आपली त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्याची नितांत गरज आहे. केवळ त्वचा स्वच्छ राखण्यामुळेही आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. सध्या अनेक कारणांमुळे त्वचारोगांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
बाहेरून आल्यावर लगेचच हात-पाय, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास साबणही वापरावा.
त्वचेसाठी साबण निवडताना विशेष काळजी घ्यावी. आज-काल बाजारात साबणाचे शेकडो नमुने मिळतात. पण चांगल्या दर्जाचा साबण न वापरल्यास त्वचेचे आजार होऊ शकतात. यासाठी मान्यताप्राप्त, सौम्य आणि त्वचेचे रक्षण करणारा साबणच वापरावा. आयुर्वेदिक किंवा षर्बलच्या नावाखाली आजकाल काहीही विकले जाते. त्यांच्या मागे लागू नये. बाजारात दर महिन्याला नवे-नवे साबण येत असतात. गरज नसल्यास आपला साबण बदलू नये. आपल्या त्वचेला मानवणाराच साबण वापरावा.
त्वचा स्वच्छ व कोरड्या कपड्याने हळूवार पुसून कोरडी करावी. यामुळे पुळ्या, पुरळ, घामोळे, खाज येणे आदी त्वचेच्या आजारांपासून आपली त्वचा सुरक्षित राहू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जो टॉवेल वापरतो तो शक्यतो इतरांबरोबर शेअर करु नये. आपला टॉवेल आपल्यासाठीच ठेवावा. घरातील प्रत्येक माणसासाठी दोन टॉवेल असल्यास उत्तम. पाहुणे मंडळींसाठीही वेगळे टॉवेल ठेवावेत.
स्त्रियांनी कपडे-भांडी धुण्यासाठी वापरायचे साबण शक्यतो चांगल्या प्रतीचेच घ्यावेत. जास्त सोडा असलेला कमी प्रतीचा साबण त्वचेला घातक.
— पूजा प्रधान
Leave a Reply