नवीन लेखन...

मैं ख़याल हूँ किसी और का ….. (ग़ज़लचा रसास्वाद)

  • प्रास्ताविक :

#‘मैं ख़याल हूँ किसी और का … ’ ही गझल मेहदी हसन यांनी ( व इतर प्रसिद्ध गायकांनीही) गाइलेली व सलीम कौसर या पाकिस्तानी ग़ज़लगोनें (गझलकार) लिहिलेली आहे. (मेहदी हसन यांनी आपल्या गायनाच्या आधी या गझलगोचा उल्लेख केलेला आहे).

ही गझल, ‘मैं .खयाल हूँ किसी और का’ या नांवाच्या एका पाकिस्तानी टी.व्ही. सीरियलमध्ये आहे. शायरानें गझल आधी लिहिली व नंतरती सीरीयलमध्ये वापरली गेली , अथवा त्यानें ती सीरीयलसाठीच लिहिली, याची कल्पना नाहीं. पण, सीरीयलचें नांव तथा कथानक बघतां, शायरानें बहुदा ही गझल सीरीयलसाठी लिहिली असावी असें वाटतें.

#या सीरीयलचें कथानक मुख्यत: असें आहे –  ‘एका युवतीचें एका युवकावर प्रेम असतें. मात्र, तिला स्वार्थत्याग –sacrifice— करावा लागतो, व एका अन्य तरुणाशी तिचा निकाह् ( लग्न ) होतो’.

#गझलच्या रसग्रहणासाठी, ती कथानकाची माहिती असायला हवीच असें कांहीं नाहीं.

[ उदा. – मेहदी हसन यांनी गाइलेली व अहमद .फराज़ यांनी लिहिलेली , ‘रंजिश ही सही’ ही गझल.

( टीप : त्या गझलविषयी अधिक माहिती हवी असल्यास , माझा त्या विषयावरील

लेख   www.marathisrushti.com  अथवा  www.subhashsnaik.com वर वाचावा ) ] .

#पण आपण इथें त्या कथानकाचा संदर्भ ध्यानांत घेणार आहोत ( म्हणजेच, ‘एका तरुणीचें एका युवकावर प्रेम असूनही तिला दुसर्‍या कुणाशी तरी लग्न करावें लागलें आहे’, असा संदर्भ).

 

  • या गझलबाबत आणि गझल या काव्यप्रकाराबद्दल कांहीं प्राथमिक माहिती :
  • #प्रस्तुत गझलचे शब्द आपण पुढे पाहणारच आहोत.

-तिचा मत्ला , ( यावरूनच मराठीत ‘मथळा’ हा शब्द आलेला आहे )  अर्थात् पहिला शेर आहे, ‘मैं .खयाल हूँ किसी और का … ’  .  ( पूर्ण शेर पुढे पहावा).

-मक़्ता, म्हणजे अंतिम शेर ज्यात शायरानें स्वत:चें नांव , pen name — ‘त.खल्लुस’ — गंफलेलें असतें. [एक उदाहरण : ‘आज ग़ालिब गज़लसरा न हुआ’. (गज़लसरा : गझलगायक) ].

– प्रस्तुत गझलमध्ये  मक्ता आहे, ‘जो मेरी रियाज़त ए नीमशब ….’  . ( पूर्ण शेर पुढे पहावा).

–       [ टीप : ‘मक्ता’ या शब्दाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, माझा

लेख   www.marathisrushti.com  वर अथवा  www.subhashsnaik.com वर वाचावा ] .

  • जर शेरमध्ये शायरचा ‘त.खल्लुस’ नसेल, तर त्याला मक़्ता म्हणत नाहीत, त्याला फक्त ‘आ.खरी शेर’ म्हणतात.

 

# ‘मैं .खयाल हूँ किसी और का … ’ या गझलचे शब्द वाचल्यावर ध्यानांत येईल की, हिचा (हिची) रदी.फ आहे, ‘कोई और है’ ; आणि क़वा.फी  (काफिये ) आहेत : सोचता, आईना, माँगता, जानता, या, वाक़या, सज़ा, रास्ता, यहाँ . खरं म्हणजे, हे संपूर्ण शब्द काफिये नाहीत, तर, ‘आ’ हा स्वर, काफिया आहे. मराठीत याला ‘स्वर-काफिया’ म्हणतात. परंतु, उर्दूत, स्वर-काफिया असा वेगळा काफिया नसतो.

[ टीप – मूळ अरबीत, ‘रदी.फ’ हा शब्द स्रीलिंगी आहे, व त्याचप्रमाणें, .फारसी व उर्दूतही. मराठीतही बरेच जण तो स्रीलिंगी म्हणून वापरतात ; मात्र कांहींजण तो शब्द पुल्लिंगी वापरतात. ]

( स्वर काफियाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, त्यावरील माझा लेख www.marathisrushti.com

अथवा  www.subhashsnaik.com वर वाचावा ) .

 

# गझलसंबंधी एक महत्वपूर्ण बाब ध्यानांत ठेवणें गरजेचें आहे, आणि ती ही की, गझलचा प्रत्येक शेर हा स्वयंपूर्ण  ( complete in itself ) असतो.

( कवितेतील सर्व कडव्यांचा एकमेकांशी संबंध असतो ; पण गझलेतील शेरचा मागल्या-पुढल्या शेरशी रदीफ-काफियाव्यतिरिक्त अन्य संबंध नसतो ) .

 

  • #गझलचे बरेच प्रकार आहेत. पण, प्रस्तुत गझलच्या संदर्भात आपण दोन पाहूं या. ते आहेत ,

‘ग़ज़ल मुसलसल’ (शृंखलित), आणि ‘ग़ज़ल ग़ैरमुसलसल’. गैरमुसलसल गझलेतील प्रत्येक शेरचा विषय वेगवेगळा असतो ; तर मुसलसल  गझलेतील सगळ्या शेरांचा विषय एकच असतो. मात्र, मुसलसल गझलमध्येही प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असतो.

 

#प्रस्तुत ‘मैं .खयाल हूँ किसी और का … ’ गझल वाचल्यावर आपल्या ध्यानात येतें की, ती मुसलसल गझल आहे, म्हणजेच तिच्यातील शेरांचा मूळ विषय एकच (The Same) आहे.

 

  • या गझलचे शब्द व कांहीं शब्दार्थ :

(कठीण शब्दांचा अर्थ समजला, तर गझलचा अर्थ समजायला सुकर होतें. )

 

[ कांहीं टिपा :

  • या गझलमध्ये ८ शेर आहेत. पण गायक सगळे शेर गात नाहींत.

(उदा. : ‘चुपके चुपके रात दिन ..’ या गझलमध्ये १५ शेर आहेत, पण गुलाम अली अथवा अन्य गायक पाचएक शेरच गातात. कांहीं गायक शेरांचा क्रमही भिन्नभिन्न घेतात ; पण शेर हे स्ययंपूर्ण असल्यामुळे, त्यानें फरक पडत नाहीं ).

  • आपण आठही शेरांचा अर्थ पाहूं या.
  • वेगवेगळ्या ठिकाणीं , शेरातील कांहीं शब्दांचे भिन्न भिन्न विकल्प असतात. आपण शक्यतो तेही दाखवूं या.
  • कांहीं शब्दांचे एकाहून अधिक अर्थ असूं शकतात. मात्र, प्रस्तुत गझलच्या संदर्भात योग्य तोच अर्थ इथें खाली दिलेला आहे .  ]

**

 

मैं ख़याल हूँ किसी और का, मुझे सोचता कोई और है
सरे आईना मेरा अक्स है, पसे आईना कोई और है  |  (१)

सरे आईना  :  आरशावर

पसे आईना : आरशाआड , आरशामागे

अक्स  : प्रतिबिंब

 

मैं किसी की दस्ते तलब में हूँ तो किसी की हर्फ़े दुआ में हूँ
मैं नसीब हूँ किसी और का, मुझे माँगता कोई और है  |  (२)

दस्त  : हात

तलब  :  मागणें, demand करणें, बोलावणें

दस्ते तलब  : बोलावणारा हात
हर्फ़  :   शब्द

दुआ  : प्रार्थना

हर्फ़े दुआ  :  प्रार्थनेचे शब्द

 

अजब ऐतबार ओ बेऐतबारी के दरमियाँ है ज़िन्दगी
मैं क़रीब हूँ किसी और के, मुझे जानता कोई और है |  (३)
ऐतबार  : भरोसा

ओ  :  आणि

मेरी रौशनी तेरे .खद्दो .खाल से मु.ख्तलिफ़ तो नहीं, मगर
तू क़रीब आ, तुझे देख लूँ, तू वही है या कोई और है |  (४)
(टीप : विकल्प :  तेरी रौशनी मेरे .खद्दो .खाल से … )

.खद्द  : गाल

.खाल  :  तीळ ( शरीरावरचा)

.खद्दो .खाल  :  गाल आणि ( गालावरला) तीळ

मु.ख्तलिफ़  :  भिन्न

 

तुझे दुश्मनों की खबर न थी, मुझे दोस्तों का पता नहीं
तेरी दास्ताँ कोई और थी, मेरा वाक़या कोई और है |  (५)
दास्ताँ  :  कहाणी

वाक़या   :  घटना

 

वही मुन्सिफ़ों की रिवायतें, वही .फैसलों की इबारतें
मेरा जुर्म तो कोई और था, प मेरी सजा कोई और है |  (६)
मुन्सि.फ  : सरकारी कर्मचारी  ;  न्यायदान करणारा

रिवायत  :  परंपरा

.फैसला   : निकाल

इबारत  : लेख

प  :  ( ‘ज़रूरते शेरी ’अनुसार ) पर : परंतु

 

जो मिलें कभी, उन्हें पूछना नहीं देखना उन्हें ग़ौर से
जिन्हें रास्ते में .खबर हुई, के ये रास्ता कोई और है |  (७)

( टीप : विकल्प : कभी लौट आएँ तो पूछना … )

जो मेरी रियाज़त ए नीमशब को ‘सलीम’ सुबह न मिल सकी
तो फिर इसके मानी तो ये हुए कि यहाँ .खुदा कोई और है |  (८)
रियाज़त : उपासना, पूजा

नीमशब  : अर्धी रात्र

ए   : चा / ची / चें

रियाज़त ए नीमशब   :  अर्ध्या रात्री केलेली उपासना

*  [ टीप – ‘सलीम’ हा शायरचा ‘त.खल्लुस’ ( pen name ) आहे ]

**

  • शेरांचा अर्थ :

#वरील माहितीनंतर आपण शेरांचा अर्थ पाहूं या.

# टीप :

* (अ)

-मत्ल्याचा पहिला मिसरा (ओळ) वाचल्यावर ध्यानांत येतं की इथें दोन पुरुष व एक स्त्री असा त्रिकोण अभिप्रेत आहे. ( ‘मैं’ , ‘किसी ओर का’ , ‘कोई और है’ , हे शब्द पहावेत ).

-अन्य शेरांमध्येही समान अर्थाचे, अथवा विरोधी शब्द वापरून ( जसें की, .खयाल , सोचता ;  दास्ताँ, वाकया ;  दुश्मन , दोस्त ; ऐतबार, बेऐतबारी ;  सरे आईना , पसे आईना ; वगैरे ) शायरानें त्या बाबीला उठाव दिलेला आहे.

– ( ही गझल, ‘ग़ज़ल मुसलसल’ आहे, याचा उल्लेख आधी झालेला आहेच ).

 

* (ब)

-गझलच्या रसग्रहणासाठी टी. व्ही. सीरियलच्या संदर्भात विचार करायला हवाच असें नाहीं.

-पण आपण, ‘एका तरुणीचें एका युवकावर प्रेम असूनही तिला दुसर्‍या कुणाशी तरी लग्न करावें लागलें आहे’, हा संदर्भ  मनाशी बाळगून , या गझलचा विचार करणार आहोत. (याचाही उल्लेख आधी आलेला आहे ) .

 

 

  • शेर पहिला : (मत्ला) :

#‘कोई मेरा .खयाल करता है’ याचा अर्थ आहे, ‘ कोणी व्यक्ती, माझे विचार, माझ्या आवडीनिवडी, माझे

अग्रक्रम — priorities , वगैरे बाबींचा विचार करत आहे, त्याबद्दल काळजी घेत आहे ;  मला त्रास होऊं नये, मी hurt होऊं नये, अशा प्रकारें कृती करत आहे, वागत आहे’.

 

#त्या अनुषंगानें या शेरचा अर्थ असा होतो –

कोणी तरी एक माणूस  (माझा पती) माझा .खयाल (विचार) करत आहे ; तर, कोणां तरी अन्य माणसाच्या (माझ्या प्रियकराच्या) मनातील विचारांमध्ये (भावनांमध्ये ) मी आहे.

( त्या दुविधेत — द्विधा मनस्थितीत — मी असल्याकारणानें झालें काय आहे , की –  ) , आरशावर प्रतिबिंब माझें आहे ( म्हणजे, माझ्यात बाह्य बदल दिसत नाहीं , बाहेरून पहातां मी पूर्वीचीच आहे, unchanged आहे) ; मात्र त्याआड ( त्याच्या पल्याड) पाहिलें तर तिथें कोणीतरी दुसरीच आहे  ( इतका आंतरिक बदल माझ्यात झालेला आहे ) .

 

  • शेर दुसरा :

कोणी तरी (माझा पती) (हातानें) मला बोलावत आहे, माझ्याकडून कांहींतरी मागणी करत आहे ; तर, कुणी दुसरा ( माझा प्रियकर) माझ्यासाठी (माझ्या भल्यासाठी,  माझ्या सुखासाठी) प्रार्थना करत आहे.

म्हणजे, माझा पती मला हक्कानें बोलावतो , त्याला काय हवें तें demand करतो ; तर माझा प्रियकर (आतां माझा त्याच्याशी कांहींहीं संबंध नसतांनाही) माझ्या सुखासाठी प्रार्थना करतो.

( टीप : ही परस्परविरोधी भावना / वर्तणूक  इथें शायरनें परिणामकारकरीत्या दाखवलेली आहे).

नशिबानें मी कुणाची तरी बनलेली आहे ; मी त्या कुणाचें तरी (पतीचें) नशीब बनलेली आहे ( टीप : पती-पत्नीचें नशीब एकमेकांशी जोडलें जातें ) . आणि कुणीतरी दुसरा, ( माझा प्रियकर) , ( त्याला मी, आणि नशिबानें, दगा दिला तरीही) , माझी कामना ( अजूनही ) करत आहे.

 

  • शेर तिसरा :

भरोसा आणि बेभरोशाचें असणें या  दोहोंच्या मध्ये हें अजब जीवन (झोके घेत) असतें. (माझा पती माझ्यावर भरोसा ठेवून आहे ; तर माझ्या प्रियकराशी मी बेभरोशाचें वर्तन केलें).

मी कुणाच्या तरी (पतीच्या) जवळ आहे (शेजारी आहे, एकत्र आहे, संग करत आहे) ; पण मला खरोखर कोण जाणतो, कोण जाणून कोण घेतो आहे , तर , तो अन्य कुणी दुसरा (माझा  प्रियकर) आहे .

( टीप : पुन्हां, परस्परविरोधी भावना / वर्तणूक  ).

 

  • शेर चौथा :

# हा शेर पुरुषानें म्हटलेला वाटतो. ( बहुधा प्रियकरानें) . ( तसें सीरीयलमध्यें दाखवलेलें असावें).

( टीप  : मेहदी हसन व अन्य गायक, हा शेर गात नाहींत).

 

# माझा प्रकाश ( माझ्या नेत्रांमधील चमक), तुझे (नाजुक गुलाबी) कपोल (गाल) आणि तुझ्या गालावरला

( व तुझं सौंदर्य वाढवणारा ) तीळ , हे खरं तर अभिन्न(च) आहेत . ( तुझे नाजुक गुलाबी गाल व त्यावरील तीळ हे पाहूनच तर माझ्या डोळ्यांत चमक येते).

(तरी- )पण, तूं जवळ ये, मला बघूं दे की ती तूंच आहेस की कुणी दुसरीच आहेस. ( कारण, तूं इतकी बदलली आहेस, की ती तूंच आहेस ना, याची मला खात्री करून घ्यायची आहे).

 

# [ ‘तेरी रौशनी मेरे .खद्दो .खाल से …’  हा  विकल्प पाहतां, (म्हणजे, स्त्रीच्या दृष्टिकोणातून) या शेरचा, अशाच प्रकारचा अर्थ निघेल ].

 

  • शेर पांच :

# हाही शेर पुरुषानें म्हटलेला वाटतो. (प्रियकरानें).

( टीप  : मेहदी हसन व अन्य गायक, वरील शेरप्रमाणें हाही शेर गात नाहींत).

 

# तुला शत्रूंची कल्पना नव्हती (भाग्य तुझें शत्रू होतें, प्रतिकूल-परिस्थिती तुझी शत्रू होती) ;  मला कोणी मित्र होते/आहेत की काय, याचाच पत्ता नाहीं ( मला कुणीच मित्र नाहीं, सगळे माझे शत्रू आहेत).

तुझी कहाणी कांहीं वेगळीच होती ( नशिबामुळे, स्वार्थत्यागामुळे,  तुला दुसर्‍या कोणाशी तरी लग्न करणें भाग पडलें) ; तर, माझ्या (आयुष्यातील ) घटना त्याहून वेगळ्याच आहेत. ( मला माझी माशूक़ — प्रिया — गमवावी लागली, माझा कांहीही दोष नसतांना).

 

# (स्त्रीच्या दृष्टिकोणातूनही या शेरचा , अशाच प्रकारचा अर्थ निघेल ).

 

 

  • शेर सहा :

न्यायदाते (निवाडा करणारें जग) पाळत असलेल्या त्याच-त्या ( जुन्यापुराण्या) परंपरा , आणि त्यांनी सुनवलेल्या त्याच-त्या (the same) निवाड्यांचें record  ,  यांत , (इतका अपरिमित काळ लोटलेला असूनही, अजून),  कांहीही बदल झालेला नाहीं.

(पहा ना,) माझा गुन्हा तर कांहीं वेगळाच होता ( प्रेम करणें, हा ) , पण मला मिळालेली सजा तर कांहीं भलतीच आहे ( कायमचा वियोग) !  ( तरीही जग पुन्हां-पुन्हां असेच निवाडे करतें).

( म्हणजे, गुन्हा एक आणि सजा भलतीच, हीच जगाच परंपरा आहे).

 

  • शेर सात :

#टीप :

*हा शेर प्रियकरानें म्हटलेला वाटतो.

 

*  या शेरचा पहिला मिसरा (ओळ) हल्ली वेबवर, स्वल्पविराम देऊन, असा लिहितात – ‘ जो मिलें कभी तो पूछना , नहीं देखना उन्हें ग़ौर से’  ; किंवा असा – ‘जो मिलें कभी तो पूछना नहीं , देखना उन्हें ग़ौर से’ .

-पण हें दोन्हीही योग्य नाहीं. त्यामुळे गैरअर्थ होतो.

-खरी ओळ स्वल्पविरामविरहित, अशी आहे – ‘जो मिलें कभी तो पूछना नहीं देखना उन्हें ग़ौर से’ .

– अशा प्रकारें असलेल्या शब्दांची फोड अशी होते – पूछना नहीं ,  नहीं देखना ….  , म्हणजेच

पाहूं नका, विचारूं नका.

 

*(टीप – ‘कभी लौट आएँ तो..’, हा विकल्प पाहिला तरी, अर्थामध्ये फरक पडत नाहीं. मात्र, त्या विकल्पापेक्षा, ‘जो मिलें कभी तो..’  हे शब्द अधिक योग्य वाटतात. तेच मूळ शब्द असावेत.).

 

#शेरमधील ‘वो’ (ते) , ( म्हणजे, ‘ती’ ) .

[ टीप – उर्दूत असें लिहिण्याची पद्धत आहे. जसें की, ‘ती येत आहे’ यासाठी, ‘वो आ रहे हैं’ असें लिहिलें जातें.

एक उदाहरण – ग़ालिबचा शेर : ‘वो हमारे घर आए, हमारी क़िस्मत है । कभी हम उनको कभी अपने घर को  देखते हैं ।’ ]

 

 

# प्रस्तुत शेरचा अर्थ –

जिला मार्ग आक्रमण करतांना कळलें (ध्यानांत आलें ) की हा ,आपण चालत असलेला, रस्ता तर

(जायचें ठरवलें होतें त्यापेक्षा) कुठला तरी भलताच आहे ( म्हणजेच, चुकीचा आहे) , अशी ती (माझी प्रिया) जर कधी भेटली तर तिच्याकडे न्याहाळून, टक लावून पाहूं नका (बघत बसूं नका) आणि तिला कांहीं विचारूंही नका. ( तसें करून तिला embarrass करूं नका, कारण ती आधीच ‘शर्मिंदा’ झालेली आहे, मनानें खचून गेली आहे ) .

 

  • शेर आठवा ( Eighth) , अंतिम शेर , (मक़्ता ) :

जर मध्यरात्रीतील माझ्या उपासनेला / पूजेला सकाळ भेटली नाहीं,  [ म्हणजे – रात्री (रात्रभर) मी जागाच होतो , आणि मी मध्यरात्रीं (रात्रभर) केलेल्या उपासनेची / पूजेची ( प्रेमाच्या पूजेची ) जर सकाळीं पूर्ती झाली नाहीं, जर ती सफळ झाली नाहीं ] , तर, –

( टीप – दिवसाच जग चालतं, घटना घडतात. त्यामुळे, रात्री केलेल्या पूजेची सकाळी तरी पूर्ती व्हायला हवी. दुसरें म्हणजे, रात्रीं अंधार असतो, पण सकाळी प्रकाश होतो. त्यामुळे, सकाळी तरी मला प्रकाश मिळावा, माझी इच्छापूर्ती व्हावी ).

तर , त्याचा अर्थ असा (स्पष्ट) आहे की, इथें (माझ्या विश्वातील)  ईश्वर हा , नेहमीचा  , (जग ज्याचें वर्णन करतें, तो , जग चालवणारा न्यायी) .खुदा नसून, कुणी दुसराच, भलताच, .खुदा आहे ( कारण तो मला  न्याय देत नाहीं).

( टीप : ‘सलीम’ हा  ‘त.खल्लुस’ आहे ).

**

  • शेवटी –

#गझलमधील सर्वोत्कृष्ट शेरला ‘हासिले ग़जल शेर’ म्हणतात.

#मी हासिले ग़ज़ल शेर देत नाहींये. मात्र, मला, ‘सरे आईना मेरा अक्स है, पसे आईना कोई और है‘ हा मिसरा (पंक्ती) सर्वोत्कृष्ट वाटतो.

 

#अशी ही एका त्रिकोणाची भावनिक गझल आहे. ती रिवायती (पारंपारिक) गझल आहे, इश्किया गझल आहे. मात्र , ती मीलनाची गझल नसून विरहाची गझल आहे. आणि ती गझलगोनें उत्कृष्टरीत्या मांडलेली आहे.

 

+ + +

  • सुभाष स. नाईक

vistainfin@yahoo.co.in

www.subhashsnaik.com

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..