नवीन लेखन...

महेश्वरची महाश्वेता… अहिल्याबाई होळकर

Image : Prakash Pitkar…

प्रत्येक मराठी मनात ‘माळव्या’ बद्दल एक वेगळीच जवळीक आणि हळवं आकर्षण आहे. इंदूर … धार … देवास … मांडू .. जीवनदात्री…गूढरम्य नर्मदा ….

ही आकर्षणं तर मराठी मनात खूप आहेतंच पण अजून मोठं आकर्षण म्हणजे नर्मदेच्या तीरावरचं महेश्वर आणि अहिल्याबाई होळकर.

अहिल्याबाई होळकरांच्या अनेक दिव्य गोष्टी कित्येक वर्ष मनात रुंजी घालत असलेल्या … आम्ही गेल्यावर्षी माळव्याच्या सहलीवर गेलो … दोन दिवस मांडूत राहून तिसऱ्या दिवशी महेश्वरला पोचलो … गाडी पार्क केली … समोर अतिशय मोठं … त्यावेळचं प्रवेशद्वार होतं …. आम्ही पाच जण होतो … चार गाडीत आणि केदार त्याच्या इन्फिल्ड मोटरसायकलवर …. समोर वयस्कर गाईड आला … आमचं मराठीतलं बोलणं ऐकून मराठीत बोलला …. त्याच्याबरोबर जवळच असलेल्या होळकरांच्या राजवाडयात प्रवेश केला आणि समोर अहिल्याबाईंचा पूर्णाकृती सुंदर पुतळा आणि वृंदावन होतं ….क्षणार्धात सगळं विसरलो …. नजर आपोआप नम्र झाली …. नमस्कार केला गेला …. एवढी वर्ष त्यांच्याबद्दल इतकं काही ऐकत होतो … आता त्यांच्यासमोर प्रत्यक्ष महेश्वरात नमस्कार करत होतो …. बराच वेळ पाऊलं तिथेच घुटमळत राहिली … आणि काही वेळाने आम्ही बाजूलाच असलेल्या त्यांच्या ‘वाड्यात’ प्रवेश केला … राजवाडा असं मुद्दामूनच म्हटलं नाही … तिथे ऐश्वर्य दिसत नाही … वाडा दिसतो … एकदम राकट … होळकर धनगर होते … तसाच राकटपणा वाडयात आजही जाणवतो … आणि मराठी साधेपणा … रुंद ओसरीवर त्यावेळी असायची तशी अहिल्याबाईंची बैठक आहे … सिंहासन वगैरे नाही ….. वाडयात त्या गादीसमोर उभं राहिल्यावर …. आपण नकळत गतकाळात जातो….. त्यावेळी बाजीराव पेशव्यांची तलवार सर्वदूर थैमान घालत होती … भीमथडीच्या त्यांच्या घोडयांनी १७२०मध्ये नर्मदा ओलांडली आणि माळवा जिंकला …. मराठी भगवा माळव्याच्या बारा परगण्यात मोठया दिमाखाने फडकू लागला ….बाजीरावांनी आपल्या करारी आणि कर्तृत्वान सहकाऱ्यास इंदूर आणि परिसरातले अनेक परगणे बहाल केले … आणि सुभेदार मल्हारराव होळकरांनीं आपला राज्यकारभार महेश्वरच्या या वाड्यातून सुरु केला…. उत्तरोत्तर त्यांचा खूप उत्कर्ष होत गेला .. साधारण १७३३ च्या दरम्यान त्यांच्या एकुलत्या मुलाचं … खंडेरावाचं लग्न आठ वर्षांच्या अहिल्येशी झालं … मात्र खंडेराव दुर्गुणी निघाला …. व्यसनाधीन झाला … अहिल्याबाईनीं मात्र सात्विक वर्तनाने नवर्याच्या वागणुकीत परिवर्तन करायचा प्रयत्न करू लागली … त्याच्यात खूपच फरक पडला … त्यांना मालेराव हा मुलगा झाला … पुढे तीन वर्षांनी मुक्ताबाई ही मुलगी झाली. पण सुरळीत चाललेलं नीट टिकलं नाही … राजस्थानातील उन्मत्त झालेल्या सुरजमल जाटाला नमावण्यासाठी मराठयांनी ‘कुंभेरी’च्या त्याच्या किल्ल्याला वेढा घातला …. मल्हाररावांनी पण केला … कुंभेरीची माती यमुनेत टाकेन …. या लढाईत खंडेरावदेखील होता ..अचानक किल्ल्यावरून वेगाने आलेल्या तोफगोळ्याने खंडेरावाचा वेध घेतला …. तो मरण पावला … त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती … सुभेदारांनी अहिल्याबाईंची खूप विनवणी केली .. आपल्या या वृद्ध सासऱ्यासाठी आणि होळकरांच्या प्रजेसाठी तिने सती जाण्याचा निर्णय बदलला … दुर्दैव चालूच राहिलं … ही घटना सरते न सरते तोच पानिपतावर मराठयांचा मोठा पराभव झाला …… होळकरांवर अनेक आरोप झाले … ते यातून सावरले नाहीत … काही दिवसांनीं सुभेदार मरण पावले … (२६ मे १७६६).

खंडेरावांच्या मृत्यूनंतर सुभेदारांनी अहिल्याबाईंना दिले … त्यांचा आपल्या या गुणी सुनेवर खूप विश्वास होता. थोड्याच दिवसात त्या उत्तम राजकारण तर शिकल्याचा पण कुशल प्रशासनावर देखील त्यांनी हुकूमत मिळवली … त्यांनी लढाईचं तंत्र देखील आत्मसात केलं. लढाईतील … राजकारणातील डावपेचांचं त्यांचं ज्ञान मोठं विकसित झालं. त्यात त्या वृत्तीने सात्विक आणि धार्मिक असल्याने त्यांनी थोड्याच अवधीत अधिकाऱ्यांची … सैनिकांची आणि प्रजेची मनं जिंकली.

सुभेदाराच्या निधनानंतर अहिल्याबाई होळकर कारभार पूर्णपणे सांभाळू लागल्या… राज्यात शांतता आणि सुरक्षितता असण्यावर सुरवातीपासूनच भर दिला. सुरवातीपासूनच तिचा करारी कारभार सुरु झाला. राजस्थानातील चंद्रवंतांनी तीन वेळा तिच्या विरुद्ध बंडाळी केली. अहिल्याबाईंनी स्वतः नेतृत्व करून या बंडाळीचा पुरा बिमोड केला. त्यांच्या या धडाडीची कीर्ती सर्वदूर पसरली … काही काळानंतर राघोबादादा पेशव्यांनी त्यांचे राज्य बळकावण्याचा मनसुबा केला … त्यांचे कारभारी गंगाधर चंद्रचूड यांची ही शक्कल होती … माधवराव पेशव्यांना याची कल्पना नव्हती … अहिल्याबाईंना याचा सुगावा लागताच त्यांनी आपलं सारं कर्तृत्व पणाला लावत या कटाला टक्कर द्यायची तयारी केली. त्यांची ही तेजस्वी भूमिका बघून बहुतेक मातब्बर मराठा सरदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले … मर्द तुकोजीराव होळकराने राघोबादादाला निरोप दिला … क्षिप्रा ओलांडून याल तर आमची तलवार तुम्हाला भिडेल … राघोबादादाने वेळीच शहाणपण दाखवून सारवासारव केली आणि पुण्याला मागे फिरला…अशा अनेक वेळा बाईंनी फार सामर्थ्याने परिस्थिती हाताळून दरारा निर्माण केला.

पुराणकाळापासून महिष्मती नावाने प्रचलित असलेल्या महेश्वरहून बाईंनी तीस वर्ष कारभार केला. नर्मेदेचे सुंदर आणि विशाल पात्र .. निसर्गाच्या इथल्या मनोहारी रूपाने त्यांना भुरळ घातली …. त्यांनी इथे अनेक सुंदर घाट बांधले … देवळं बांधली … पूर्वीच्या देवळांचा जीर्णोद्धार केला …. महेश्वरला अतिसुंदर ठिकाण बनवलं …. नुसत्याच महेश्वरला नाही तर देशात अनेक ठिकाणी देवळं … घाट … बांधले …यात्रेकरूंसाठी सुसज्ज धर्मशाळा बांधल्या… परराज्यात सुद्धा रस्ते … नद्यांवर पूल बांधले … पाठशाळा उभारल्या … संस्कृतच्या प्रसारासाठी मोठमोठी अनुदानं दिली … त्या काळी केलेल्या त्यांच्या कार्याचा आवाका बघायचा झाल्यास गया … बनारस … जगन्नाथपुरी … अयोध्या … मथुरा … हरिद्वार .. द्वारका … पंढरपूर …… रामेश्वर … अशा .. हिमालयापासून ते पार रामेश्वर .. द्वारकेपर्यंत सढळ हाताने मदत करून ही सगळी लोकोपयोगी कामं केली. देशातील सर्व भागातून येणाऱ्या भाविकांसाठी अन्न आणि निवाऱ्यासाठी अलोट देणग्या दिल्या … काशीविश्वेश्वराच्या देवळाचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला .. काशीचा मनकर्णिका घाट बाईंनी बांधला … सोरटी सोमनाथाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला … पंडित मोरोपंत… कवी खुशालीराम … शाहीर अनंतफंदी अशा अनेक विद्वान कवींचा बाईंच्या दरबारात मोठा सन्मान होता ….त्यांचं कर्तृत्व खरंच डोळे दिपवणारं असंच आहे … आज इतकी वर्ष झाली … पण इंदूर ..महेश्वर म्हटलं की पहिलं त्यांचंच नाव येतं … मनातून नमस्कार केला जातो … त्यांना ‘पुण्यश्लोक’ असंही संबोधतात … अतिशय सामर्थ्यवान… राजकारणी … करारी … असूनही अत्यंत सात्विक म्हणूनच त्यांची प्रतिमा जनमानसावर आहे … डोक्यावरून पदर घेतलेली.. अतिशय सात्विक भाव असलेली .. अशीच त्यांची मूर्ती डोळ्यांसमोर येते …. अहमदनगरजवळच्या अगदी लहान खेड्यातल्या या मराठी मुलीने … त्या काळी … अत्यंत धकाधकीच्या दिवसात … आपल्या भूमीपासून दूर असलेल्या भागात राहून एवढी थोर कामं केली … देशात दिगंत कीर्ती मिळवली ….त्यांना मनापासून वंदन …. त्या महेश्वरला दीर्घकाळ राहिल्या … नर्मदा आणि तिचा विशाल दैवी प्रवाह … बहुतेक त्यांचं स्फुर्तिस्थान असावं …. नर्मदेसारख्याच त्या सतत प्रवाहित राहिल्या … लोककल्याणासाठी … त्या म्हणजे महेश्वरची महाश्वेता आहेत … जिथपर्यंत नर्मदा वाहत राहील … तिथपर्यंत महेश्वरची ही महाश्वेता लोकांच्या मनात राहतील … अतिशय आदराने _/\_

आपण हे सगळं अनुभवत नर्मदेसमोर उभे असतो …. नर्मदा …महाराणी अहिल्याबाई … आणि महेश्वर … एक सुंदर अनुभव असतो … कधीही न विसरता येण्या सारखा … पाय निघता निघत नाही … मी गाडी सुरु करतो … इंदूर गाठायचं असतं …. !

(सहलीच्या शेवटी भोपाळहून आम्ही गाडी घेऊन मुंबईला निघतो … केदार मात्र अजून एक दिवस राहून फिरला …येतांना तो एक पूर्ण दिवस महेश्वरला मुक्काम करून त्याने हे सगळं परत अनुभवलं … स्वतंत्र होडी घेऊन नर्मदेत निवांत फेरफटका मारला … नदीच्या मध्यभागी जाऊन … होडीतून महेश्वरच्या घाटाचे फोटो काढले …मात्र अचानक तुफान वादळ सुरु झालं … जेमतेम कशीबशी नाव किनाऱ्याला सुखरूप लागली … मात्र महेश्वरच्या थरारक आणि सुंदर आठवणींबरोबर … त्याच्याकडे सुरेख फोटोंचं धन देखील जमा झालं … महेश्वर नक्कीच अविस्मरणीय झालं …)

— प्रकाश पिटकर
7506093064
9969036619
prakash.pitkar1@gmail.com

(Anyone can share this post but with my name…copy rights for article and images remains with Prakash pitkar)

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..