे ‘पूर्वनियोजित’ ठरलेला असावा, असं मला प्रकर्षानं जाणवतं. तो ‘कालावधी’ एकदा पूर्ण झाल्यावर तुमच्या मनात असूनही तुम्ही दोघं, पुन्हा एकत्र येऊ शकत नाही, हेच खरं….
आता कधी जेव्हा मी टीव्ही वर सुलभा आर्य यांची व्हाॅटसअपची ‘मनातलं बोला, जग खुलं होईल’ ही जाहिरात पाहतो, तेव्हा घरच्यांना सांगूनही विश्र्वास बसत नाही, की या सुलभाताईंचे फोटो मी एकेकाळी काढलेले आहेत….या मला मिळालेल्या सुवर्णसंधीचे ‘क्रेडिट’ अर्थात महेशलाच जाते….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-१०-२०.
Leave a Reply